दत्तसंप्रदायाचा प्रभाव महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाहायला मिळतो. त्या मानाने भारताच्या इतर भागात दत्तभक्ती इतक्या मोठय़ा प्रमाणावर दिसत नाही. महाराष्ट्रात तर दत्तभक्ती एवढी खोलवर रुजली आहे की दत्तात्रेयांची मंदिरे आपल्याला गावोगावी आणि शहरांमध्ये तर रस्तोरस्ती दिसतात. अत्यंत लोकप्रिय असा हा संप्रदाय असून या संप्रदायामध्ये दत्तात्रेयाइतकेच महत्त्व त्या संप्रदायातील अधिकारी व्यक्तींना, आणि गुरू-शिष्य परंपरेलापण आहे. थोर महात्मे आणि अवतार पुरुष यांची मांदियाळीच आपल्याला या इथे पाहायला मिळते. श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी अशा अत्यंत उच्चकोटीच्या साधकांमुळे हा संप्रदाय खूप मोठय़ा प्रमाणावर जनमानसात रुजला गेला. योगमार्गाने परमात्म्याची प्राप्ती हे या संप्रदायाचे ध्येय दिसते. वेगवेगळे चमत्कार, भूत-पिशाच्च पीडाहरण या गोष्टी तर या संप्रदायाच्या अविभाज्य घटकच झाल्या आहेत. दत्ताच्या मूर्तीएवढेच या संप्रदायात दत्ताच्या पादुकांनाही मोठे महत्त्व आहे. अनेक मंदिरांमध्ये फक्त दत्त-पादुकांची पूजा केली जाते. गिरनार पर्वत, पीठापूर, कुरवपूर, गाणगापूर, अक्कलकोट, नरसोबाची वाडी, औदुंबर ही स्थाने म्हणजे तर दत्तसंप्रदायाची तीर्थक्षेत्रे आहेत. अनेक जण अनेक वेळा या ठिकाणी दर्शनाला जाऊन येतात, परंतु या स्थानांसोबतच महाराष्ट्रात आणि नजीकच्या प्रदेशात काहीशी निराळी, काही वैशिष्टय़े असलेली दत्तस्थानेसुद्धा आहेत. यातली काही स्थाने ही त्या संप्रदायातील अधिकारी व्यक्तींमुळे महत्त्वाची आहेत. तर काही स्थाने ही तिथल्या रूढी, परंपरा यामुळे काहीशी वेगळी आहेत. महाराष्ट्र आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशात जरी दत्तसंप्रदाय दिसत असला तरीसुद्धा आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की नेपाळच्या भटगाव अथवा भक्तपूर इथेसुद्धा दत्तात्रेयाचे मंदिर आणि उपासना आढळते. चित्रकुटाजवळील अनसूया पर्वत ही श्रीदत्तात्रेयांची जन्मभूमी असल्याचे स्थानिक लोक मानतात. तसेच येथील एकमुखी आणि द्विभुज असे दत्तस्थान हे दत्तात्रेयांचे आद्य स्वरूप म्हणून नेपाळमध्ये पूजले जाते. इतक्या लांबपर्यंत हा संप्रदाय आणि ही उपासना गेली हेसुद्धा या संप्रदायातील चमत्कारांइतकेच नवलाईचे आहे. हिंदू आणि मुसलमान अशा दोन्ही धर्मामध्ये भक्त मंडळी असलेला बहुधा हा एकमेव संप्रदाय असेल. म्हणूनच विजापूरला आपल्याला इब्राहिम आदिलशाहनी बांधलेले दत्तमंदिर पाहायला मिळते आणि त्याचा संदर्भ थेट गुरुचरित्रात सापडतो. महाराष्ट्राच्या भटकंतीमध्ये जागोजागी आपल्याला दत्तमंदिरे आढळतात. त्या प्रत्येक ठिकाणाशी काही ना काही कथा निगडित असते, कोणता तरी चमत्कार निगडित असतो आणि अनेक ठिकाणे ही कोणा सत्पुरुषाच्या वास्तव्यामुळे अत्यंत कडक किंवा जागृत झालेली दिसतात. अनुसरायला बहुधा सोपा आणि सर्वसामान्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा, त्यांना अगदी आपला वाटणारा असा हा संप्रदाय असून या संप्रदायातील आगळीवेगळी स्थाने जी मुद्दाम पाहिली जात नाहीत त्यांचा काहीसा धांडोळा इथे घेतलेला आहे. या ठिकाणच्या जवळपास आपण बरेचदा गेलेलो असतो, परंतु हे ठिकाण काहीसे बघण्याजोगे आहे हे लक्षात येत नाही. नेहमीप्रमाणेच राजमार्गावरून प्रवास करण्याऐवजी आडवाटेवरून केलेल्या या भटकंतीमध्ये जागोजागी दत्तस्थानांचे दर्शन झाले आणि ही भटकंती अजूनच समृद्ध झाली.
सायंदेव दत्तक्षेत्र – कडगंची
कर्नाटक राज्यात गुलबग्र्यापासून २१ कि.मी. वर गुलबर्गा-आळंद रस्त्यावर असलेले हे दत्तक्षेत्र सायंदेवाचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्री नृसिंह- सरस्वतींच्या करुणा पादुकांची इथे स्थापना केलेली आहे. दत्तात्रेयांची काळ्या पाषाणातील अत्यंत विलोभनीय मूर्ती इथे विराजमान झालेली दिसते. श्रीदत्तात्रेयांच्या अवतारपरंपरेतील श्रीनृसिंहसरस्वतींचा चरित्र व कार्यविषयक प्रमाणग्रंथ म्हणजे त्याचे शिष्य श्री सायंदेव यांच्या पाचव्या पिढीतील सत्पुरुष श्री सरस्वती गंगाधर यांनी श्रीगुरुचरित्र हा लिहिलेला प्रासादिक आणि उपदेशस्वरूप ग्रंथ होय. सायंदेव हे कडगंचीचे असल्यामुळे श्रीसरस्वती गंगाधर यांनी हा ग्रंथ कडगंची इथेच लिहिला. त्याची मूळ प्रत इथे आहे. सध्या त्यावरच दत्तमंदिर उभे असून ते आता श्रीसायंदेव दत्तक्षेत्र संस्थान या नावाने परिचित आहे. गुरुचरित्राची मूळ प्रत इथे असल्याने श्रीनृसिंहसरस्वती यांची वाङ्मयमूर्तीच इथे आहे असे समजले जाते. दत्तसंप्रदायामध्ये दत्तगुरूंच्या पादुकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीनृसिंहसरस्वतींचे चार पट्टशिष्य होते. सायंदेव, नंदीनामा, नरहरी आणि सिद्धमुनी. नृसिंहसरस्वतींच्या पादुका सायंदेव यांना पूजेसाठी मिळाल्या होत्या. सायंदेव यांच्या कडगंची येथील घरी त्यांच्या वंशजांनीसुद्धा त्या जतन करून ठेवल्या होत्या. त्यांनाच करुणापादुका असे म्हणतात. देवस्थानातील दत्तात्रेयांच्या मूर्तीजवळ या पादुका ठेवलेल्या आहेत. सायंदेवांच्या राहत्या घराचे पुनरुज्जीवन करून तिथे सध्याचे श्रीसायंदेव दत्तक्षेत्र संस्थान झाले आहे. श्रीशिवशरणप्पा मादगोंड यांनी अपार कष्ट करून या देवस्थानाचा जीर्णोद्धार केला आहे. जवळच असलेल्या गाणगापूरला निर्गुण पादुका आणि कडगंची इथे असलेली श्रीगुरुचरित्राची मूळ प्रत यामुळे ही दोन्ही ठिकाणे दत्तसंप्रदायामध्ये महत्त्वाची ठरली आहेत. दत्तजयंतीच्या निमित्ताने ‘कडगंची कस्तुरी’ नावाची स्मरणिका दर वर्षी इथे प्रकाशित केली जाते. संस्थानची गोशाळा असून भक्तांसाठी यात्रीनिवासाची सोय इथे आहे.
दत्तात्रेयांचे भिक्षाटन स्थान – कोल्हापूर</strong>
साडेतीन शक्तिपीठांपैकी कोल्हापूर हे अर्धे शक्तिपीठ आहे. श्रीदत्तात्रेय याच स्थानी भिक्षा मागण्यासाठी नेमाने येत असत असे मानले जाते. दत्तात्रेयांचे अंशावतार मानले गेलेले कुंभारस्वामी यांनी हे स्थळ आपल्या अवतार कार्यासाठी निवडले होते. स्वामींचा निवास असलेल्या कुंभार गल्लीमध्ये सुंदर असे दत्तमंदिर आहे. या मंदिरात गेलेल्या व्यक्तीला हमखास मन:शांती लाभते असे सांगितले जाते. इथे दत्तजयंती, कुंभारस्वामी जयंती-पुण्यतिथी इत्यादी उत्सव समारंभ साजरे होत असतात. भिक्षा-लिंग-स्थान या नावाचे अजून एक दत्तमंदिर कोल्हापुरात आहे. वेशीजवळचे हे स्थानदेखील जागृत असल्याचे सांगतात. कोल्हापूरपासून ४ किमी.वर प्रयाग नावाच्या तीर्थस्थानी दत्ताच्या पादुका असून हे एक अत्यंत पवित्र ठिकाण मानले गेलेले आहे.
माणिकनगर
सदानंदस्वामी, शिवरामस्वामी, पूर्णानंदस्वामी अशा अनेक संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या जयसिंगपेठ किंवा हुमणाबाद परिसरात दत्तात्रेयांचे चौथे अवतार मानण्यात आलेल्या श्रीमाणिकप्रभूंचा जन्म झाला. हैदराबादमधील कल्याण या गावात मनोहर माणिक आणि बायादेवी यांच्या पोटी माणिकप्रभूंचा जन्म झाला. बीदर तालुक्यातील हुमणाबाद या तालुक्याच्या ठिकाणापासून फक्त एक कि.मी.वर असलेले हे क्षेत्रदत्तभक्तांमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. हुमणाबादजवळ दोन ओढय़ांच्या संगमावर वसलेले माणिकनगर हे त्यांच्याच कृपेचे फळ होय. मार्गशीर्ष शुद्ध दशमी शके १७८७ मध्ये त्यांनी समाधी घेतली. अहमदाबाद येथील बाबा त्रिवेदी महाराज या सिद्ध पुरुषास माणिकप्रभूंचा साक्षात्कार आणि दर्शन याच क्षेत्री घडले असे सांगतात. त्याचप्रमाणे हंपी मठ आणि शृंगेरी मठाच्या शंकराचार्याचा एकदा वर्चस्वावरून वाद झाला. कोणते पीठ सर्वोच्च आणि कोणते पीठ दुय्यम यावरून तो वाद होता. दोन्ही शंकराचार्याचा श्री माणिकप्रभूंवर विश्वास होता आणि त्यांनी यामध्ये मध्यस्थी करावी अशी इच्छा होती. त्यानुसार श्रीमाणिकप्रभूंनी योग्य ती मध्यस्थी करून हा वाद कायमचा मिटवला आणि दोन्ही पीठांना एक नियमावली घालून दिली जी आजही पाळली जाते. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या वेळी नानासाहेब पेशव्यांनी आपला खाशा माणूस, रंगराव यांना श्रीमाणिकप्रभूंच्या दर्शनासाठी आणि त्यांचा या उठावाला आशीर्वाद मिळवण्यासाठी पाठवला होता. दत्तजयंती हा येथील मुख्य उत्सव आहे. तसेच माणिकप्रभूंची जयंती आणि पुण्यतिथी इथे मोठय़ा उत्साहात साजरी केली जाते. हुमणाबाद हे पुणे हैदराबाद महामार्गावर आणि बीदर बंगळूरू राज्य मार्गावर वसलेले शहर आहे. जवळचे रेल्वे स्टेशन गुलबर्गा असून इथून हुमणाबाद ६५ कि.मी. अंतरावर आहे. देवस्थानतर्फे नित्य अन्नदान सेवा, शाश्वत सेवा आणि वेदपाठशाळा, संस्कृत पाठशाळा, संगीत विद्यालय, अनाथालय, असे अनेक उपक्रम चालवले जातात. भक्तांसाठी मरतड विलास आणि माणिक विहार असे दोन भक्तनिवास असून भोजनाची सोय नित्य अन्नदान योजनेअंतर्गत मोफत केली जाते.
दत्तात्रेय क्षेत्र-चौल
ऐतिहासिक शहर चंपावतीनगर म्हणजेच आजचे चेऊल अथवा चौल होय. रेवदंडय़ापासून जेमतेम ४-५ कि.मी.वर वसलेले शांत सुंदर चौल. आजूबाजूला भातशेती, कोंकणी कौलारू घरे आणि फणसाच्या झाडांची सोबत लाभलेलं टुमदार चौल. पावसाळ्यात पाणी घरात येऊ नये म्हणून इथली घरे एका चौथऱ्यावर बांधलेली आढळतात. रायगड जिल्ह्य़ातील अलिबाग, थळ, साखर, अक्षी इत्यादी आठ आगरांच्या मिळून बनलेल्या समूहाला अष्टागर हे नाव पडले आहे. चौल हे या अष्टागरांचे राजधानीचे ठिकाण होते. चौलपासून जवळच असलेल्या एका टेकडीवर हे दत्तस्थान आहे. ही टेकडी दत्ताची टेकडी या नावाने ओळखली जाते. टेकडीच्या पायथ्याशी भोपाळे तळे या नावाचे एक तळे लागते. तळ्याच्या शेजारूनच पुढे दत्तमंदिराकडे जाण्यासाठी जवळजवळ १५०० सिमेंटच्या पायऱ्या चढून जावे लागते. मोठय़ा पायऱ्या आणि दोन्ही बाजूंना असलेली झाडे यामुळे ही चढण त्रासदायक होत नाही. तसेच वाटेत विश्रांतीसाठी बाके केलेली आहेत. डोंगरमाथ्यावरून रेवदंडा परिसराचा देखावा केवळ अप्रतिम दिसतो. वरती गेल्यावर समोर एक मठ लागतो. तिथे दोन औदुंबर वृक्ष आहेत. त्या वृक्षांखालीच पहिल्यांदा दत्तपादुका होत्या. इथेच वरच्या बाजूला एका मंदिरात दत्तमूर्ती व त्या मूर्तीच्या पुढय़ात मूळ पादुका आहेत. इथे हरेरामबुवा, मुरेडेबुवा, बजरंगदासबुवा, दीपवदासबुवा अशा सत्पुरुषांचे वास्तव्य होते. पैकी मुरेडेबुवांची इथे समाधी आहे. सन १९६३ साली या स्थानाचा जीर्णोद्धार करण्यात आला. इथे मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला खूप मोठी यात्रा भरते.
श्री दत्त ब्रह्म यंत्र – कोळंबी
मराठवाडा जसा मंदिर स्थापत्याच्या दृष्टीने संपन्न आहे तसाच तो अनेक वैशिष्टय़पूर्ण गोष्टींनी पण नटला आहे. कोळंबीचे दत्त मंदिर हे पण त्यातलेच एक वैशिष्टय़ होय. नांदेड जिल्ह्यतील नायगाव तालुक्यात नांदेड ते देगलूर मार्गावर काहळापासून अंदाजे ८ कि.मी.वर कोळंबी हे गाव आहे. या गावाच्या पूर्वेला एक मठ आहे, तो मठ म्हणजेच इथले दत्तसंस्थान होय. इथले वैशिष्टय़ म्हणजे इथे श्री दत्तात्रेय आणि त्यांची माता अनसुया यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना केलेली आहेच, शिवाय त्याच्या जवळच एका पाषाणावर कोरलेल्या ब्रह्मयंत्राचीची प्रतिष्ठापनासुद्धा केलेली दिसते. याला श्रीयंत्र असेही म्हणतात. या ब्रह्मयंत्रावर विविध प्रकारची चिन्हे कोरलेली आहेत. एकूणच अशा प्रकारची ब्रह्मयंत्रे फारच कमी आढळतात. नेपाळ, काशी,श्रंगेरी आणि कोळंबी अशाच ठिकाणी ही यंत्रे असल्याचे दिसते. यांपैकी काशी येथील यंत्र हे मॅक्सम्युलर स्वत:बरोबर इंग्लंडला घेऊन गेला. शिवबक्ष नावाच्या एका योगी व्यक्तीने आपल्या योगविद्येच्या आणि सामरा शास्त्राच्या सहाय्याने मुखेडजवळील डोंगरातून वरील ब्रह्मयंत्र शोधून काढले व त्याची कोळंबी येथील मठांत स्थापना केली असे इथे सांगितले जाते. कोळंबी इथे कार्तिक शुद्ध पौर्णिमेला तीन दिवस मोठा उत्सव होतो. पहिल्या दिवशी अन्नपूजा, दुसऱ्या दिवशी महापूजा, तिसऱ्या दिवशी पालखी आणि चौथ्या दिवशी काला असा भरगच्च कार्यक्रम असतो. ब्रह्मयंत्रास पंचामृत स्नान घालून त्यावर तांदुळाची रास रचतात. राशीतील तांदळावर यंत्राप्रमाणे चिन्हे काढतात. हा सोहळा मोठा प्रेक्षणीय असतो. मंदिराच्या पूजेची व्यवस्था मठाधीश महंताकडे असते. हा महंत ब्रह्मचारी असावा लागतो. अनेक खचलेल्या, पिचलेल्या लोकांना हे देवस्थान म्हणजे एक संजीवनीच वाटते. इथे आल्यावर अनेक शारीरिक आणि मानसिक व्याधी बऱ्या होतात असा गाढ विश्वास भक्तमंडळींमध्ये आहे. ‘देवदत्त गुरुदत्त’ असा नामघोष या ठिकाणी अव्याहत केला जातो.
दत्तमहाराज मंदिर – अष्टे
वेगळ्या वाटा धुंडाळत चालताना जशी आगळीवेगळी माणसे भेटतात त्याचप्रमाणे काही निराळी आणि छानशी ठिकाणेसुद्धा दर्शन देऊन जातात. खरं तर ही ठिकाणं जायच्या यायच्या वाटेपासून अगदी जवळ असतात, पण मुद्दाम त्यांना भेट देण्याचे राहूनच जाते. असेच एक स्थान आहे सांगली जिल्ह्यतील वाळवा तालुक्यातील अष्टे गावचे. दत्तमहाराज मंदिर या नावाने प्रसिद्ध असलेले हे एक जागृत देवस्थान आहे. अष्टे या नावाच्या मागे काही दंतकथा निगडित आहेत. प्रभू रामचंद्रांनी या ठिकाणी आठ शिवलिंगांची स्थापना केली होती म्हणून या गावास अष्टे हे नाव पडले असे सांगितले जाते. या गावी सदानंदस्वामी या महात्म्याचे वास्तव्य होते. इथे श्रीदत्तमहाराज या नावाचे एक मोठे सिद्ध पुरुष होऊन गेले. त्यांचे मूळचे नाव नरहरी दिवाण. ते एकनाथमहाराजांच्या मुलीच्या वंशाचे असल्याचे सांगतात. ते ब्रह्मचारी होते तसेच ते हठयोगीहोते. इ.स.१९६३ मध्ये त्यांनी अष्टे या गावी समाधी घेतली. समाधी मंदिरातच श्रीदत्तयंत्र आणि दत्तमूर्ती ठेवण्यात आलेली आहे. दत्तमहाराजांच्या गुरूंचे नाव श्रीहरिहरस्वामी असे होय. ते वऱ्हाडातील होते. श्री वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामींकडून श्री दत्तमहाराजांनी योगसाधना प्राप्त करून घेतली. त्यानंतर १२ वर्षे तपश्चर्या करून त्यांनी कृष्णा प्रदक्षिणा केली. कर्नाटकातील तंजावर इथे त्यांचे काही दिवस वास्तव्य होते. याच काळात श्री दत्त प्रभूंचा त्यांच्यावर अनुग्रह झाला. असे दंतकथा सांगते. दत्तात्रेयांच्या आदेशावरून ते बुवांचे वाठार या आपल्या गावी गेले. त्यानंतर सर्व महाराष्ट्रभर संचार करून शेवट त्यांनी अष्टे इथे समाधी घेण्याचे ठरवले. आपल्या समाधीची वेळ, तिथी त्यांनी अष्टेकरांना सांगितली होती. तसेच समाधीची जागाही दाखवली होती. त्या जागी एक मंदिर बांधावे असे त्यांनी लोकांना सांगितले. परंतु लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी स्वामींनी सांगितलेल्या जागी फाल्गुन शुद्ध षष्ठी या तिथीला उघडय़ावरच समाधी घेतली. मग मात्र गावकरी जागे झाले. तत्कालीन कलेक्टर श्री. ट्रॉटमन आणि अष्टे नगरपालिकेचे अध्यक्ष खर्डेकर यांच्या प्रयत्नाने तिथे समाधी मंदिर बांधण्यात आले. समाधि स्थानाच्या वरती दत्तयंत्र आणि दत्तमूर्तीची स्थापना करण्यात आली. ही दत्तमूर्ती स्वामींना दुपारच्या भिक्षेत मिळालेली होती. या ठिकाणी फाल्गुन शुद्ध षष्ठीला मोठा उत्सव होतो. तसेच दत्तजयंती इथे मोठय़ा प्रमाणावर साजरी केली जाते. श्रींची मनोभावे सेवा केल्यास संकटे नाहीशी होतात असा भाविकांचा अनुभव आहे.
भगवान दत्तात्रेय-खामगाव
विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव हे एक ठिकाण. या ठिकाणी संत पाचलेगावकर महाराजांचा मुक्तेश्वर आश्रम आहे. या मंदिरातील पंचधातूची तीन डोकी व सहा हातांची दत्ताची मूर्ती आहे. ही मूर्ती श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांनी करून घेतली होती व आपल्यानंतर ती पाचलेगावकर महाराजांनाच देण्यात यावी असे सांगून ठेवले होती. त्याप्रमाणे ही मूर्ती संत पाचलेगावकर यांना मिळाली आणि त्यांनी तिची मुक्तेश्वर मंदिरात प्रतिष्ठापना केली. परंतु इथले खरे वैशिष्टय़ म्हणजे श्री संतपाचलेगावकर महाराजांना प्राप्त झालेल्या दत्तात्रेयाच्या निर्गुण पादुका होत. मुक्तेश्वर मंदिराच्या महाद्वाराखाली जमिनीत एक तळघर तयार करण्यात आले असून त्यात या पादुकांची स्थापना मार्गशीर्ष वद्य १२ ला करण्यात आली. पादुकांच्या मागेच श्रीपाद श्रीवल्लभस्वामींची अत्यंत देखणी अशी स्फटिकाची मूर्ती बसविण्यात आली आहे. या पादुकांसंबंधी एक कथा सांगतात ती अशी की एकदा श्री पाचलेगावकर महाराजांना गाणगापूरला पादुकांचे दर्शन घेण्यास अटकाव करण्यात आला. महाराज काही न बोलता बाहेर आले आणि एका औदुंबर वृक्षाखाली साधनेला बसले. इकडे आरतीच्या वेळी निरांजनाची वात काही केल्या पेटेना. शेवटी एका वृद्धास आधीचा प्रसंग आठवला आणि महाराजांची ओळख पटली. पुढे श्रीपाद श्रीवल्लभस्वामींनी महाराजांना दर्शन देऊन पादुकांसाठी अनुष्ठान करण्याचा आदेश दिला. असे सांगितले जाते. त्याप्रमाणे अनुष्ठान पार पडताच महाराजांना पादुकांची प्राप्ती झाली. निर्गुण पादुका, टेंबेस्वामींनी दिलेली दत्तमूर्ती यामुळे हे स्थान मोठे जागृत मानले जाते. या ठिकाणी पिशाच्चमोचन व ऋणमोचन यंत्राची स्थापना केली गेली आहे. इथे शिवरात्र, सोमवार आणि गुरुवार हे महत्त्वाचे दिवस मानले जातात, पण इथला मोठा उत्सव होतो तो मार्गशीर्ष वद्य १२ या दिवशी. एकूण तीन दिवस हा उत्सव चालतो, पण तत्पूर्वी दहा दिवस अनुष्ठान होते.
दासोपंतांचा दत्त-अंबेजोगाई
योगेश्वरी देवीच्या स्थानामुळे प्रसिद्ध असलेले अंबेजोगाई हे ठिकाण मराठीतील आद्यकवी मुकुंदराज आणि संत दासोपंत यांच्या वास्तव्यानेही पुनीत झालेले आहे. दत्त संप्रदायात तीन भिन्न पंथ आहेत. ते म्हणजे दासोपंती, गोसावी आणि गुरुचरित्र पंथ. संत कवी दासोपंत हे त्यातल्या पहिल्या पंथाचे अध्वर्यू होते. त्यांच्याच नावाने तो पंथ ओळखला जातो. दासोपंती पंथाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांचा दत्त हा एकमुखी आणि द्विभुज असतो. दासोपंत हे एक महान दत्तभक्त होते. श्री दत्तात्रेयांनी त्यांना सगुण रूपात दर्शन दिले होते, असे सांगितले जाते. दासोपंतांनी स्थापन केलेले दत्त मंदिर मराठवाडय़ातील बीड जिल्ह्यतल्या अंबेजोगाईइथे देशपांडे गल्लीत आहे. तिथे थोरले देवघर आणि धाकटे देवघर असे दोन भाग आहेत. दासोपंतांनी आपले आयुष्य याच मंदिरात व्यतीत केले होते. भगवान दत्तात्रेयांबरोबर त्याचा सुखसंवाद इथेच चालत असे, असे स्थानिक सांगतात. त्यामुळे हे स्थान जागृत असल्याचे त्यांचे अनुयायी सांगतात. दासोपंतांची औरंगजेबाबरोबर घडलेली एक आख्यायिका इथे सांगितली जाते. ती खूपच रंजक अशी आहे. औरंगजेबाची दासोपंतांवर भक्ती जडली होती, परंतु त्याने आपल्या संशयी स्वभाव वैशिष्टय़ानुसार दासोपंतांची आणि त्यांच्या दत्तभक्तीची परीक्षा घेण्याचे ठरवले. दासोपंतांच्या दर्शनाला जाताना एके दिवशी त्याने दत्तात्रेयांसमोर ठेवण्यासाठी नैवेद्याचे एक ताट बरोबर घेतले. त्या ताटामध्ये बकऱ्याच्या मांसाचे तुकडे होते. कपडय़ाने झाकलेले ते ताट बादशहाने तसेच दासोपंतांच्या समोर ठेवले आणि देवाला नैवेद्य दाखवण्यास सांगितले. कुठलीही शंका मनी न घेता समंत्रक प्रोक्षण करून दासोपंतांनी झाकलेल्या त्या ताटाचा नैवेद्य आपल्या आराध्य देवतेला दाखवला. नैवेद्य दाखवून होताच औरंगजेबाने ताटावरील आवरण दूर करण्यास सांगितले आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. ते सगळे नैवेद्याचे ताट सुंदर अशा गुलाबाच्या फुलांनी भरून गेलेले होते. त्या फुलांचा सुगंध सगळ्या मंदिरामध्ये दरवळत होता. हा चमत्कार पाहताच औरंगजेब नतमस्तक झाला आणि त्याने तिथल्या तिथे दासोपंतांच्या दत्त मंदिरास तीन गावे इनाम म्हणून दिली अशी ही कथा. या मंदिरात दत्त जयंती आणि दासोपंतांची पुण्यतिथी हे दोन प्रमुख उत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरे केले जातात.
गरुडेश्वर दत्तक्षेत्र
योगी परमहंस श्री वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी यांच्या समाधीने पुण्यपावन झालेले गरुडेश्वर हे एक दत्तस्थान आहे. पुण्यपवित्र नर्मदा नदीच्या काठावरील हे एक अत्यंत निसर्गरम्य असे ठिकाण आहे. इथूनच शूलपाणी या अरण्याचा प्रारंभ होतो. टेंबेस्वामींनी या स्थानी एकांतात तपश्चर्या केली आणि इ.स. १९१४ च्या आषाढ शुद्ध प्रतिपदेला त्यांनी या स्थानी समाधी घेतली. याच स्थानाबद्दल पुराणात एक कथा येते.गजासुर दैत्याने सर्व पृथ्वीवासीयांना त्राही त्राही करून सोडले होते. समस्त लोक भगवान विष्णूंना शरण गेले आणि गजासुराच्या त्रासापासून सोडवण्याची विनंती केली. त्यांची प्रार्थना ऐकून भगवान विष्णूंनी आपले वाहन गरुड याला गजासुराचे पारिपत्य करण्यासाठी पाठवले. गरुडाने गजासुराला युद्धात ठार मारले आणि सर्वाची त्याच्या छळापासून मुक्तता केली. तेच हे स्थान होय. गरुडाच्या पराक्रमाच्या स्मृतीसाठी या ठिकाणी टेकडीवर गरुडेश्वर मंदिर उभारण्यात आले असून गरुडेश्वर याच नावाने ही जागा ओळखली जाऊ लागली. येथील दत्तमूर्ती तीनमुखी सहा हातांची असून अत्यंत देखणी आहे. दत्तजयंती आणि श्री टेंबेस्वामींची पुण्यतिथी हे येथील प्रमुख उत्सव होत. टेंबेस्वामींच्या समाधीपुढे तसेच येथील दत्ताजवळ मनोकामना पूर्ण होतात असा गाढ विश्वास दत्तभक्तांमध्ये आहे. धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वाचे असे हे सुंदर ठिकाण आहे. सावंतवाडीजवळील माणगाव इथे जन्मलेल्या महाराष्ट्रातील एका महान दत्तभक्ताने नर्मदेच्या तीरावर समाधी घेतली असून त्यांच्याच अनुयायाने म्हणजे श्रीरंग अवधूत स्वामी यांनी नारेश्वर म्हणजे नर्मदेकाठीच दत्तभक्तीचा प्रचार आणि प्रसार करावा हा विलक्षण योगायोगच म्हटला पाहिजे.
श्री क्षेत्र दत्तवाडी – सांखळी गोवा</strong>
पणजीपासून साधारण ३५ कि.मी. अंतरावर डिचोली तालुक्यात सांखळी हे एक टुमदार शहर वसले आहे. म्हापसा-मडगाव रस्त्यावर डिचोलीपासून ७ कि.मी.वर सांखळी आहे. पर्ये, म्हाविळगे, कारापूर या ठिकाणांचे मिळून सांखळी हे गाव बनले आहे. गावातील बस स्थानकापासून केरी-मोर्लेममार्गे चोर्लेघाटाला जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला जवळच सांखळीचे सुप्रसिद्ध दत्तमंदिर आहे. स्थानिक मंडळी या ठिकाणाला क्षेत्र दत्तवाडी म्हणून ओळखतात. अनेक अद्भुत घटना आणि कथा या ठिकाणाशी निगडित आहेत हे इथले विशेष म्हणावे लागेल. अंदाजे सव्वाशे वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. म्हाळू कामत या विठ्ठल भक्ताचे सुपुत्र लक्ष्मण कामत हे निस्सीम दत्तभक्त होते. प्रतिवर्षी नरसोबाच्या वाडीला जाऊन ते गुरुचरित्राचे पारायण करीत असत. अनेक वर्षे हा नेम त्यांनी अत्यंत निष्ठेने चालविला होता, पण हा नेम चालवीत असताना त्यांना स्थानिक सेवेकरी अनेकदा त्रास देत असत, अवहेलना करीत असत. एकदा असाच अपमान सहन न झाल्याने कामत तिथून परत निघाले. आता मीच तुझ्या गावी राहायला येतो असे स्वप्नात त्यांना सांगितले. आणि मग विविध चमत्कारांची मालिकाच सुरू झाली, असे सांगितले जाते. मंदिरासाठी लागणारी साधनसामग्री उपलब्ध असलेल्या पैशांमध्ये मिळणे, मंदिरासाठी योग्य जागा, मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी योग्य मूर्ती, तीसुद्धा जेवढे जमले होते तेवढय़ाच पैशांमध्ये मिळणे, ती ज्यांच्या घरी आणून नुसती ठेवली त्यांच्या घरातील सर्व त्रास दूर होणे अशा एकामागून एक शुभ घटना घडत गेल्या आणि अंतत: ५ एप्रिल १८८२ रोजी या मूर्तीची दुपारी दोनच्या शुभ मुहूर्तावर मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सदर मूर्ती ही काश्मिरी पाषाणातील असून तिला तीन मुखे आणि सहा हात आहेत. अत्यंत जटिल मानसिक त्रास या ठिकाणी दर्शनाला आल्याने बरे होतात अशी दत्तभक्तांमध्ये ठाम श्रद्धा आहे. या ठिकाणी रामनवमी, अक्षय्य तृतीया, नवरात्रोत्सव, महाशिवरात्री आणि दत्तजयंती असे उत्सव-समारंभ साजरे होतात. प्रतिष्ठापना दिन हा दत्तमूर्तीचा वर्धापन दिन म्हणून साजरा होतो. सांखळीचे हे देवस्थान अत्यंत कडक आणि जागृत म्हणून पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध पावलेले आहे. या ठिकाणी सत्पुरुष सुबाण्णा तोडरबुवा आणि साधू जगन्नाथबुवा बोरीकर यांचे दीर्घकाळ वास्तव्य राहिलेले आहे.
श्री दत्तक्षेत्र – नारेश्वर
गरुडेश्वरसारखेच गुजरात राज्यामध्ये असलेले हे अजून एक दत्ततीर्थ नारेश्वर. खूपशी दत्तस्थाने ही त्या पंथामधील सत्पुरुषांमुळे ओळखली जाऊ लागली. दत्त संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार या थोर व्यक्तींनी आपल्या वर्तणुकीतून जनसामान्यांना करून दिला. ही सर्व थोर मंडळी त्यामुळे समस्त दत्तभक्तांच्या मनात कायमचे घर करून राहिली. महाराष्ट्रातील ही मंडळी आपल्या भौगोलिक सीमा ओलांडून पार दूरवर जाऊन स्थायिक झाली आणि दत्त संप्रदाय त्यांनी तिथे रुजवला-वाढवला. श्रीपरमहंस रंगावधूत महाराज हे असेच एक महान दत्तभक्त होत. गुजरातमधील वडोदरा या गावापासून अंदाजे ६० कि.मी.वर नर्मदेच्या रम्य तीरावर नारेश्वर हे तीर्थक्षेत्र वसले आहे. पश्चिम रेल्वेवर नारेश्वर रोड हे स्टेशन लागते. नारेश्वर हे स्थान पूर्वीजवळ जवळ अरण्यातच होते. आसपास काहीच मनुष्यवस्ती नव्हती. अशा या विजनवासात श्रीरंग अवधूतस्वामींनी वास्तव्य केले. हे स्वामी दत्त संप्रदायातील मोठे अधिकारी व्यक्ती होत. मूळचे महाराष्ट्रातील कऱ्हाडे ब्राह्मण असलेल्या स्वामींचे मूळ नाव पांडुरंग विठ्ठल वालमे असे होते. बापजी या नावाने प्रसिद्ध झालेले स्वामी दत्तात्रेयांच्या आदेशावरून गुजरात प्रांती आले आणि दत्तभक्तीचा त्यांनी इथे प्रसार केला. श्री वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी हे त्यांचे गुरू होत. श्रीरंग अवधूतस्वामी त्यांच्या नारेश्वर येथील वास्तव्यामुळे नारेश्वर महाराज म्हणून प्रसिद्ध झाले. एके काळच्या जंगलातील या स्थानी आता स्वामींचा मोठा आश्रम आहे. या आश्रमात पादुका आणि दत्तमूर्तीची स्थापना केलेली दिसते. दत्ताची मूर्ती ही तीनमुखी आणि अष्टभुज आहे. मांडी घालून बसलेल्या स्थितीतील ही मूर्ती आहे. गुरुचरित्राच्या पोथीचे वाचन स्त्रियांनी करायचे नसते असा समज असल्यामुळे स्वामींनी खास स्त्रियांसाठी ‘दत्त बावनी’ हा ग्रंथ लिहिला. श्रीरंग अवधूत स्वामींची प्राणज्योत १९ नोव्हेंबर १९६८ रोजी हरिद्वार इथे मालवली. नारेश्वर या ठिकाणी दत्त जयंती आणि गोकुळाष्टमी हे उत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरे होतात. आश्रमातर्फे माफक दरात भक्तनिवासामध्ये राहण्याची सोय केली जाते.
आदिलशाहीतले दत्त मंदिर
विजापूरला दत्ताचे एक पुरातन मंदिर असून ते तिथल्या नृसिंह मंदिर परिसरातच वसलेले आहे. या मंदिराबद्दल असे सांगितले जाते की, श्रीनृसिंहसरस्वतींचा एक मुसलमान भक्त त्या वेळच्या विजापूरचा बादशहा इब्राहिम अली याने या मंदिराची स्थापना केली आहे. तर काही संदर्भानुसार इब्राहिम अली या मंदिरात दर्शनासाठी येत असे. गुरुचरित्राच्या ९ व्या आणि ४९ व्या अध्यायात एका रजकाची कथा येते, त्यानुसार श्रीपाद श्रीवल्लभ यांचा एक रजक भक्त त्यांच्याकडे राजा होण्याची इच्छा व्यक्त करतो. श्रीपाद श्रीवल्लभ त्याला तू पुढील जन्मात राजा होशील असा वर देतात. तोच हा इब्राहिम अली होय, असे मानले जाते. त्याच्या पायाला झालेली जखम श्री नृसिंहसरस्वती यांनी केवळ दृष्टीमात्रे बरी केली आणि त्याला पूर्वजन्मीचे स्मरण करून दिले. नंतर हा बादशाह स्वामींचा अनन्यभक्त झाला अशी ही कथा. आपल्या दर्शनाचा लाभ निरंतर घडावा अशी त्याने स्वामीचरणी मनोभावे प्रार्थना केली. त्याचा सद्भाव पाहून स्वामींनी ती मान्य केली. विजापुराभोवती असलेल्या खंदकाच्या मध्यभागी पश्चिमेस जो पिंपळाचा वृक्ष आहे तिथे किल्ल्यात माझ्या पादुका तुला मिळतील त्यावर मंदिर बांधून माझी सेवा कर असे स्वामींनी त्याला सांगितले. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे बादशहास त्या पिंपळवृक्षाखाली पादुका सापडल्या. त्यावर त्याने मंदिर बांधले व श्रींची सेवा केली. पुढे त्या पिंपळवृक्षाला आत घेऊनच नृसिंहाचे देवालय उभारण्यात आले. आणि मंदिरात दत्तमूर्ती बसविण्यात आली. देवालयाला लागून पाण्याचा मोठा खंदक आहे. या खंदकाला देवळाच्या अंगाने एक घाटही बांधण्यात आलाय. या मंदिरात गुरुवारी आणि धार्मिक सणांच्या दिवशी श्री दत्ताचा छबिना काढतात. दत्तजयंती आणि गणेश चतुर्थी हे दोन उत्सव इथे मोठय़ा प्रमाणावर साजरे केले जातात. या मंदिराची माहिती असलेले पुरातन शिलालेख विजापूरच्या पूर्व आणि उत्तर दरवाजाजवळ बसवलेले आहेत.
ही सर्व दत्तस्थाने आपल्या अलौकिक वैशिष्टय़ांमुळे आवर्जून पाहिली पाहिजेत. ही ठिकाणे आपल्या नेहमीच्या प्रवासात कधी तरी लागली असतील. पण ती मुद्दाम थांबून तिथे जाऊन पाहिली पाहिजेत. आपल्या देखण्या महाराष्ट्रामध्ये खरोखरच अशी असंख्य दत्तस्थाने आहेत, जी त्यांच्या ठायी असलेल्या कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे प्रेक्षणीय आहेत. कोणती तरी कथा अथवा चमत्कार त्या ठिकाणांशी निगडित आहेत. दत्तसंप्रदायातील कोणा अधिकारी व्यक्तीच्या वास्तव्यामुळे पुनीत झालेली अशी ही ठिकाणे आहेत. वर उल्लेख केलेल्या स्थानांव्यतिरिक्त पुणे-दौंड मार्गावरील नारायण महराजांचे केडगाव बेट, नाशिकचा एकमुखी दत्त, नाशिक रोडचे घैसास दत्त मंदिर, माहुरचे निद्रास्थान, नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान मानले गेलेले लाडाचे कारंजे, महानुभावियांचा दत्त म्हणून खान्देशात प्रसिद्ध असलेले जळगाव जिल्ह्यतील चोरवड इथले दत्तमंदिर, नगर जिल्ह्यतील श्रीगोंदे तालुक्यातील शेडगावचे दत्तस्थान, जयपूरहून आणलेली शिव-दत्ताची मूर्ती असलेले बीड-नगर मार्गावरील आष्टीचे दत्तमंदिर, बार्शीपासून ५ कि.मी.वर असलेले पळेवाडीचे ब्रह्मनाथ मंदिर, सोलापूर जिल्ह्यतील माढा तालुक्यातील टेंभुर्णीचे दत्तक्षेत्र, सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यातील चिकुर्डे इथले श्री समर्थ सदगुरू दत्तमंदिर, श्री मल्हारस्वामींचे समाधीस्थान असलेले सातारा जिल्ह्यतील पाटण तालुक्यातील नाडोली गावचे दत्तमंदिर, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दत्तवायपूरचे जागृत दत्तस्थान, श्रीनृसिंह सरस्वती यांनी औदुंबर येथून नरसोबाच्या वाडीला जाताना ज्या गावी मुक्काम केला ते कसबे डिग्रज इथले दत्तस्थान, सांगली जिल्ह्यातल्या माधवनगर वसाहतीमधील फडके यांचे दत्तमंदिर, रांजणगाव सांडस इथले श्रीगुरुदेव दत्त देवस्थान, लोणीभापकरचा दशभुज दत्त आणि त्यांच्या शेजारीच असलेले यज्ञवराहाचे शिल्प, कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे देशपांडे दत्त मंदिर, कृष्णामाईच्या काठावर वसलेल्या धोम येथील नाथ पंथीयांचे अध्वर्यू असलेल्या श्रीमच्छिंद्रनाथांचे दत्तमंदिर, श्रीसंत पाचलेगावकर महाराजांचे गुरू श्री माधवानंद सरस्वती महाराज यांचे लीलास्थान असलेले परभणी जिल्ह्यातील पाचालेगावच्या जवळ असलेले नयकोटवाडी येथील दत्तमंदिर, भोर येथे दत्तंभट स्वामींच्या समाधीवर बांधलेले दत्तमंदिर, यादवांच्या देवगिरी किल्ल्यावर जनार्दनस्वामींनी किल्लेदार असताना बांधलेले दत्तमंदिर, प्रति गाणगापूर असलेले नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील देवाची करजी इथले दत्त मंदिर, मांडवगण फराटा इथले औंदुबर महाराज, मौजे खळद येथील खळदकरांचा दत्त, देवगडचा दत्त, अकलूजजवळील खंडाळीचा दत्त.. अशी एक ना अनेक अक्षरश: असंख्य दत्तस्थाने अवघ्या महाराष्ट्राभर पसरलेली आहेत. ती सगळी पाहायची म्हटले तरी एक जन्म पुरणार नाही अशी अवस्था आहे. इथे देव भक्तांची वाट पाहत कधीचा उभा आहे.