National Doctors’ Day 2022 Theme, History & Significance: आपल्या समाजासाठी आणि आपल्या निरोगी आरोग्यासाठी डॉक्टर खूप महत्त्वाचे आहेत. प्रत्येकालाच कधी ना कधी डॉक्टरांकडे जावेच लागते. सामान्यतः लोक आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी डॉक्टरांकडे जातात. लोकांच्या आरोग्याच्या संबंधित सर्व समस्यांचे इलाज उपलब्ध असतात. म्हणूनच आपण डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत १ जुलैला ‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ साजरा केला जातो.
डॉक्टरांना आपण जीवनदाता म्हणतो. त्यांचे कार्य मोठे आहेच, पण करोना काळात त्यांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. रुग्णांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांनी अथक परिश्रम केले. त्यांच्या या कामामुळेच त्यांना दिलेली ‘जीवनदाता’ ही उपमा किती योग्य आहे याची आपल्याला खात्री पटते. याच निमित्ताने आपण ‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ बद्दल जाणून घेऊया.
डॉक्टर्स डेचा इतिहास
१ जुलै १९९१ पासून देशात डॉक्टर्स डे साजरा करण्यास सुरुवात झाली. हा दिवस डॉ. बिधानचंद्र रॉय यांना समर्पित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रॉय यांचा जन्म १ जुलै १८८२ रोजी झाला होता. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर उपचार करणारे डॉ. बिधानचंद्र रॉय यांचे आरोग्य क्षेत्रात मोठे योगदान होते. या योगदानाचा गौरव करण्यासाठी १ जुलै रोजी ‘डॉक्टर्स डे’ साजरा केला जातो. तसेच १९७५ पासून चिकित्सा, विज्ञान, तत्वज्ञान, कला आणि साहित्य या क्षेत्रात अद्भूत कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी बी.सी. रॉय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
तुम्हालाही छातीच्या उजव्या बाजूला वेदना जाणवतात का? यामागे असू शकते ‘हे’ कारण
राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे महत्व
राष्ट्रीय डॉक्टर्स दिन सामान्यतः डॉक्टरांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. अर्थात रुग्णांना बरे करणे हे डॉक्टरांचे कर्तव्य असले, तरीही हे कर्तव्य पार पाडण्यासाठी डॉक्टर अहोरात्र मेहनत करतात. सहसा डॉक्टर चोवीस तास लोकांवर उपचार करण्यास तयार असतात. त्यांच्या तळमळीला आणि उत्कटतेला सलाम करण्यासाठी हा खास दिवस दरवर्षी साजरा केला जातो.
राष्ट्रीय डॉक्टर दिन कधी साजरा केला जातो?
जगातील प्रत्येक देशात वेगवेगळ्या तारखांना डॉक्टर्स डे साजरा केला जातो. भारतात दरवर्षी १ जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स दिन साजरा केला जातो. इंडियन मेडिकल असोसिएशन दरवर्षी देशात राष्ट्रीय वैद्यकीय दिन कार्यक्रम आयोजित करते.
डॉक्टर्स डे २०२२ ची थीम
या वर्षी म्हणजेच २०२२ साठी राष्ट्रीय डॉक्टर दिनाची थीम ‘फॅमिली डॉक्टर्स ऑन द फ्रंट लाइन’ अशी ठेवण्यात आली आहे.