दिग्गज कारनिर्माती कंपनी महिंद्रा अॅन्ड महिंद्रा (M&M) आपले दोन एन्ट्री लेवलचे मॉडेल्स KUV100 आणि TUV300 यांचे विविध व्हर्जन आणण्याच्या तयारीत आहे. निरनिराळ्या श्रेणीतील ग्राहकांना लक्षात ठेवून हे पाऊल उचलण्याचा निर्णय झाल्याचं कंपनीच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने सांगितलं.

हे दोन्ही मॉडेल कंपनीसाठी दीर्घकालीन असून अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यामुळे नव्या तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्याचं कंपनीने ठरवलं आहे. यामध्ये BS-4 एमिशन नियमांतर्गत येणाऱ्या प्रोडक्ट्सचाही समावेश आहे. महिंद्रा पुढील वर्षी TUV300 चं अपडेटेड व्हर्जन सादर करणार आहे. तसंच KUV100 चं इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च करण्याची तयारी सुरू आहे. AMT सह KUV100 चं डिझेल व्हर्जन सादर करण्याचीही कंपनीची योजना आहे.

एसयूव्ही सेक्टरमध्ये प्लेयर बनायचं आहे, असं आम्ही नेहमीच सांगत आलोय आणि TUV300 व KUV100 हे दोन्ही मॉडेल्स आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असं महिंद्रा अॅन्ड महिंद्राचे ऑटोमोटिव्ह डिव्हिजन सेल्स आणि मार्केटिंगचे प्रमुख विजय राम नकरा यांनी सांगितलं.
TUV300 चं फेसलिफ्ट व्हर्जन पुढील वर्षापर्यंत लॉन्च केलं जाईल असं नकरा म्हणाले. सध्या कंपनी दरमहिन्याला 3,000 यूनिट्सची विक्री करते, सात सीट असलेली TUV300 Plus लॉन्च केल्यानंतर हा आकडा 4,000 पर्यंत पोहोचवण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल, असं नकरा पुढे म्हणाले.