लौकर झोपून लौकर उठतो त्याला आरोग्य धनसंपदा मिळते म्हणतात. खरंच आहे ते! पण आम्हाला लौकर झोपायचं नसतं. यार हे डोकं झोपूच देत नाही ! प्रत्येक रात्री लौकर झोपायचा निश्चय करून १० वाजता आपण अंथरूणावर पडतो खरे पण मग डोकं शांत होण्याएेवजी पुन्हा तापतं. कुठल्या कुठल्या गोष्टी आठवत राहतात. पाच वर्षांपूर्वी आपण हेच का केलं? ते का नाही? त्याला/तिला आपण हेच का बोललो? (तो किंवा ती आपल्या आयुष्यातून निघून जाऊन युगं लोटलेली असताना) हे सगळे विचार तासभर डोक्यात थैमान घालतात आणि पहाटेचे तीन वाजलेले असतात. दुसऱ्या दिवशीच्या शेड्युलचा बोऱ्या वाजायची नांदी होते.

बट फिकर नाॅट. कारण आता तुम्ही रात्री उशिरा झोपून उशिरा उठणारे असाल तर तुम्ही जास्त ‘क्रिएटिव्ह’ आहात. हा जोक नाही! इंग्लंडच्या साऊथहॅम्पटन युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या एका अभ्यासात हे आढळून आलं आहे.

वाचा- इथे १५ मिनिटात भाग्य बदलून मिळेल!

या अभ्यासादरम्यान १२५० लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या सगळ्यांची मुलाखत घेतल्यावर असं आढळलं की जे कोणी रात्री ११ नंतर झोपतात आणि सकाळी ८ नंतर उठतात ते जास्त खुश असतात आणि जास्त पैसे कमावतात.

कारण हे लोक अधिक मोकळेपणाने विचार करतात असं या युनिव्हर्सिटीचं म्हणणं आहे.

रोजच्या धकाधकीत सगळ्यांनाच धावपळ करावी लागते. त्यात अनेकदा झोपही पूर्ण होत नाही. अनेकदा रात्री फक्त दोन तास झोप वगैरे झोप घेत आपण दिवसभर काम वगैरे केल्याच्या आनंदात रममाण असतो.

पण प्रकृतीला हे घातक आहे. शरिराला पुरेशी झोप आवश्यक असते.

रोज नऊ-दहा तास झोपावंच. सध्या थंडीच्या दिवसात जास्तच. पहाटे पहाटे मस्त दुलईत स्वत:ला लपेटून राहण्यातली मजा ती वेगळीच. अलार्म काय वाजतोच. स्नूझ चं बटणसुध्दा असतं. आणि जे या स्नूझ बटणाचा वापर करत आपल्या झोपण्याची वेळ वाढवत राहतात ते आपल्या महत्त्वाकांक्षी स्वप्नांना जास्त किंमत देतात.

वरच्या एका परिच्छेदातलं काहीही कोण्या शहाण्यासुरत्या माणसाने म्हटलेलं नाही. साऊथहॅम्पटन युनिव्हर्सिटीचा अभ्यास शास्त्रीय तत्वांवर आधारित आहे खरा पण त्यावर सोयीस्करपणे जरा जास्तच विसंबून राहू नका म्हणजे झालं !

Story img Loader