भारत, चीन, नायजेरिया, पाकिस्तान आणि इंडोनेशिया या देशांमध्ये जवळपास १६ लाखांपेक्षा अधिक लहान मुलांमध्ये फुप्फुसाच्या संसर्गाची लक्षणे आढळतात. हे प्रमाण जागतिक आकडेवारीच्या निम्मे आहे. भारतीय वंशाच्या संशोधकांनी ब्रिटनमध्ये केलेल्या संशोधनामधून ही माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एडिनबर्ग विद्यापीठाच्या या संशोधकांनी जगभरात श्वसनासंबंधी होणाऱ्या आजाराबाबतच्या ३२९ अभ्यासांचे विश्लेषण केले. ‘लॅन्सेट’ नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार, प्रत्येक वर्षी जगभरातील पाच वर्षांखालील मुलाला आरएसव्ही अर्थात श्वसनासंबंधी आजार होण्याची ३३ लाखांपेक्षा अधिक प्रकरणे घडत असल्याचे, त्यांच्या अनुमानामध्ये म्हटले आहे.

भारत, चीन, नायजेरिया, पाकिस्तान आणि इंडोनेशिया या पाच देशांमध्ये श्वसनासंबंधी आजार (आरएसव्ही) होण्याचे प्रमाण जगभरात संसर्ग होण्याच्या तुलनेत निम्मे आहे, असे संशोधकांनी सांगितले. आरएसव्ही हा अतिशय सामान्य आणि अत्यंत संक्रमक असा विषाणू आहे. तो दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या अनेक बालकांचा श्वसनमार्ग संसर्गित करतो.

या विषाणूमुळे घशात घरघर आणि श्वास घेण्यात अडचण निर्माण होण्यामुळे ३ दशलक्ष मुलांना प्रत्येक वर्षी रुग्णालयात दाखल करण्यात येते. या विषाणूचा संसर्ग अधिक प्रमाणात वाढल्यामुळे दर वर्षी पाच वर्षांच्या आतील १ लाख १५ हजारपेक्षा अधिक मुलांचा मृत्यू होतो, असे त्यांनी सांगितले.

जी मुले मृत्यू पावतात ती साधारण सहा महिन्यांपेक्षा मोठी असतात. ९९ टक्क्यांपेक्षा अधिक मृत्यू हे विकसनशील देशांमध्ये होतात.

आरएसव्हीवरील औषध निर्माण करण्याचे काम सुरू असून, पुढील ५ ते ७ वर्षांमध्ये यावरील औषध बाजारात उपलब्ध होईल, असे संशोधकांनी म्हटले आहे.

हवा प्रदूषण, धूम्रपान करणे, ताणताणाव, व्यायाम न करणे यामुळे हा आजार होऊ शकतो, असे संशोधकांनी सांगितले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lung disease increasing in indian children
Show comments