स्वाइन फ्लूने भारतास पुरते जेरीस आणले असतानाच आता म्यानमार-भारत सीमेवर कुठल्याही औषधांना न जुमानणारा मलेरियाचा प्रकार उघडकीस आला आहे, त्यामुळे लाखो लोकांचे प्राण मलेरियामुळे धोक्यात येण्याची पुनरावृत्ती घडू शकते, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. मलेरियाचा परोपजीवी जंतू डासांमुळे मानवी रक्तात येतो.
मलेरियाचा प्रसार हा परोपजीवी जंतूमुळे होतो व त्यावर आर्टेमिसिनिन हे औषध वापरले जाते, पण म्यानमार-भारत सीमेवरील मलेरिया हा उच्चाटनाच्या पलीकडे असून तो कुठल्याही औषधाला दाद देत नाही. जर मलेरियाच्या परोपजीवी जिवाणूतील औषधरोधकता आशियातून आफ्रिका उपखंडात पसरली तर लाखो लोक मरण पावू शकतात.
संशोधकांनी म्यानमार सीमेवरील ५५ उपचार केंद्रांवर तपासणी केली असता परोपजीवी जंतूच्या केल्च जनुकात (के १३ ) उत्परिवर्तन होत असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे आर्टेमिसिनिन या औषधाला मलेरिया दाद देत नाही. भारतीय सीमेपासून २५ कि.मी. अंतरावर असलेल्या होमॅलिन सागाइंग भागात हा औषध प्रतिरोधक परोपजीवी जंतू मानवी शरीरात आढळून आला आहे.
महिडोल-ऑक्सफर्ड ट्रॉपिकल मेडिसिन रीसर्च युनिटचे डॉ. चार्लस व्रूडो व ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत माहिती घेऊन शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. मलेरिया हा रोग प्लास्मोडियम फाल्सिपारम या परोपजीवी जंतूपासून होतो. म्यानमार व थायलंड्स बांगलादेश सीमेवर काही भागात २०१३ व २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या ९४० नमुन्यांमध्ये ३७१ नमुन्यांमध्ये प्लास्मोडियम फाल्सिपारम या परोपजीवी जंतूमध्ये के १३ हे जनुकीय उत्परिवर्तन दिसून आले आहे व त्यामुळे यापुढे मलेरिया औषधांना जुमानणार नाही असे चित्र आहे असे संशोधकांनी म्हटले आहे.
*मलेरियामुळे २०१३ मध्ये ५ लाख ८४ हजार ते ८ लाख ५५ हजार मृत्यू
*मलेरियाचा परोपजीवी जंतू प्लास्मोडियम फाल्सिपारम के १३ हे जनुकीय उत्परिवर्तन
*भारत-म्यानमार सीमेवर मलेरियावर औषधे निष्प्रभ
*९४० नमुन्यांपैकी ३७१ नमुन्यात उत्परिवर्तन दिसले
*आशियातून आफ्रिकेत औषधरोधक मलेरिया पसरण्याची भीती
*ताप, थकवा, उलटय़ा, डोकेदुखी ही मलेरियाची लक्षणे
*डासांपासून रक्षण हाच प्रभावी उपाय