आपली आजी आपल्याला कायम सांगत असते, की आताच्या शाम्पूपेक्षा आपली घरगुती शिकेकाई केसांसाठी फार चांगली असते. नैसर्गिक गोष्टींचा वापर केल्याने त्याचा केसांना कोणता त्रासही होत नाही. हे ती आपल्याला वेळोवेळी सांगत असते. पण, आता काही घरे सोडल्यास, शिकेकाईचा वापर केवळ दिवाळीपुरता मर्यादित असतो. शिकेकाईचे केसांना होणारे फायदे तर सगळ्यांनाच माहीत असतात; पण हीच शिकेकाई तुमच्या त्वचेसाठीही खूप उपयुक्त आहे. आता या शिकेकाईचा वापरून तुम्ही तुमच्या त्वचेचे आरोग्य कसे सांभाळू शकता ते बघा.
शिकेकाईचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या त्वचेसाठी त्यांचे विविध फायदे होतात. ते कसे ते पाहू.
१. खरूज बरी होण्यासाठी फायदेशीर
शिकेकाईचा वापर खरूज झाल्यास उपचार म्हणून होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही शिकेकाई आणि हळदीचा मिळून एक जंतुनाशक बॉडी वॉश बनवू शकता. हा बॉडी वॉश बनवण्यासाठी कच्ची हळद गरम पाण्यात भिजवून घेऊन, ती वाटून घेऊन त्याची एक पेस्ट बनवा. आता शिकेकाई एका तव्यावर भाजून घ्या. शिकेकाई पूर्णपणे काळी होईपर्यंत भाजा आणि नंतर त्याची बारीक पावडर करा. आता हळदीची पेस्ट आणि शिकेकाई पावडर एकत्र करून, दुधात मिसळा. आता हे मिश्रण गाळून घेऊन, त्याचा बॉडी वॉश म्हणून वापर करा.
२. त्वचेवरील डागांसाठी
अर्धा छोटा चमचा शिकेकाई पावडर, एक चमचा चेहऱ्याला लावायचे क्रीम, बदामाची पावडर व हळद असे मिश्रण तयार करा. आता या मिश्रणात एक चमचा मध मिसळून त्याचा बॉडी स्क्रब म्हणून वापर करू शकता. त्याच्या वापराने त्वचेवरील मृत त्वचा [Dead Skin] काढून टाकण्यास मदत होते. असे केल्याने त्वचा उजळ आणि चमकदार होण्यास मदत होऊ शकते.
हेही वाचा : तेलकट पदार्थांमुळे चेहऱ्यावर सतत येतात पिंपल्स? पहा काय आहेत उपाय; समज आणि गैरसमज
३. डोक्यावरील त्वचेसाठी
शिकेकाई काळी होईपर्यंत भाजून घ्या आणि त्याची बारीक पावडर करा. ही शिकेकाई पावडर, कडुनिंबाच्या पावडरसोबत थंड पाणी घालून पेस्ट तयार करा. उष्णतेने डोक्यात चिकचिक होत असल्यास किंवा डोके, मान यांच्यावर उष्णतेने पुरळ आल्यास ही पेस्ट तुम्ही वापरू शकता.
या टिप्सचा वापर करून, यापुढे केवळ दिवाळीमध्येच शिकेकाईचा वापर न करता, इतर दिवशीदेखील तुम्ही याचा उपयोग करून, तुमचे केस आणि त्वचा सुंदर, निरोगी ठेवू शकता.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. त्यास वैद्यकीय सल्ला समजू नये.)