दिवाळी सणाच्या पाच दिवसांपैकी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरा होत असते. दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी भक्तांच्या घरी वास्तव्यास येते, असं मानलं जातं. म्हणून लक्ष्मीच्या स्वागतासाठी दारासमोर रांगोळी, आंबा आणि केळीच्या पानांपासून तयार केलेलं तोरण लावून तिचं स्वागत केलं जातं. सोबतच घरात पाहूण्यांची सुद्धा लगबग असते. घरी आलेल्या पाहूण्यांच्या पाहूणचारासाठी प्रत्येक स्त्रियांच्या समोर एक मोठा प्रश्न उभा असतो. पाहूण्यांसाठी दिवाळी स्पेशल काय बेत आखायचा ? आलेले पाहूणे आपल्या घरी पोटभरून जेवून जावेत, याच आपल्याला फार समाधान वाटत असतं. पण यासाठी बच्चे कंपनीपासून ते अगदी आजी-आजोबांच्या आवडीनुसार काय नक्की काय करूया? याचं उत्तर शोधता शोधता अर्धा दिवस निघून जातो. मग उरलेल्या अर्ध्या दिवसात रात्रीच्या जेवणाची घाईगडबड…म्हणूनच तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून आज आम्ही तुम्हाला लक्ष्मी पूजन स्पेशल काही खास रेसिपीज सांगणार आहोत…एकदा नक्की ट्राय करून पाहा.
धिरडे :
धिरडे किंवा डोसे हा सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे. धिरडे करायला सोपे असूनही सर्वांकडे नेहमीच करतात, असं नाही. तिखट धिरड्यांबरोबर दुसरं काहीही तोंडी लावायला लागत नाही. आयत्या वेळी कोणी पाहुणे जेवायला थांबणार असल्यास, धिरड्यासारखा सोपा पदार्थ नाही. अनेकांकडे फक्त तांदुळाच्या पिठाची किंवा डाळीच्या पिठाची धिरडे करतात.
धिरड्यांसाठी पीठ भिजवताना प्रथम पिठाइतकंच पाणी घालावे. मग पीठ कालवून जरुरीप्रमाणे थोडेसे पाणी घालावे. धिरडे घालण्यासाठी काहील किंवा पुरणपोळीचा सपाट तवा वापरावा. म्हणजे धिरडे पातळ घालता येते. त्याला आच चांगली लागते व त्यामुळे ते छान जाळीदार व कुरकुरीत होते.
धिरडे घालण्यापूर्वी, तवा नेहमी चिंच व मीठ लावून स्वच्छ घासून घ्यावा. म्हणजे धिरडे बिघडत नाही. धिरडे तव्यावर घालण्यापूर्वी सर्व पीठ खालपासून ढवळून घ्यावे. पीठ तव्यावर घालण्यासाठी कप वापरावा.
साहित्य :
साधारण दोन भांडी तांदूळ
अर्धे भांडे उडीद डाळ
अर्धे भांडे तूर डाळ
अर्ध भांडे मूग डाळ
तांदूळ धुऊन कोरडे वाळवावेत
नंतर त्यात वरील डाळी, एक चमचा मेथ्या, एक चमचा जिरे असे घालून गिरणीतून एकदम दळून आणावे.
रेसिपी :
वरीलप्रमाणे दळून आणलेले पीठ तीन वाट्या घ्यावे. त्यामध्ये मीठ, तिखट चवीप्रमाणे साधारण एक एक चमचा घालावे. हळद अर्धा चमचा, बारीक चिरून कोथिंबीर घालावी. तापलेल्या तव्यावर एक चमचा तेल सोडावे. एक डाव पीठ घालावे. अलगद डावाने पसरवावे. पीठ घालताना गॅस मंद करावा. म्हणजे पीठ उलटून येत नाही. सरावाने पीठ हाताने पातळ पसरवता येऊ लागते. बदामी रंगासारखे धिरडे झाले की वरून चमचाभर तेल सोडून उलटावे गरम गरम खावयास द्यावे.
हरभरा कबाब
साहित्य:
१५ ते २० पालकाची पाने
२ मध्यम बटाटे, उकडून सोललेले व मॅश केलेले
३/४ कप मटार, वाफवलेले
२ ते ३ हिरव्या मिरच्या, एकदम बारीक चिरून
२ टेस्पून कॉर्न फ्लोअर
१/२ टिस्पून आले पेस्ट
१ टिस्पून धणेपूड
१/२ टिस्पून जिरेपूड
१/२ टिस्पून गरम मसाला
१/२ टिस्पून आमचूर पावडर
चवीपुरते मिठ
तळणासाठी तेल
८ ते १० काजू पाकळ्या (विलग करून) (ऐच्छिक)
रेसिपी:
सर्वप्रथम पालकाची पाने ब्लांच करून घ्यावीत. साधारण २ ते ३ कप पाणी उकळण्यास ठेवावे. पाणी उकळले कि पालकाची पानं घालावी आणि २ मिनीटे चमच्याने ढवळावे. नंतर पानं गरम पाण्यातून काढून गार पाण्यात बुडवावीत. हलकेच पालकातील पाणी पिळून घ्यावे. नंतर लहान मिक्सीमध्ये घालावीत. त्यात वाफवलेले मटार, हिरव्या मिरच्याही घालाव्यात. पाणी न घालता किंचीत भरडसर वाटून घ्यावे. हे वाटण मध्यम वाडग्यात घालावे. यात आलं, मॅश केलेले बटाटे, धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला, आमचूर पावडर, कॉर्न फ्लोअर आणि मिठ घालून मिक्स करावे. हाताला तेल लावून घ्यावे आणि मिश्रणाचे मध्यमसर समान गोळे करून गोल आकार द्यावा. पृष्ठभाग (सरफेस) एकदम प्लेन असावा. तयार कबाब किंचीत दाबून चपटे करावे आणि एका बाजूला काजू चिकटवावा. मिडीयम-हाय आचेवर गुलाबीसर रंग येईस्तोवर तळावे.
मूग डाळ हलवा
साहित्य :
1 वाटी मूग डाळ
१.५ वाटी दूध
1/2 वाटी पाणी
1 वाटी साखर
1 टीस्पून वेलची पूड
ड्राय फ्रूट आवडीनुसार
4 टे स्पून तूप
2-3 केसर काड्या
1 टीस्पून खाण्याचा पिवळा रंग (पर्यायी)
रेसिपी :
आधी मूग डाळ ४ तास पाण्यात भिजवून ठेवा. ४ तासांनी पाणी काढून घ्या व मिक्सरमधून फिरवून घ्या. अगदी बारीक पेस्ट करू नये.आता पॅनमध्ये तूप गरम करून घ्या व त्यात ड्राय फ्रूट घालून १ मी. परतून घ्या. बाजुला काढून घ्या. आता त्याच तुपात तयार मूग डाळ पेस्ट घालून १०-१५ मिनिटे बारीक गॅसवर ढवळत राहा. लालसर सोनेरी रंगावर परतून घ्या.आता थोडे पाणी व केसर युक्त दूध घालून परतून घ्या. खाण्याचा रंग (पर्यायी) घालून झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवून घ्या. आता झाकण काढून घ्या व त्यात ड्राय फ्रूट, वेलची पूड व साखर घालून परतून घ्या. आपल्या हव्या त्या प्रमाणात सैलसर व घट्ट होईपर्यंत परतून घ्या. हलवा तयार आहे. बाऊल मध्ये काढून घ्या व वरून ड्राय फ्रूट घालून सर्व्ह करा अत्यंत चविष्ट असा सात्विक “मूग डाळ हलवा”!!!
आणखी वाचा : Diwali 2021: यंदाच्या दिवाळीत या ४ राशींचे भाग्य चमकेल, संपत्तीत वाढ होण्याची दाट शक्यता
मशरूम कॅसरोल
साहित्य
एक कप बासमती तांदूळ पाण्यात भिजवलेले
100 ग्रॅम मशरूम चिरून
1 मोठा कांदा चिरलेला
2-3 हिरव्या मिरच्या चिरून
2 टीस्पून आले-लसूण पेस्ट
1 टेबलस्पून कोथिंबीर चिरलेली
3 चमचे दही
1 चमचे तेल
1 तुकडा दालचिनी
1 तमालपत्र
5 लवंगा
4 हिरव्या वेलची
चवीनुसार मीठ
आवश्यकतेनुसार पाणी
रेसिपी :
भांड्यात तेल गरम करून तमालपत्र, लवंग, वेलची आणि दालचिनी तळून घ्या. आता कांदा घाला. सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. नंतर आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची घालून परता. आता मशरूम, कोथिंबीर, दही घालून काही वेळ तळून घ्या. नंतर तांदूळ, मीठ आणि पाणी घाला, झाकून शिजवा आणि तयार झाल्यावर तुमच्या आवडत्या सॅलडसह सर्व्ह करा.
आणखी वाचा : Lunar Eclipse 2021: दिवाळीनंतर ‘ही’ तारीख लक्षात ठेवा, कोणत्या राशीवर पडेल अधिक प्रभाव ? जाणून घ्या
दह्याची कढी
साहित्य :
2 कप दही
2 टेबलस्पून बेसन
2 लाल मिरच्या
कढीपत्ता
1/2 टीस्पून जिरे
1/2 टीस्पून मोहरी
1 टीस्पून मीठ
2 लसणाच्या पाकळ्या
2 टेबलस्पून तेल
रेसिपी :
दह्या मध्ये हळद बेसन मीठ टाकू रवीने भेटून घ्या.गजा मध्ये तेल गरम करायला ठेवा तेल गरम झाल्यावर मोहरीचा तडका द्या, आणि सगळी सामग्री टाकून दोन मिनिटानंतर दही टाका आणि कढीला उकळी येईपर्यंत गॅस वर ठेवा बंद पडल्या नंतर गॅस बंद करून घ्या.