हाड फ्रॅक्चर होण्यामुळे अपंगत्व येण्याचे प्रमाण वयोवृद्धांमध्ये जास्त आहे. मात्र रक्तामधील मॅग्नेशियमच्या उच्च पातळीमुळे वयोवृद्ध लोकांची हाडे मोडण्याचे (फ्रॅक्चर) प्रमाण कमी होते असे एका नव्या अभ्यासात आढळून आले.
मॅग्नेशियम हा पोषण घटक असून, तो हाडामधील महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे रक्तामध्ये मॅग्नेशियमची पातळी योग्य राहिल्यास हाड फ्रॅक्चर होण्याचे प्रमाण कमी असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. ब्रिटनमधील ब्रिस्टॉल विद्यापीठाच्या संशोधकांनी याबाबत अभ्यास केला. यासाठी २० वर्षांच्या काळामध्ये २,२४५ मध्यमवयीन व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला.
ज्या पुरुषांच्या रक्तामध्ये मॅग्नेशियमची पातळी कमी दिसून आली, त्यांच्यामध्ये हाडे फ्रॅक्चर होण्याचे प्रमाण हे जास्त होते. प्रामुख्याने यात कमरेचे हाड फ्रॅक्चर होत असल्याचे संशोधकांना दिसून आले.
ज्या पुरुषांच्या रक्तामध्ये मॅग्नेशियमची उच्च पातळी दिसून आली, त्यांच्यामध्ये हाड फ्रॅक्चर होण्याचा धोका इतरांच्या तुलनेत ४४ टक्क्यांनी कमी होत असल्याचे अभ्यासात आढळले.
आहारामध्ये असणाऱ्या मॅग्नेशियमचा हाड फ्रॅक्चर होण्याशी थेट संबंध नाही. रक्तामध्ये मॅग्नेशियमची पातळी अनेक लोकांमध्ये कमी असल्याचेही यात दिसून आले. रक्तातील मॅग्नेशियमची पातळी रुग्णालयांमध्ये नेहमी तपासली जात नाही. सामान्यपणे मॅग्नेशियमची कमी पातळी ओळखणे कठीण असल्याचे संशोधकांनी सांगितले.
भविष्यातील हाड फ्रॅक्चर होण्याचा धोका टाळायचा असेल तर रक्तामधील मॅग्नेशियमची पातळी उच्च ठेवणे आवश्यक आहे. तसेच मॅग्नेशियमचे प्रमाण वाढण्यासाठी योग्य त्या पूरक अहाराच्या चाचण्या घेण्याचे आवश्यक असल्याचे संशोधकांनी संशोधनाचा निष्कर्ष काढताना सांगितले.
हे संशोधन ‘युरोपीयन जर्नल ऑफ इपिडेमिओलॉजी’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.