लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आज २७ फेब्रुवारी, मराठी भाषा गौरव दिन, महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी दरवर्षी २७ फेब्रुवारी हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रातील मराठी भाषेला ज्ञानभाषा म्हणून ओळख निर्माण करून देण्यासाठी कुसुमाग्रज यांनी अथक मेहनत घेतली. त्यामुळे आपल्या मातृभाषेचा गौरव करण्यासाठी आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने २१ जानेवारी २०१३ रोजी घेतला. (Marathi Bhasha Gaurav Din 2024)
महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा टिकविण्यात आणि तो पुढे नेण्यात कुसुमाग्रजांचे फार मोलाचे योगदान आहे. महाराष्ट्राची बोलीभाषा मराठीला साहित्यविश्वात विशेष असे स्थान निर्माण करून देण्यामागे कुसुमाग्रजांची अपार मेहनत आहे. केवळ महाराष्ट्रातील मराठी साहित्यविश्वातच नाही, तर चित्रपट, नाटक अशा सर्व साहित्यनिर्मितीत त्यांनी भरीव काम केले; पण त्यांनी कवितालेखन हे विशेष कुसुमाग्रज या नावानेच केले. त्यामुळे अनेकांना कवी वि. वा. शिरवाडकर यांच्या कवितांपेक्षा ‘कुसुमाग्रज’ यांच्या कविता हे लक्षात राहते. त्यामुळे आजही त्यांचे मूळ नाव जितके कोणाच्या लक्षात येत नाही तितके टोपणनाव पटकन लक्षात येते. त्यामुळे अनेकांना त्यांच्या कुसुमाग्रज या नावामागे काय अर्थ आहे हे जाणून घेण्याची फार उत्सुकता आहे.
वि. वा. शिरवाडकर यांना ‘कुसुमाग्रज’ हे नाव का स्वीकारले?
कुसुमाग्रज यांचा जन्म १९१२ साली नाशिक येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते; पण ते लहान असताना त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतले. त्यामुळे त्यांचे नाव नंतर विष्णू वामन शिरवाडकर, असे बदलले. कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एकच लहान बहीण होती. सर्व भावंडांमध्ये कुसुम सर्वांत लहान होती. वि. वा. शिरवाडकर हे कुसुमपेक्षा वयाने मोठे होते. म्हणून त्यांनी त्यांचे टोपणनाव लाडक्या बहिणीच्या नावावरून ठेवले. ‘कुसुमाग्रज’ म्हणजे कुसुमचा अग्रज. म्हणजेच कुसुमपेक्षा मोठा, असा त्याचा अर्थ होतो. तेव्हापासून आजपर्यंत कवी वि. वा. शिरवाडकर यांना कुसुमाग्रज याच टोपणनावाने ओळखले जाऊ लागते.
इतकेच नाही त्या काळी वि. वा. शिरवाडकर यांच्यामुळे टोपणनावाने कविता लिहिण्याची ही विशेष पद्धत अनेकांना ठाऊक झाली. आजही कुसुमाग्रजाच्या कविता म्हणून त्यांच्या अनेक कविता तितक्याच आवडीने वाचल्या जातात.
कुसुमाग्रजांचे बालपण नाशिकमध्ये गेले. नंतर पुढील शिक्षण त्यांनी पुण्यात घेतले. बी.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पत्रकारिता, चित्रपट कथालेखन अशा क्षेत्रांत काम करू लागले. त्याबरोबरीने त्यांचे कविता लिहिणे सुरूच होते. दरम्यान, १९३३ रोजी त्यांचा ‘जीवनलहरी’ हा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर १९४२ मध्ये वि. वा. शिरवाडकर यांचा विशाखा हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. याच संग्रहामुळे कुसुमाग्रज हे नावदेखील प्रकाशझोतात आले. तो काळ नव्या बदलांचा काळ होता. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा सुरू होता; ज्याचे परिणाम समाजावर दिसत होते. यावेळी सामाजिक क्रांतीसाठी सावरकरांप्रमाणे कुसुमाग्रजांनी साहित्य हे माध्यम निवडले. यावेळी कुसुमाग्रज नाशिकमध्ये वास्तव्यास होते. त्यामुळे १९३२ साली झालेल्या नाशिक काळाराम सत्याग्रहातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून त्यावेळी सुरू असलेले सत्याग्रह, मोर्चे, आंदोलन यांच्यावर वास्तववादी कविता केल्या. स्वातंत्र्यानंतरही कुसुमाग्रजांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभाग घेतला. त्यामुळे कुसुमाग्रजांच्या त्या काळच्या कविता सामाजिक क्रांती, अन्यायाविरुद्ध लढा अशा परिस्थितींचे वर्णन करणाऱ्या होत्या. त्यातील ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’ , ‘उषःकाल’, ‘जालियनवाला बाग’, इ.अशा कवितांमधून त्यांनी देशप्रेमी विचार प्रकट केले.
कुसुमाग्रजांनी अक्षरबाग, किनारा, चाफा, छंदोमयी, जाईचा कुंज, जीवनलहरी, थांब सहेली, पांथेय, प्रवासी पक्षी, मेघदूत, समिधा, स्वगत, वादळवेल, मराठी माती, महावृक्ष, मारवा, हिमरेषा असे अनेक कवितासंग्रह त्यांनी लिहिले. तर त्यांच्या नाट्यसाहित्यामध्ये पेशवा, कौंतेय, आमचं नाव बाबुराव, ययाति आणि देवयानी, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट या नाटकांचा समावेश होतो. त्याशिवाय दूरचे दिवे, वैजयंती, राजमुकुट, ऑथेल्लो व बेकेट ही त्यांची नमुनेदार रूपांतरित नाटके आहेत. त्यातील त्यांच्या नटसम्राट या नाटकाने मराठी मनावर गेल्या दशकांमध्ये राज्य केले आहे. आजही त्या नाटकाची क्रेझ पाहायला मिळते; पण अनेकांना त्यांच्यातील कवीच अधिक भावला. त्यांना ज्ञानपीठ, पद्मभूषण अशा अनेक पुरस्कारांनी आजवर सन्मानित करण्यात आले.
कुसुमाग्रज यांच्या पाच प्रसिद्ध कविता आणि त्यांचा थोडक्यात भावार्थ जाणून घेऊ…
१) वेडात मराठे वीर दौडले सात
वेडात मराठे वीर दौडले सात ॥ धृ. ॥
“श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ १ ॥
ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील”
माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥
वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ३ ॥
“जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ४ ॥
ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ५ ॥
आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ६ ॥
खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ७ ॥
दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ८
१६७४ साली स्वराज्याचे सेनापती प्रतापराव गुजर आणि सहा मराठे सरदारांनी गाजविलेल्या शौर्याच्या प्रसंगाचे वर्णन करणारी ही कविता आहे.
२) क्रांतीचा जयजयकार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार
अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार!
खळखळू द्या या अदय शृंखला हातापायांत
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात?
सर्पांनो उद्दाम आवळा, करकचूनिया पाश
पिचेल मनगट परि उरातील अभंग आवेश
तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार
कधीही तारांचा संभार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!
क्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान
कुरतडू द्या आतडी करू द्या रक्ताचे पान
संहारक काली, तुज देती बळीचे आव्हान
बलशाली मरणाहून आहे अमुचा अभिमान
मृत्युंजय आम्ही! आम्हाला कसले कारागार?
अहो हे कसले कारागार?
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!
पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती
होऊनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती
कधी न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे
बांधू न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे
एकच ताळा समोर आणिक पायतळी अंगार
होता पायतळी अंगार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!
श्वासांनो जा वायूसंगे ओलांडुनी भिंत
अन् आईला कळवा अमुच्या हृदयातील खंत
सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात
बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात
तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परि अनिवार
तयांना वेड परि अनिवार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!
नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात
तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात ये तात
चरणांचे तव पूजन केले म्हणुनी गुन्हेगार
देता जीवन-अर्घ्य तुला ठरलो वेडेपीर
देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार
आई वेड्यांना आधार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!
कशास आई, भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
सरणावरती आज अमुची पेटता प्रेते
उठतील त्या ज्वालांतून क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायांमधले खळखळा तुटणार
आई, खळखळा तुटणार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!
आता कर ॐकारा तांडव गिळावया घास
नाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यावरी फास
रक्तमांस लुटण्यास गिधाडे येऊ देत क्रूर
पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर
शरीरांचा कर या सुखेनैव या सुखेनैव संहार
मरणा, सुखेनैव संहार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा क्रांतीचा जयजयकार
१९४८ साली इंग्रजांची जुलमी राजवट उलथून भारताला स्वतंत्र करण्यासाठी प्रत्येक जण झटत होता. यावेळी रणसंग्राम शेवटच्या टोकाला येऊन ठेपला होता. याच रणसंग्राम लढणाऱ्या लढवय्या देशभक्तांना शक्ती, नवी ऊर्जा देणारी ही कविता आहे.
३) कणा
“ओळखलंत का सर मला?’ पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशिणीसारखी चार भिंतींत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्त लढ म्हणा !
नैसर्गिक संकटाने होरपळलेल्या पीडितांना केवळ पैसा, वस्तू यापलीकडे एक मायेचा, जिव्हाळ्याचा आधार हवा असतो. अर्थात त्यांना माणसाचा आधार हवा असतो. हीच भावना या कवितेतून मांडण्यात आली आहे.
४) अखेर कमाई
मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले .
ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो
फक्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले,
मी फक्त मराठ्यांचा.
आंबेडकर म्हणाले,
मी फक्त बौद्धांचा.
टिळक उद़्गारले,
मी तर फक्त
चित्पावन ब्राह्मणांचा.
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र
फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !
या कवितेच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात वेगवेगळ्या महापुरुषाचे स्वत:ला अनुयायी म्हणवून घेणारे लोक कशी समाजाची फसवणूक करतात? महापुरुषांच्या अपेक्षा काय होत्या आणि अनुयायी त्या कशा पद्धतीने सांगतात. या विषयावर अतिशय मार्मिकपणे बोट ठेवले आहे.
५) पृथ्वीचे प्रेमगीत
युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करू प्रीतीची याचना
नव्हाळीतले ना उमाळे उसासे
न ती आग अंगात आता उरे
विझोनी आता यौवनाच्या मशाली
ऊरी राहीले काजळी कोपरे
परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे
अविश्रांत राहील अन् जागती
न जाणे न येणे कुठे चालले मी
कळे तू पुढे आणि मी मागुती
दिमाखात तारे नटोनी थटोनी
शिरी टाकिती दिव्य उल्काफुले
परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा
मला वाटते विश्व अंधारले
तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचूनिया दिव्य तेजःकण
मला मोहवाया बघे हा सुधांशू
तपाचार स्वीकारुनी दारुण
निराशेत सन्यस्थ होऊन बैसे
ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रृव
पिसाटापरी केस पिंजारुनी हा
करी धूमकेतू कधी आर्जव
पिसारा प्रभेचा उभारून दारी
पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी प्रीतीची याचना लाजुनी
लाल होऊनिया लाजरा मंगळ
परी दिव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे
तळी जागणारा निखारा उफाळून
येतो कधी आठवाने वर
शहारून येते कधी अंग तूझ्या
स्मृतीने उले अन् सले अंतर
गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे
मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठातली आग प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा
अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्
मला ज्ञात मी एक धुलिःकण
अलंकारण्याला परी पाय तूझे
धुळीचेच आहे मला भूषण
पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सर्वांना माहीत आहे. पण, या पृथ्वीभोवतीच्या वातावरणात विविध धूलिकण, धूमकेतू, गुरुत्वाकर्षण अशा कितीतरी गोष्टींचेही अस्तित्व आहे. या कवितेच्या माध्यमातून त्यांचे हे अस्तित्व अधोरेखित करण्यात आले आहे.