जुळय़ांचे दुखणे आपल्याला परिचित आहे. एकाने एक गोष्ट केली की ती जुळ्यांमधील दुसऱ्यालाही हवी असते. दोघांनाही एक खेळणे अथवा वस्तू हवी असते. हेच ते जुळ्यांचे दुखणे. याच स्वभाव वैशिष्टय़ांचा मागोवा घेत मोबाइल, संगणक वापरताना जुळय़ा भावांचे वागणे कसे असते याबाबतचे एक अनोखे सर्वेक्षण ‘मॅकफी’ या कंपनीने केले आहे. त्यातून अनेक मनोरंजक तथ्ये समोर आली आहेत. या सर्वेक्षणात ८ ते १२ वयोगटातील जुळय़ा भावा-बहिणींचे मनोगत जाणून घेण्यात आले आहे.
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात पालकत्वाची भूमिका पार पाडत असताना येणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले असल्याचे मॅकफी सायबर इंडियाच्या आनंदिता मिश्रा यांनी स्पष्ट केले. आजच्या मुलांवर ऑनलाइन जगताचा खूप मोठा प्रभाव असून त्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर आणि विकासावर होत असतो. यामुळे आता आपल्या पाल्याला ‘सायबर शिस्त’ लावणे ही काळाची गरज बनली असून त्यासाठी मुलांच्या आवडी-निवडी जाणून घेणे खूप महत्त्वाचे झाले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. तर संगणक आणि लॅपटॉपसह मोबाइलसारख्या नव्या उपकरणांचा वाढता वापर आणि त्यामध्ये सातत्याने उद्भवणाऱ्या अडचणी आदी बाबी लक्षात घेऊन पालकांना सायबर सुरक्षेबाबत जागरूक करणे गरजेचे असल्याचे मोबाइल अभियांत्रिकी विभागाचे उपाध्यक्ष वेंकट क्रिष्णापूर यांनी यानिमित्ताने स्पष्ट केले.
मॅकफीच्या सर्वेक्षणात आढळलेली निरीक्षणे
*ऑनलाइन असणाऱ्या जुळय़ा भावंडांपैकी ५३ टक्के जुळे रोज एक ते तीन तास ऑनलाइन असतात.
*एक दिवस इंटरनेट किंवा फोन वापरायला मिळाला नाही तर सुमारे एक तृतियांश जुळय़ा भावंडांना चुकचुकल्यासारखे वाटते.
*जुळी भावंडे सरासरी सुमारे दोन तास ऑनलाइन असतात आणि त्यापैकी सुमारे ४५ टक्के जुळे रात्री आठनंतर ऑनलाइन येतात.
*गृहपाठ करण्यासाठी ७० टक्के जुळे डेस्कटॉपचा वापर करतात. तर ३८ टक्के जुळे त्यासाठी टॅबलेट्स वापरतात.
*४९ टक्के जुळे गेम खेळण्यासाठी आणि फोटो शेअरिंगसाठी टॅब तर ४० टक्के डेस्कटॉपचा वापरतात.
*१६ टक्के जुळी भावंडे स्मार्टफोन किंवा मोबाइलवर रोज चार तासांहून अधिक वेळ घालवतात.
*८९ टक्के जुळय़ा भावंडांना ऑनलाइन साइटचा वापर करण्यासाठी पालकांना परवानगी मिळालेली आहे.
*८९ टक्के ऑनलाइन जुळय़ांच्या फेसबुकच्या मित्रांच्या यादीत पालकांचा समावेश आहे.
हे सर्वेक्षण मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, हैद्राबाद, अहमदाबाद व दिल्ली येथील मुलांचा केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा