सध्या पाय दुखण्याची तक्रार सर्व वयोगटांमध्ये सर्रास होताना दिसते. काहीवेळा खूप धावपळ झाली म्हणून तर काहीवेळा बराच काळ उभे राहील्याने, चालल्याने पाय दुखतात. अनेकांचे काम दिवसभर खुर्चीत बसून असते. यामध्ये पाय लटकत राहील्यानेही पायात वेदना होऊ शकतात. तर काही जणांचे वजन जास्त असल्याने गुडघे आणि टाचा दुखतात. जर एखाद्या आजाराने पाय सतत दुखत असतील, मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. पण इतर कारणांमुळे, पायदुखी होत असेल, तळपाय, नडगीचे हाड, पोटऱ्या दुखत असेल तर खालील गोष्टींवर लक्ष द्या
१. दूध प्या- दुधामध्ये कॅलशियम आणि ‘ड’ जीवनसत्व असते. लहानपणापासून जर मुले भरपूर दूध पीत असतील तर त्यांची हाडे मजबूत होतात आणि पाय दुखत नाहीत. वयाच्या पंचविशीपर्यंत दूध हा रोजच्या आहाराचा हिस्सा हवाच. पंचवीस ते पन्नास या काळात रोज कपभर दूध घ्यावे. पन्नाशीनंतर मात्र साय काढलेले दूध प्यायला हरकत नसते.
२. व्यायाम आणि खेळ- मैदानावरील खेळांनी, नियमित व्यायामाने हाडांचा कणखरपणा वाढतो. शाळा-कॉलेजच्या दिवसात रोज खेळणे शक्य असते, त्यानंतर नोकरी-धंद्यामुळे जर वेळ मिळत नसेल तर आठवड्यातून दोनदा तरी खेळावे. बॅडमिंटन, टेनिससारखे दोघा-तिघांच्या गटात खेळता येण्यासारखे खेळ यासाठी उपयुक्त ठरू शकतात. पस्तिशीनंतर मात्र प्रत्येकाने रोज किमान चालण्याचा व्यायाम करावा. योगासने, दोरीवरच्या उड्या, सूर्यनमस्कार यांचाही चांगला फायदा होतो.
३. धूम्रपान सोडा- तंबाखू, गुटखा आणि धूम्रपानामुळे पायांच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे थोडे जरी चालले तरी पाय आणि पोटऱ्या कमालीच्या दुखतात.
४. वजन कमी करा- आपले पूर्ण वजन आपल्या पायांवर पेलले जाते. त्य्तामुळे वजन वाढले की गुडघे, घोटे आणि टाचा दुखू लागतात.
५. आहार- शाकाहारामध्ये सीताफळ, दूध, दही, पनीर; तर मांसाहारात ट्युना आणि सामन मासे, मटण, अंड्यातील पिवळा बलक, कॉडलिव्हर ऑईल यातून कॅलशियम आणि ड जीवनसत्व मिळते. आपल्या आहारपद्धतीप्रमाणे यांचा भरपूर वापर करावा.