कुठे गुलाबी, तर कुठे लाल तर कुठे पिवळी, कुठे मोदींचे चित्र असलेला पतंग तर कुठे विविध पक्षांची चिन्ह असलेल्या पतंगांनी आकाश भरून जाईल. कुठे शेजा-यांची पतंग गुल करण्याची स्पर्धा तर कुठे आपली पतंग उंचच उंच नेण्याची स्पर्धा अशी पतंगाची स्पर्धाच जणू मकरसंक्रांतीला पाहायला मिळते. त्यातून गुजरातमध्ये तर अनेक ठिकाणी खास पतंगोत्सव भरतात, नाना आकाराचे विविध रंगांचे शेकडो पतंग आकाशात उडवले जातात. हा पतंगाचा कार्यक्रम पाहण्यासाठी देश विदेशातून लोक येतात. पण तुम्हाला माहितीय मकरसंक्रांतीलाच पतंग का उडवला जातो?
हेही वाचा – मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या भोगीचं महत्व माहित आहे का?
खरे तर आपल्या प्रत्येक सणांना धार्मिक महत्त्व असले तरी त्यामागे शास्त्रीय कारणेही आहेत. आता पतंग उडवण्याचे घ्या ना! तसं बघायला गेले तर तुमच्या आमच्यासाठी हा साधा खेळ. कागदाचा पतंग आणि मांजा बाजारातून आणायचा. शेजा-या पाजा-यांचे पतंग गुल करायचे आणि मज्जा लुटायची बस्स. पण पतंग उडवण्यामागे एक कारणही आहे. खरतर संक्रांतीच्या काळात वातावरणात थंडी असते. ऊनही फार कमी मिळते आणि आपसूकच थंडीमुळे स्थूलपणा जाणवतो. थंडी अनेक त्वचारोगांना आमंत्रण देते. याकाळात त्वचा रुक्ष होते. म्हणूनच शरिराची हालचाल व्हावी यासाठी हा खेळ खेळला जातो. विशेष म्हणजे मकर संक्रांतीत सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याचे उत्तरायण सुरू होते. या काळात सूर्याची किरणे अंगावर पडली तर त्याचा शरीरराला फायदा होतो. त्वचेसाठी ही सूर्यकिरणे आवश्यक असतात आणि ती मिळावीत यासाठी हा खेळ खेळला जातो. यानिमित्ताने का होईना पतंग उडवण्यासाठी थंडीतून लोक घराबाहेर पडतात छतावर येतात. त्यामुळे पुरेपुर ऊन शरीराला मिळते.
आणखी वाचा – Makar Sankranti: हलव्याच्या दागिन्यांनी खुलवा तुमचे सौंदर्य
पण पतंग उडवण्याचा हा खेळ फक्त भारतातच असतो असे नाही बरं का! फार पूर्वी अफगाणिस्तानमध्येही हा खेळ खेळला जायचा. पण सध्या तालिबानने या खेळावर पूर्णपणे बंदी घातली आहे. पाकिस्तान आण चिनमध्येही पतंग उडवले जायचे. चिनमध्ये खास बांबूपासून आणि रेशमाच्या कपड्यापासून बनवलेले पतंग उडवले जात असल्यचे अनेक संदर्भ सापडतील.