जग सध्या कधी नव्हे इतके तंत्रज्ञानाने सांधले गेले आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या समाजमाध्यमांतून व्यक्ती अनेक जणांशी सतत जोडलेल्या असतात. पण असे असूनही जगात एकटेपणाची समस्या वाढत असून ती आरोग्यासाठी स्थूलपणा, धूम्रपान आदी बाबींपेक्षा खूप घातक सिद्ध होत आहे, असे अभ्यासात दिसून आले आहे.
सिग्ना नावाच्या वैद्यकीय विमा कंपनीने केलेल्या पाहणीत असे आढळून आले की अमेरिकेतील ४७ टक्के नागरिकांना एकटेपणाची भावना सतावते, तर ४७ टक्के नागरिकांना समाजाने त्यांना सोडून दिल्यासारखे वाटते. अमेरिकेतील ५४ टक्के नागरिकांना असे वाटते की त्यांना कोणीही व्यवस्थित ओळखत नाही. तेथील १० पैकी ४ जणांना वाटते की, त्यांचे अन्य जणांशी असलेले नातेसंबंध फारसे अर्थपूर्ण नाहीत.
सिग्नाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मानसिक आरोग्यतज्ज्ञ डग्लस नेमेसेक यांच्या मते एकटेपणाच्या समस्येने प्रगत जगात विक्राळ रूप धारण केले आहे. अति स्थूलपणा किंवा एका दिवसाला १५ सिगारेट ओढणे यापेक्षा एकटेपणा घातक आहे. सतत एकटे राहण्याने निराशा, हृदयरोग, अल्झायमर्स डिसीझ, स्ट्रोक यांसारखे धोके संभवतात. त्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. तसेच कर्करोगासारख्या व्याधींमधून बरे होण्याची शक्यता कमी होते. इतकेच नाही तर एकटेपणा अकाली मृत्यूस कारणीभूत ठरतो.
या समस्येकडे एड्सच्या समस्येइतकेच गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, असे तज्ज्ञांना वाटते. तसेच योग्य प्रमाणात झोप किंवा विश्रांती घेणे, व्यायाम करणे, मित्रमंडळी आणि नातेवाईकांमध्ये मिसळणे, काम, करमणूक आणि वैयक्तिक जीवनाचा समतोल राखणे, योग्य आहार घेणे याने या समस्येवर मात करता येऊ शकते, असेही म्हटले आहे.