डॉ. विक्रम चौधरी
यकृताचा कर्करोग पोटाच्या प्रमुख कर्करोगांपैकी एक आहे आणि त्याचे प्रमाण भारतात वाढत आहे. प्रति एक लाख लोकसंख्येमागे दरवर्षी २ व्यक्तींना हा कर्करोग होतो. यकृताच्या कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा, जो मुख्य प्रकारच्या यकृत पेशी (हेपॅटोसाइट) मध्ये सुरू होतो. इतर प्रकारचे यकृत कर्करोग, जसे की कोलँजिओकार्सिनोमा आणि हेपॅटोब्लास्टोमा, खूपच दुर्मीळ आहेत.
यकृत कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात बहुतेक लोकांमध्ये लक्षणे नसतात. लक्षणे दिसतात तेव्हा कर्करोग अनेकदा प्रगत टप्प्यांमध्ये असतो. प्रयत्न न करता वजन कमी होणे, भूक न लागणे, पोटदुखी, मळमळ आणि उलटी, अशक्तपणा आणि थकवा, पोटात सूज (जलोदर), कावीळ अशी लक्षणे यकृताच्या कर्करोगात असू शकतात.
*कर्करोगाची कारणे
क्रॉनिक हिपेटाइटिस बी आणि हिपेटाइटिस सी या विषाणूंमुळे अथवा अतिमद्य सेवन केल्याने यकृताचे अपरिवर्तनीय नुकसान होऊन यकृत सिरोसिस होऊ शकतो, जे कर्करोग होण्याचे एक प्रमुख कारण आहे. यकृताच्या पेशींमधील डीएनए उत्परिवर्तनामुळे यकृताचा कर्करोग होऊ शकतो. काही आनुवंशिक रोग, मधुमेह , स्टिअटोहेपॅटिटिस (फॅटी लिव्हर), अफ्लाटॉक्सिन्सने इत्यादी कारणांनी यकृताच्या कर्करोगाचा धोका वाढतो. काहीवेळा यकृताचा कर्करोग कशामुळे होतो हे अस्पष्ट असते.
*तपासणी आणि निदान
शारीरिक तपासणीदरम्यान यकृताच्या कर्करोगाची चिन्हे आणि लक्षणे आढळल्यास विविध चाचण्यामार्फत यांचे निदान केले जाते. यकृताची कार्यक्षमता तपासणी, ,अल्फा-फेटोप्रोटीन (एएफपी) आणि सोनोग्राफी यासारख्या चाचण्या करून कर्करोगाची पूर्वतपासणी केली जाते. यात काही आढळल्यास खात्री करण्यासाठी बायोप्सी, सिटी स्कॅन किंवा एमआरआय अशा अधिक प्रगत चाचण्या केल्या जातात. या चाचण्या कर्करोगाचे निदान करण्यासह आजाराचा टप्पा आणि उपचारांची दिशा ठरविण्यास फायदेशीर असतात.
बार्सिलोना क्लिनिक लिव्हर कॅन्सर सिस्टीम (BCLC) किंवा इतर AJCC-TNM स्टेजिंग पद्धतीचा उपयोग करून पुढील उपचारांचे नियोजन केले जाते. गाठीचा म्हणजेच टय़ूमरचा आकार, लक्षणे, सिरॉसिस स्टेज (ए, बी, सी ) इत्यादी घटक प्रारंभिक किंवा प्रगत टप्पा आहे का हे ठरवतात. शस्त्रक्रिया कर्करोगास समूळ नष्ट करण्याचा महत्त्वाचा मार्ग असून आणि शक्य असल्यास उपचाराचा प्रथम पर्याय असतो. यकृताचा काही भाग काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया, यकृत प्रत्यारोपण, यकृताच्या धमनी एम्बोलायझेशन आणि अॅब्लेशनसारख्या यकृत-निर्देशित उपचारांव्यतिरिक्त, केमोथेरपी, केमोइम्बोलायझेशन, रेडिएशन थेरपी, रेडिओइम्बोलायझेशन, इम्युनोथेरपीचे पर्यायदेखील यकृत कर्करोगाच्या उपचारांमध्ये उपलब्ध आहेत.
*प्रतिबंध
यकृत सिरोसिस होऊ नये याची काळजी घेतल्यास यकृत कर्करोगाची शक्यताही कमी होते. शक्यतो मद्यपान टाळावे किंवा त्याचे प्रमाण कमी करावे. निरोगी आहार घेणे. नियमित व्यायाम करून वजन कमी करणे आणि ते नियंत्रित ठेवणे . हिपेटाइटिस बी ची लस घेऊन याचा धोका टाळणे शक्य आहे. सुरक्षित लैंगिक संबंध ठेवा. अमली पदार्थाचे सेवन करू नये. टोचून घेताना किंवा टॅटू काढताना आरोग्यदृष्टय़ा आवश्यक काळजी घेतली जात असल्याची खात्री असलेल्या ठिकाणीच करून घेणे. भारतात, ७० ते ८० % यकृतांचे कर्करोग हे हिपेटाइटिस बी विषाणूशी (एचबीव्ही) संबंधित आहेत. अंदाजे १५ टक्के हिपेटाइटिस सी विषाणू (एचसीव्ही), आणि अंदाजे ८ ते १० टक्के रुग्णांमध्ये अल्कोहोल सेवनामुळे हा आजार होतो. ही सर्व कर्करोगाची कारणे टाळता येण्यासारखी असल्यामुळे, यकृताचा कर्करोग टाळता येऊ शकतो.
(लेखक पोटाच्या विकारांचे शल्यचिकित्सक आहेत.)
संकलन- डॉ. शैलेश श्रीखंडे