भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकीची स्विफ्ट ही कार अत्यंत लोकप्रिय कार आहे. याच लोकप्रियतेमुळे मारुतीच्या स्विफ्टने विक्रीच्या बाबतीत एक मोठा टप्पा गाठला आहे. 2005 मध्ये लाँच झाल्यापासून आतापर्यंत स्विफ्टच्या 20 लाखांहून जास्त कारची विक्री झाली आहे. मंगळवारी कंपनीने याबाबत माहिती दिली.
सप्टेंबर 2010 मध्ये कंपनीने 5 लाख कारची विक्री केली होती. यानंतर डिसेंबर 2013 मध्ये 10 लाख कारच्या विक्रीचा टप्पा गाठला. तर मार्च 2016 मध्ये 15 लाख आणि यावर्षी नोव्हेंबरमध्ये 20 लाख कारची विक्री केली. गेल्या एका दशकापासून भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप 5 कारमध्ये स्विफ्टचा समावेश होतोय, 20 लाखांची विक्री ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे, असं मारुती सुझुकी इंडियाचे मार्केटिंग आणि सेल्स प्रमुख आयएस कालसी म्हणाले.
सध्या भारतीय बाजारात नेक्स्ट जनरेशन स्विफ्ट लॉन्च करण्यात आली असून आकर्षक डिझाइन आणि शानदार फिचर्समुळे ही नवी स्विफ्टदेखील लोकांच्या पसंतीस उतरतेय. पेट्रोल आणि डिझेल अशी दोन्ही पर्यायांमध्ये ही कार उपलब्ध आहे.