इलेक्ट्रॉनिक सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तींना श्वास घेताना घरघर होण्याची व्याधी जडण्याची शक्यता तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करीत नसलेल्या व्यक्तींच्या तुलनेत दुप्पट असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे. श्वसनमार्ग आक्रसून गेल्यामुळे किंवा त्याची नियमित अवस्था बिघडल्यामुळे श्वास घेताना घरघर असा आवाज निघू शकतो. अनेकदा अशी घरघर ही एम्फिसेमा (फुप्फुसांची हानी झाल्याने किंवा आकार वाढल्याने होणारा आजार), गॅस्ट्रोइसिफॅगल रिफ्ल्कस (जीईआरडी), हृदयक्रिया बंद पडणे, फप्फुसांचा कर्करोग, झोपेत असताना श्वास घेण्यास त्रास किंवा घोरणे आदी आजारांची पूर्वसूचना असू शकते.
याबाबतचे निष्कर्ष ‘टोबॅको कंट्रोल’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाले आहेत. हे सर्व निष्कर्ष यापूर्वीच्या ई-सिगारेटबाबतच्या संशोधनाला पुष्टी देणारे आहेत. त्यानुसार ई-सिगारेटमधून बाहेर पडणाऱ्या कणांमुळे आणि तिच्यात वास-चवीसाठी वापरलेल्या पदार्थामुळे फुप्फुसांच्या पेशींची हानी होऊ शकते. याबाबत अमेरिकेतील रोचेस्टर मेडिकल सेंटर विद्यापीठाचे प्राध्यापक देबोराह जे. ओसिप यांनी सांगितले की, ‘या सर्व संशोधनातून घेण्याचा धडा इतकाच की, इलेक्ट्रॉनिक सिगारेट हीसुद्धा तुमच्या फुप्फुसाच्या आरोग्यासाठी निर्धोक नाही.’
इलेक्ट्रॉनिक सिगारेट ओढल्याने (तिची वाफ ओढली जाते) काय परिणाम होतात, याचा अभ्यास प्रयोगशाळांत आणि बाहेरही करण्यात आला. या व्यक्तींच्या फुप्फुसांची हानी होत असल्याची प्राथमिक लक्षणे दिसून आली. हे निश्चितच चिंता करण्यासारखे आहे, असे ओसिप म्हणाले.
तंबाखूपासून बनवलेल्या सिगारेटीला कमी हानीकारक पर्याय म्हणून विकली जाणारी ई-सिगारेट अमेरिकेत अत्यंत लोकप्रिय आहे. राष्ट्रीय आरोग्य केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, १३ टक्के अमेरिकी नागरिकांनी ती कधी ना कधी ओढली आहे, तर चार टक्के नागरिक ती आजही ओढतात. वरील अभ्यासात ई-सिगारेटमुळेच श्वासादरम्यान घरघर होते, असे सिद्ध झाले नसले तरी या दोन गोष्टींचा संबंध असल्याचे संशोधकांनी दाखवून दिले.