कोरोना महामारीनंतर जगभरातील लोकांच्या जीवनशैलीत अनेक प्रकारचे बदल झाले. कोरोनाचा संसर्ग आता बऱ्यापैकी कमी झाला असला तरीही, अनेक लोकांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये कोरोना काळात लागलेल्या सवयींचा प्रभाव जाणवतो. यामध्ये तोंडाला मास्क लावने, सॅनिटायझरने सतत हात धुणे अशा अनेक सवयी लोकांच्या अंगवळणी पडल्या आहेत.
कोरोना काळात जगभरात एक सर्वात मोठी कार्यप्रणाली अमंलात आली ती म्हणजे ‘वर्क फ्रॉम होम’ (WFH), या कार्यप्रणालीमुळे अनेक कंपन्यांनी कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून, कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची मुभा दिली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला, ऑफीस पुन्हा सुरू झाली तरीही ‘वर्क फ्रॉम होम’ची पद्धत बंद झालेली नाही.
त्यामुळे आजही अनेक कंपन्यामध्ये कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्यास सांगितलं जातं. सुरुवातीला अनेकांना घरुन काम करणं आवडात होतं. कारण, घरातून काम केल्यामुळे त्यांना प्रवास करावा लागत नव्हता, शिवाय घरातील लोकांना वेळही देता येत होता. पण सुरुवातीला आवडीच्या वाटणाऱ्या ‘WFH’च्या पद्धतीला कंटाळून अनेक कर्मचारी काम सोडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
द गार्डियनने दिलेल्या माहितीनुसार, अनेक कर्मचाऱ्यांच्या घरात ऑफिसप्रमाणे बसण्याची व्यवस्था नसते. अनेक लोकं काम करताना चुकीच्या पद्धतीने बसतात आणि त्यांच्या या चुकीच्या सवयींमुळे त्यांना मान आणि पाठदुखीचा त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे युरोपसह, अमेरिकेतील अनेक कर्मचाऱ्यांनी ‘WFH’ला कंटाळून नोकऱ्या सोडल्याची माहिती समोर आली आहे.
आणखी वाचा- लहान मुलांना घरी एकटं ठेवण्यापुर्वी कोणती काळजी घ्यावी जाणून घ्या
दरम्यान, ब्रिटनच्या ‘ऑफिस फास नेशनल स्टेटिस्टिक्स’च्या अहवालानुसार ३ वर्षापुर्वी आजारपणात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या २० लाख होती, ती आता २५ लाखाच्या वर गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जवळपास ६२ हजार लोकांना WFH मुळे कंबर आणि मानेचा त्रास जाणवू लागला आणि याच त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या सोडल्या आहेत. ब्रिटनमध्ये मानसिक त्रासाला कंटाळून नोकरी सोडणारे क्रमांक एकवर आहेत तर वर्क फ्रॉम होमला कंटाळून काम सोडणारे दुसऱ्या नंबरला आहेत.
नक्की काय होतोय ‘WFH’चा त्रास –
आरोग्य तज्ञांच्या म्हणण्यानुसार, मान आणि पाठदुखीचा त्रास होण्यास, लॅपटॉप आणि कॉम्पुटरसमोर तासंतास बसणं, काम करताना मान वाकवणं, चुकीच्या पद्धतीने बसणं अशा सवयी कारणीभूत आहे. शिवाय हा त्रास २५ ते ४५ वयोगटातील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याचंही तज्ञांनी सांगितलं आहे.