Man Lost 13kgs In 21 Days: अलीकडे प्रत्येक दुसरी व्यक्ती ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असते असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. बदलती किंबहुना बिघडती जीवनशैली ही सध्या अतिवजनासारखी गंभीर समस्या वाढवत आहे. विशेष म्हणजे वजन कमी करण्याचे अनेक पर्याय आजवर लोकांनी शोधून काढले आहेत, पण प्रत्येक शरीराला प्रत्येक पर्याय साजेसा ठरेल असं होत नाही. काहींच्या बाबत तर वजन कमी करण्याच्या प्रयत्नांचा उलटच परिणाम होत असतो. सध्या कोस्टा रिका येथील ॲडिस मिलर हा तरुण आपल्या २१ दिवसात १३ किलो वजन कमी केल्याच्या पराक्रमामुळे चर्चेत आला आहे. ॲडिसने पाण्याचा उपवास केला होता. आयुष्य बदलून टाकणारा असा हा अनुभव त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. युट्युबवरील व्हिडीओमध्ये तीन आठवड्याच्या डाएट प्लॅनची त्याने माहिती दिली आहे. ॲडिसचा हा प्लॅन नेमका काय होता? त्याचे संभाव्य फायदे तोटे काय? याविषयी आता आपण जाणून घेऊया..
ॲडिसने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, त्याने २१ दिवस केवळ पाणी पिऊन उपवास केला होता. सुरुवातीला ७८ किलो वजन असताना त्याने हा प्रयोग सुरु केला. २१ दिवस त्याने जेवण व मीठ पूर्णपणे टाळले होते. यामुळे त्याने शरीरातील तब्बल १३.१ किलो वजन, ६ टक्के फॅट्स कमी केले. “वजन कमी झाल्याचा परिणाम तुम्हाला कदाचित व्हिडीओच्या माध्यमातून लक्षात येईल पण त्याचा प्रभाव यापेक्षा खूप जास्त होता. विशेषतः जेव्हा अगोदरच बारीक असणाऱ्या व्यक्तीवर अशा उपवासाचा कसा परिणाम होऊ शकतो हे मला तपासायचे होते”, असे ॲडिसने म्हटले आहे.
पाणी पिऊन उपवास करणे सुरक्षित आहे का?
एचटी लाइफस्टाइलला दिलेल्या मुलाखतीत, डॉ आर आर दत्ता, एचओडी, इंटर्नल मेडिसिन, पारस हेल्थ, गुरुग्राम, यांनी सांगितले की, “पाण्याचा उपवास म्हणजे अन्न (द्रवपदार्थांसह) वगळून केवळ पाणी पिऊन केलेला उपवास. २४ तासांपासून ते काही वेळा काही आठवड्यांपर्यंत हा उपवास केला जाऊ शकतो. पाण्याच्या उपवासाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे डिटॉक्सिफिकेशन. शरीरातून टॉक्सिन्स काढून टाकण्यासाठी या उपवासाचा फायदा होऊ शकतो. तसेच पचन सुरळीत होणे व मानसिक स्थैर्य अनुभवणे हे सुद्धा या उपवासाचे फायदे आहेत. यामुळे वजन कमी करण्यापासून ते इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवण्यापर्यंत अनेक फायदे होऊ शकतात. आता फायदे होतात हे जरी खरं असलं तरी योग्य मार्गदर्शनाशिवाय केलेले असे प्रयोग हे घातक ठरू शकतात.
पाणी पिऊन उपवास करण्याचे संभाव्य धोके
पोषणाची कमतरता:
अन्नाचे सेवन हे फक्त जिभेचे चोचले भागवण्यासाठी नाही तर पोषणाची गरज पूर्ण करण्यासाठी सुद्धा केले जाते. जेव्हा आपण अन्नच वगळता तेव्हा त्यातून मिळणारे पोषक सत्व, जीवनसत्त्व, खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्स यांची कमतरता जाणवू शकते. यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे किंवा आणखी गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
निर्जलीकरण:
हायड्रेशनसाठी पाणी अत्यावश्यक असले तरी, इलेक्ट्रोलाइट संतुलनाशिवाय जास्त पाणी पिण्यामुळे इलेक्ट्रोलाइट असंतुलन आणि निर्जलीकरण होऊ शकते.
चयापचयावर परिणाम:
दीर्घकाळ उपवास केल्याने चयापचय क्रिया मंदावते. शरीर ऊर्जा वाचवण्यासाठी तात्पुरती जुळवाजुळव करते पण उपवास संपल्यानंतर वजन वाढण्याची शक्यता असते.
आरोग्य स्थिती
मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग किंवा खाण्याचे विकार यासारख्या विशिष्ट वैद्यकीय परिस्थिती असलेल्या व्यक्तींनी पाण्याचा उपवास टाळावा.
२१ दिवसात १३ किलो वजन कसं घटवलं?
हे ही वाचा<< काळी मिरी, हळदीसह सद्गुरूंनी सांगितलेले हे ४ उपाय केल्यास कफ पटकन पडेल बाहेर; डॉक्टरांनी दिलेली माहिती वाचा
पाण्याच्या उपवासाच्या ऐवजी..
आपण इंटरमिटंट फास्टिंग करू शकता. अधूनमधून एखादा दिवस आपण पाणी पिऊन उपवास करू शकता. पण वैद्यकीय देखरेखीशिवाय अतिरेक करून आठवडाभर असा प्रयोग करणे जीवावर सुद्धा बेतू शकते. यामुळेच आपल्या आरोग्य स्थितीशी परिचित तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय असे प्रयोग करू नका.