कुटुंबीयांपासून दूर राहणाऱ्या व्यक्ती सकस आहारापासून वंचित राहतात आणि त्यामुळे त्यांना आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात, असे नव्या संशोधनात स्पष्ट झाले आहे.

तसेच, स्वयंपाक बनवण्यासाठी आवश्यक कौशल्याचा अभाव आणि खरेदीसाठी सहकारी नसल्यामुळे केवळ पोट भरण्यासाठी आवश्यक आहार घेतला जातो. कुटुंबीयांपासून दूर राहणाऱ्या महिलांच्या तुलनेत पुरुषांनाच सकस आहारापासून वंचित राहावे लागते, असेही क्वीन्सलॅण्ड तंत्रज्ञान विद्यापीठाने केलेल्या संशोधनात उघड झाले आहे.
डॉ. कॅथरिन हाना आणि डॉ. पीटर कोलिन्स यांनी पोषणशास्त्रासंबंधी आधीच्या ४१ संशोधनांचा अभ्यास करून हे नवे संशोधन मांडले आहे. तसेच, त्यांनी कुटुंबापासून दूर राहणाऱ्यांच्या आहाराचाही अभ्यास केला.
कुटुंबापासून दूर राहणाऱ्या व्यक्तींच्या आहारात विविधतेचा अभाव असतो. त्यांच्या आहारात फळे, पालेभाज्या आणि मासे यांचे प्रमाण कमी असते, असे हाना यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या की, एकांतात राहणाऱ्या व्यक्तींना सकस आहार घेण्यात अडथळा येतो. तसेच, त्यांचा आहार आणि तो बनविण्यावर सांस्कृतिक आणि सामाजिक प्रभाव असतो, असा आमचा निष्कर्ष आहे. अन्न बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळत नसल्यामुळे अशा व्यक्ती कमी प्रतीचा आहार घेतात. त्यामुळे अशा आहाराचा आरोग्यावर परिणाम होतो.
घटस्फोट झाल्यावर पुरुषांमध्ये पोषक आहार बनविण्यासाठी आवश्यक कौशल्याचा अभाव स्पष्टपणे जाणवतो. त्यामुळे निरोगी आणि सकस आहार बनविणे त्यांना शक्य होत नाही, असेही हाना यांनी सांगितले.
आर्थिक परिस्थितीमुळेही काही जणांना आरोग्यदायी आहार घेता येत नाही, असेही या अभ्यासात स्पष्ट करण्यात आले आहे.

Story img Loader