माँट्रियल न्यूरॉलॉजिकल इन्स्टिटय़ूट व मॅकगील विद्यापीठाचे ‘द न्यूरो’ हॉस्पिटल व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी केलेल्या संशोधनात मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग या तंत्राने बहुभाषक असलेल्या २२ स्त्री-पुरुषांचा अभ्यास करण्यात आला. त्यात ‘द न्यूरो’ हॉस्पिटलने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरचा वापर मेंदूचे स्कॅनिंग करण्यासाठी केला गेला. जर एखाद्या मुलाने जन्मत: दोन भाषा शिकल्या तर त्याच्या मेंदूच्या विकास प्रक्रियेत मेंदूची रचना बदलत नाही. बालपणात दुसरी भाषा नंतर शिकण्याचा प्रयत्न केला तर मात्र मेंदूची रचना बदलते किंवा त्याचा विकास वेगळ्या पद्धतीने होतो.
‘द न्यूरो’ च्या कॉग्निटिव्ह न्यूरोसायन्स युनिटचे संशोधक डॉ. डेनिस क्लेन यांनी सांगितले की, जेव्हा तुम्ही बालपणानंतर एखादी भाषा शिकण्याचा प्रयत्न करता तेव्हा मेंदूच्या इंफेरियर फ्रंटल कॉर्टेक्स या भागात जास्त बदल घडतात. थोडक्यात भाषा आकलनाशी संबंधित विचार करताना ती भाषा आपण कोणत्या वयात शिकतो याला महत्त्व आहे.
बालपणानंतर दुसरी भाषा शिकताना मेंदूत नेमका काय फरक होतो
जर त्या मुलाला अगोदर एक भाषा चांगली येत असताना त्याने दुसरी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला तर मेंदूतील फ्रंटल कॉर्टेक्स हा भाग काहीसा जाड होतो. उजवे इनफेरियर फ्रंटल कॉर्टेक्स हा भाग पातळ होतो. कॉर्टेक्स हा मेंदूतील अनेक थर असलेला भाग असतो व त्यात न्यूरॉन्स असतात ते मानवी आकलन क्षमता म्हणजे विचार, भाषा, स्मृती व जाणीव यांचा समावेश होतो. बालपणानंतर दुसरी भाषा शिकण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलांमध्ये न्यूरॉन्सची वाढ वेगळ्या पद्धतीने होते व त्यांच्या जोडणीचे क्रमही बदलतात. काही लोकांना दुसरी भाषा शिकण्यात नंतर अडचणी येतात त्याची कारणेही यातून स्पष्ट होणार आहेत.
मुले जेव्हा बालपणानंतर दुसरी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्या मेंदूच्या रचनेत फरक पडतो, असे नवीन संशोधनात दिसून आले आहे. यात गंमत अशी जन्मत: जर मुलाने दोन भाषा शिकल्या असतील तर मात्र मेंदूच्या रचनेत फरक पडत नाही.