शब्दांचीच ‘रत्ने’
हा ‘भेटला’ कुठे भेटला ना तर त्याच्याकडून आपल्या बरोबरीच्यांवर कुरघोडी कशी करावी याचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. त्याने त्याच्या बरोबरच्या दोन शब्दांना अगदी नामोहरम केलेलं आहे. आणि त्याच्या बरोबरीचे ते दोन शब्द तितकेच अर्थपूर्ण असूनही बिचारे कसेबसे तगून आहेत.
हा ‘भेटला’ हल्ली कुठेही भेटतो. म्हणजे मार भेटतो, पैसा भेटतो आणि देवही भेटतोच. गाडी भेटते, वेळ भेटते (किंवा नाही भेटत) आणि मैत्रीणही भेटतेच. किंवा सुख भेटतं, तिकीट भेटतं असं सगळं भेटतंच! थोडक्यात, ‘भेटला’ हा शब्द शोधणारा आणि तो जे शोधतो आहे ते, इच्छिणारा आणि इच्छित यांचा संयोग दाखवण्यासाठी वापरला जातो. मग ते काही का असे ना!
पण आपली भाषा अधिक समृद्ध आहे. हाच संयोग दाखवण्यासाठी आपल्याकडे तीन वेगवेगळे शब्द आहेत. त्यांचा वापर करणं अधिक उचित ठरावं, नाही का? कोणते ते शब्द, काय आहे त्यांच्यातला फरक आणि ते कधी वापरायचे हे आज आपण पाहू.
‘भेटणे’, ‘मिळणे’ आणि ‘सापडणे’ हे ते तीन शब्द. त्यातला सर्वात सोपा सापडणे. आधी तोच पाहू. एक सोपी युक्ती सांगतो. ती लक्षात ठेवली म्हणजे झालं. हरवणेच्या विरुद्ध सापडणे. जे हरवतं ते सापडतं. तीन वाक्यातला एक विनोद सांगतो म्हणजे हे पक्कं लक्षात राहील.
बंडूचा फोन हरवला होता. सुदैवाने तो सापडला.
बंडूचं पाकीट हरवलं होतं. सुदैवाने तेही सापडलं.
बंडूची बायको हरवली होती. दुर्दैवाने तीही सापडली.
छापणाऱ्यांनी वरच्या तिसऱ्या वाक्यात काही चूक तर नाही ना केलेली छापताना?
अनेक लोक ‘मिळणे’ हा शब्द ‘हरवणे’च्या विरुद्ध वापरतात. पण निदान मला तरी काही ते योग्य वाटत नाही. ‘हरवणे’च्या विरुद्ध ‘गवसणे’ असाही एक खूप गोड शब्द पूर्वी वापरात असे पण हल्ली मात्र तो फारसा वापरात नाही.
आता आपण त्या दांडगट ‘भेटणे’कडे मोर्चा वळवू या. हा शब्द कधी वापरायचा हे ठरवण्याची सोपी युक्ती आधी सांगतो. ज्या कोणाची भेट होऊ शकते त्याच्याच संदर्भात भेटणे हो शब्द वापरणं इष्ट. मित्राची भेट होऊ शकते. मैत्रिणीची भेट होऊ शकते.. फारशी नाही, पण कधी कधी तरी! ओळखीच्या एखाद्या माणसाची भेट होऊ शकते. तेव्हा मित्र भेटला, मैत्रीण भेटली, ओळखीची व्यक्ती भेटली हे योग्य आहे. पी. सावळाराम यांचं एक गोड गाणं आहे,
देव जरी मज कधी भेटला
काय हवे ते माग म्हणाला
यात ‘भेटला’ हा शब्द अगदी अचूक आहे. कारण इथे देवाचं सगुण रूप गृहीत धरलेलं आहे.
‘भेटला’ वैतागणार आता. तो इतका लोकप्रिय होता की अगदी सगळीकडे तो भेटत होता. हा नियम पाळायचा तर तो फारसा भेटणार नाही. आपली लोकप्रियता अशी कमी झालेली कोणाला आवडेल!
पण तुमच्या मनातही हा विचार येणार की मग मार, पैसा, वेळ (किंवा टाइम), गाडी, सुख, तिकीट या आणि अशा सगळ्या गोष्टींचं काय करायचं? काळजीचं कारण नाही. त्यांच्यासाठी आपल्याकडे मिळाला आहे ना! या सगळ्या ठिकाणी तो मिळाला अगदी चपखल बसतो.
भाषेविषयी आपण किती बेपर्वा असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘टाइम भेटला तर मी येऊन जाईन’ हे वाक्य! खरोखर, हे वाक्य ऐकलं की मला मराठी भाषेची कीव येते. किती अत्याचार सहन करावेत एखाद्या समृद्ध भाषेने! आधी एक तर तो ‘टाइम’ कशाला हे मला कळत नाही. वेळ नसतो (म्हणजे घाई असते या अर्थी!) म्हणावं तर ‘वेळ’ ‘टाइम’पेक्षा छोटा आहे हो. छोटाही आणि सोपाही. बरं तो लहानथोर सगळ्यांना व्यवस्थित कळतो! पण तरीही आपण आपले त्या टाइमावर अडकून राहतो.
बरं टाइम तर टाइम. पण तो भेटेल कसा? तो काय कोणी माणूस आहे भेटायला? पण ज्या माणसाला वेळेऐवजी टाइम वापरताना मनाला क्लेश होत नाहीत त्याच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार आपण?
अर्थाचा विचार न करता सगळीकडे भेटला हाच शब्द वापरायचं ठरवलं तर काय गोंधळ उडू शकेल याचं उदाहरण म्हणून ही पूर्णपणे भिन्न अर्थाची दोन वाक्यं बघा :
..कॉलेजमध्ये मला खूप मित्र मिळाले.
..कॉलेजमध्ये मला खूप मित्र भेटले.
ही दोन्ही वाक्यं अगदी अचूक आहेत. पहिल्या वाक्यामध्ये लिहिणारा असं सांगतो आहे की माझी खूप विद्यार्थ्यांबरोबर मैत्री झाली. म्हणजे जशी ‘खूप बक्षिसं मिळाली’ तसे ‘खूप मित्र मिळाले’. इथे मित्रांबरोबर झालेली भेट अभिप्रेत नाही. तेच दुसऱ्या वाक्यात मात्र मित्रांबरोबर झालेली भेट अभिप्रेत आहे.
असो. तर लहानाचे मोठे होताना आपल्याला चांगल्या शाळा-कॉलेजात प्रवेश मिळतो. अभ्यासाला भरपूर वेळ मिळतो, त्यामुळे शिक्षकांचा मार वगैरे मिळत नाही. उलट शाबासकी मिळते. बाहेर फिरायला गेलो की इष्ट मित्र भेटतात. आणि क्वचित कधी, मैत्रिणीबरोबर फिरायला गेलो की अनिष्ट मित्र! लग्नसमारंभात वगैरे नातेवाईक मंडळी भेटतात. मग पुढे नोकरी मिळते. पैसा मिळतो. चांगली बायको मिळायला मात्र भाग्य लागतं. पण भेटते एखादी चांगलीशी मुलगी आणि आपला सुखाचा संसार चालू होतो. ते झालं की ‘एका लग्नाची गोष्ट’मध्ये दामले गातात तसं आपणही गायला मोकळे,
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं?
काय पुण्य असलं की ते घरबसल्या मिळतं?
आता त्यांच्याइतकं गोड गाता येत नसेल आपल्याला तर चारचौघांसमोर नये गाऊ, पण बाथरूममध्ये एकांतात गायला काय हरकत आहे!
संदीप देशमुख – response.lokprabha@expressindia.com / @ShabdRatne
सौजन्य – लोकप्रभा