Rice weevil Remedies: भारतातात भात खूप आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. अनेकांना ताटात पोळी-भाजी नसली तरीही चालेल, पण भात हा हवाच असतो. शिवाय भात खाल्लाशिवाय काहींचे पोटही भरत नाही. असा हा खूप महत्त्वाचा पदार्थ प्रत्येक घरात दिवसातून एकदा तरी बनवला जातो. अनेक जण महिन्याचा किराणा भरताना एक महिन्यासाठी लागणारे तांदूळ विकत घेतात. पण, काही जण वर्षाचा किंवा सहा महिन्यांसाठी लागणारे धान्य एकादाच भरतात, त्यामुळे भातामध्ये किडे होतात. अशा परिस्थितीत तांदळातून किडे काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि वेळही वाया जातो. या समस्या दूर करण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तांदळाच्या डब्यातील किडे सहज दूर होतील.
या सोप्या टिप्स करतील मदत
सूर्यप्रकाश
अनेकदा तांदळामध्ये ओलाव्यामुळे किड लागते. पावसाळ्यात ही समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते. अशावेळी त्यातील ओलावा कमी करण्यासाठी तांदूळ एका मोठ्या परातीमध्ये काढून ३-४ तासांसाठी कडक उन्हामध्ये ठेवा. सूर्यप्रकाशामुळे ओलावा कमी होण्यास मदत होईल आणि किडही नाहीशी होईल.
लाल मिरची
कडक उन्हामध्ये ठेऊनही तांदळात अजून किड दिसत असेल तर तांदळाच्या डब्यामध्ये ४-५ सुक्या लाल मिरच्या ठेवा आणि डब्याचे झाकण घट्ट लावून घ्या, यामुळे लाल मिरचीच्या वासाने किडे मरतात.
तमालपत्र
तांदळाच्या डब्यातील किडे नाहीसे करण्यासाठी तुम्ही लाल मिरचीच्या जागी तमालपत्रही वापरू शकता. तमालपत्र कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.
लवंग आणि दालचिनी
तांदळातील कीड दूर करण्यासाठी तुम्ही लवंग आणि दालचिनीचाही वापर करू शकता. यासाठी मूठभर लवंग, दालचिनी घ्या आणि ती डब्यात ठेवा. या दोन्हींच्या वासामुळे किडे नाहीसे होतात.
हेही वाचा: घरातील फर्निचरमध्ये ढेकूण सतत वाढत आहेत? ‘या’ सोप्या जालीम उपायांनी ढेकणांना लावा पळवून
वरील सर्व उपायांव्यतिरिक्त दररोज स्वच्छतेची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जेवण बनवताना भात करायच्या आधी तांदूळ गरम पाण्याने स्वच्छ धुवून नंतर साध्या पाण्याने धुवून त्याचा भात तयार करा.