मान्सून किंवा वातावरणातील कोणताही बदल हा एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो. घसा खवखवणं, पचनक्रियेशी संबंधित विकार निर्माण करू शकतो. त्यातच कोविड१९ चा धोका देखील अद्याप टळलेला नाही. त्यामुळे प्रकृतीची चिंता आणखी वाढली आहे. एखाद्याने लस घेतली तरी त्यानंतरही प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आणि व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी विशेष काळजी घेणं आपल्यासाठी महत्त्वाचंच आहे. याचबाबत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. दरम्यान, एक चांगली गोष्ट अशी कि यासाठी तुम्हाला तुमची अगदी आवडती गोष्ट मदत करणार आहे.
तुम्ही जर चहा प्रेमी असाल तर निश्चितच तुमच्यासाठी हा उपाय विशेष आवडीचा ठरेल. जवळपास सर्वांच्याच खास आवडीचा असणारा आल्याचा चहा हा आपल्या प्रकृतीसाठी अत्यंत गुणकारी असतो हे आपल्याला माहित आहेच. आपल्यापैकी अनेकांकडे विविध पद्धतीने हा चहा दररोज बनवला देखील जात असेल. विशेषतः पावसाळ्यात आणि हिवाळयात. आज आपण या चहाचे फायदे जाणून घेऊया. डॉ. दीक्षा भावसार आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये नमूद करतात कि, आपली प्रतिकारशक्ती वाढण्यासह अनेक फायद्यांसाठी लिंबाचा रस आणि मधासह दररोज स्वत: साठी एक कप आल्याचा चहा नक्की बनवा.
आयुर्वेदिक अभ्यासकांच्या मते, मसालेदार आणि गोड अशा परस्परविरोधी चवीचा आल्याचा चहा हे खरंतर विरोधाभासाचं एक परिपूर्ण मिश्रण आहे.
डॉ भावसार यांच्या मते, आल्याचा चहा पुढील गोष्टींसाठी अत्यंत फायदेशीर आहे.
- घशाला आराम मिळतो.
- आळस दूर होतो
- पोटाची चरबी बर्न करतो.
- गॅसमुळे होणारी पोटदुखी कमी करतो.
- पचनशक्ती वाढवतो.
- ब्लोटिंग कमी करतो.
- रोग प्रतिकारशक्ती वाढवतो.
आल्याचा चहा कसा बनवाल?
साहित्य :
- १ इंच आलं कापलेलं किंवा ठेचलेले
- १ ग्लास- पाणी
- लिंबाचा रस
- मध
कृती :
- एक इंच आलं पाण्यात उकळा. ५ ते ७ मिनिटे उकळून घ्या.
- त्यात लिंबाचा रस घाला.
- चहा खोलीच्या तपमानाप्रमाणे काहीसा थंड, कोमट झाल्यावरच मध घाला. खूप गरम असताना नाही.
“आलं हे मूळतः उष्ण असल्याने ज्या लोकांना रक्तस्त्राव विकार आणि जास्त पित्ताचा त्रास आहे त्यांनी मात्र त्याचं सेवन टाळावं. अशा व्यक्ती आल्याऐवजी बडीशेप, जिरं आणि धणे यांचा समावेश करू शकता”, डॉ भावसार म्हणाले.