काही क्षणात आणि कमी खर्चात हिवतापाची तपासणी करणारे नवे उपकरण कलकत्त्यामधील संशोधकांनी तयार केले आहे. अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन संस्था आणि भारतीय अभियांत्रिकी विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था, शिबपूर यांनी संयुक्तपणे कमी खर्चात हिवतापाची तपासणी करणारी प्रणाली तयार केली असल्याचा दावा केला आहे. यात काही फेरबदल केल्यास या प्रणालीद्वारे डेंग्यूची तपासणीदेखील शक्य होणार असल्याचे संशोधकांनी सांगितले.
आम्ही मोबाइलच्या कॅमेराला कागदी सूक्ष्मदर्शक यंत्राला जोडले असून याद्वारे काही रसायनांसह रक्ताच्या नमुन्याचे छायाचित्र काढता येणार आहे. त्यानंतर ही माहिती केंद्रीय सव्र्हरला पाठविण्यात येणार असून रक्तात हिवतापाच्या पेशींचा शोध लावला जाणार आहे. असे आयआयईएसटी, शिबपूरचे विभागीय प्रमुख डॉ. अिरदम बिस्वास यांनी सांगितले.
यानंतर तपासणीचा निकाल हा नोंदणीकृत डॉक्टरांना पाठविण्यात येणार आहे. या रक्तचाचणीसाठी प्रत्येक रुग्णाला केवळ १० रुपये इतका खर्च येणार असून या प्रणालीमुळे काही सेकंदांमध्ये तुम्हाला तुमच्या रक्तचाचणीचा अहवाल रुग्णांना हातात मिळतो असे बिस्वास यांनी सांगितले.
आयईएमचे प्राध्यापक निलांजना दत्ता रॉय आणि त्यांचे सहकारी यांच्या मदतीने हा प्रयोग करण्यात आला आहे. सामान्य सूक्ष्मदर्शक यंत्राच्या मानाने कागदी यंत्राची किंमत स्वस्त असून या यंत्राद्वारे केलेल्या रक्तचाचण्यांपैकी ९० टक्के चाचण्या यशस्वी झाल्या असल्याचे बिस्वास यांनी सांगितले. याच प्रणालीमध्ये काही बदल केल्यास डेंग्यूची तपासणीदेखील शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.