आधुनिक युगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर माणूस खूप वेगानं पुढ जातोय. यामुळंच की काय, त्याची दैनंदिन दिनचर्या फारच बदललेली दिसते. सकाळचं जेवण दुपारी, दुपारचं जेवण रात्री आणि रात्रीचं जेवण मध्यरात्री हेच आता माणसाचं रूटीन झालंय. मात्र, सावधान! ही बेशिस्त आपलं आरोग्य धोक्यात टाकेल. बुरसट आजारांना बळी पडू नका, त्यामुळं आजच सावध व्हा आणि अवेळी जेवणाचे तोटे आणि वेळेवर जेवणाचे फायदे जाणून घ्या.
स्पेनचं हे संशोधन काय म्हणते ?
बदलत्या जीवनशैलीचा मानवी आरोग्यावर मोठा परिणाम दिसून येत आहे. कामाच्या आणि त्याचबरोबर खानपाणाच्या चुकीच्या सवयीमुळं माणसाचं आयुष्य हे धोकादायक झालं आहे, असे स्पेनच्या अभ्यासात निष्पन्न झालं आहे. त्यांच्या मते, स्पेनमधील ८४५ प्रौढांवर हा अभ्यास करण्यात आला. ज्यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आठ तासांचा उपवास करायला सांगितलं. त्यानंतर दुसऱ्या रात्री त्यांना नेहमीपेक्षा लवकर आणि तिसऱ्या दिवशी रात्री नेहमीपेक्षा उशिरा जेवण देण्यात आले. यावेळी संशोधकांनी मेलाटोनिन रिसेप्टर-१बी जनुकातील प्रत्येक सहभागीच्या अनुवांशिक कोडची तपासणी केली. तपासणीत परिणाम झालेला आढळून आलाय.
अवेळी जेवण करण्याचे ‘तोटे’
काही लोकांना कामामुळे वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांना जेवायला उशीर होतो. वेळेवर अन्न न खाल्ल्याने त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे उशिरा खाणाऱ्यांमध्ये टाइप २ मधुमेहाचा धोका दिसून आला. रात्रीचे जेवण उशिरा केल्याने इन्सुलिनची पातळी कमी होते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढते. रात्री उशिरा जेवल्यानेही वजन वाढू शकते. त्यामुळे जर तुम्हीही रात्री वेळेवर जेवण केले नाही तर तुम्हाला आरोग्यासंबंधी अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे या गोष्टी टाळण्यासाठी जेवणाची वेळ निश्चित करायला विसरू नका.
आणखी वाचा : ‘हे’ तीन पेय तुमचं वजन वाढू देणार नाही; वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘उत्तम उपाय’
वेळेवर जेवण करण्याचे ‘फायदे’
आजच्या धक्काधक्कीच्या युगात व्यस्त दिनक्रमामुळे अनेक लोक रात्री उशीरा जेवण करतात. रात्री उशीराने जेवण करणे, हे फक्त वजनावरच नाही तर आरोग्यासाठी देखील नुकसानकारक ठरू शकते. त्यामुळे रात्रीचे जेवण वेळेत करणे फार महत्वाचे आहे. वेळेवरचं जेवण हे आपल्या शरिरासाठी जणू अमृतच आहे. ज्यामुळं शांत झोप लागते, पचनशक्ती वाढते,वजन कमी होते,हृदयाचे स्वास्थ्य सुधारते त्याचबरोबर विशेष म्हणजे मधुमेहाचा धोका सुध्दा कमी होतो.
मेलाटोनिन हार्मोन कसा कार्य करतो ?
मेलाटोनिन हा हार्मोन आहे. जे प्रामुख्याने रात्री सक्रिय असते. हा हार्मोन झोपेचे चक्र नियमित करण्यास मदत करतो. या संशोधनात मेलाटोनिन-१बी जनुकाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. त्यामुळे उशीरा खाणाऱ्यांमध्ये टाइप २ मधुमेहाचा धोका दिसून आला. संशोधकांना असे आढळून आले की, सहभागींच्या रक्तातील मेलाटोनिनचे प्रमाण रात्रीच्या जेवणानंतर २.५ पटीने जास्त होते. रात्रीचे जेवण उशिरा केल्याने इन्सुलिनची पातळी कमी होते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढते. रात्री उशिरा जेवणाची वेळ लक्षात घेता, मेलाटोनिन-1बी, जी-अॅलेल असलेल्या सहभागींमध्ये जीनोटाइप नसलेल्या लोकांपेक्षा रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण जास्त होते. त्यामुळं जेवणाची योग्य वेळ आपल्याला रोगमुक्त करते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे