जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल
हिवताप अर्थात मलेरिया या विकाराचे रुग्ण वाढत असले तरी या विकाराने मृत्यू येण्याच्या प्रमाणात २००० या वर्षांनंतर ६० टक्क्यांनी घट झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
निदनात्मक चाचणी, योग्य उपचारपद्धती आणि डासप्रतिबंधात्मक उपाययोजना यामुळे हे शक्य झाल्याचेही संघटनेने या अहवालात नमूद केले आहे.
सन २००० पूर्वी हिवतापाने मृत्यू येण्याचे प्रमाण खूप अधिक होते. २०००मध्ये जगभरातील २६ कोटी २० लाख लोकांना हिवतापाची लागण झाली होती, त्यापैकी आठ लाख ४० हजार रुग्णांचा मृत्यू झाला. २०१५मध्ये हे प्रमाण खूपच घटले आहे. या वर्षांत २१ कोटी ४० लाख लोकांना हिवतापाची लागण झाली, पण त्यापैकी मृत्यू होण्याचे प्रमाण खूपच अल्प आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने या अहवालात नमूद केले आहे.
‘‘जगभरात हिवतापावर नियंत्रण ठेवणे हे आमच्यासमोर फार मोठे आव्हान होते. १५ वर्षांत हिवतापावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले असून सार्वजनिक आरोग्यासाठी ते खूपच महत्त्वाचे होते,’’ असे जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालिका मार्गारेट चॅन यांनी म्हटले आहे.
लहान मुलांमध्ये हिवतापाची लागण होण्याचे प्रमाण अधिक आहे. आशिया खंडातील देश आणि कॉक्सस देशांमधील हिवताप नियंत्रणात आणलेला आहे, मात्र आफ्रिका खंडात अजूनही हिवतापावर नियंत्रण मिळविणे शक्य झालेले नाही. जगभरात हिवतापाने मृत्यू येणाऱ्या रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण हे उत्तर आफ्रिकेतील असतात. या देशांमध्ये योग्य वैद्यकीय सुविधांचा आणि डास प्रतिबंधनात्मक योजनांचा अभाव असल्याने येथे हिवतापाने मृत्यू येण्याचे प्रमाण वाढलेले आहे, अशी चिंता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली.

Story img Loader