भारतात अनेक ठिकाणी नागरिकांना डासांच्या समस्येचा सामना करावा लागतो. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यू, मलेरिया यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे या डासांना पळवून लावण्यासाठी अनेक कंपन्या बाजारात दिवसागणिक आपली उत्पादने आणत आहेत. मात्र, आता एलजी कंपनीने डासांना पळवणारा मोबाईल नुकताच भारतात लाँच केला आहे. K7i असे या मॉडेलचे नाव असून अशाप्रकारचा हा पहिलाच मोबाईल आहे.

या फोनमध्ये विशिष्ट पद्धतीचे ध्वनी तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, ज्यामुळे डास पळवून लावणे शक्त होते. या अल्ट्रासॉनिक लहरींमुळे निर्माण होणारा सूक्ष्म ध्वनी डासांना निष्प्रभ करतो व ते निपचित पडून राहतात. माणसासाठी याचा काहीही तोटा नाही असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. फोनमधील या तंत्रज्ञानामुळे वातावरण चांगले राहण्यास मदत होणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. K7i या फोनच्या वापरानंतर ग्राहकांच्या प्रतिक्रियांनुसार कंपनी आपल्या इतर मॉडेल्समध्येही या डास मारण्याच्या यंत्रणेचा समावेश करेल, असे सांगण्यात आले आहे. या फोनची किंमतही ७,९९० रुपये इतकी असून फोनचा डिस्प्ले ५ इंचाचा आहे.

या फोनमध्ये क्वाडकोअर प्रोसेसर वापरण्यात आला आहे. या फोनची रॅम २ जीबी असून इंटरनल स्टोरेज १६ जीबी आहे. याबरोबरच ८ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. २५०० मिलीअॅम्पियर्सची बॅटरीही देण्यात आली आहे. हा ड्युएल सिम फोन आहे. याआधी कंपनीने आपल्या एसीमध्ये हे तंत्रज्ञान बसवले होते. अल्ट्रासॉनिक लहरींच्या माध्यमातून खोलीतील डासांना पळवता येते असा दावा कंपनीने केला होता. या स्मार्टफोनची घोषणा करतानाच एलजीच्या यापुढील सर्व स्मार्टफोनमध्ये ‘क्नॉक क्नॉक’ यंत्रणा बसवण्याचीही घोषणा कंपनीने केली आहे.