Health Benefits Of Massaging Your Feet With Oil : दिवसभर काम केल्यानंतर रात्री पलंगावर पडताच झोप लागावी, असेच आपण मनात धरून चालत असतो; पण अनेकदा तसे होत नाही. दिवसभर धावपळ, कामाचा ताण इतका असतो की, रात्री झोपायला गेल्यावरसुद्धा मनात सतत विचार चालू असतात. कारण- आपण तासन् तास मोबाईलवर असतो आणि मग झोप पूर्ण झाली नाही, अशीही तक्रार करतो. मग झोप यावी म्हणून अनेकदा आपण रात्रभर तळमळत राहतो.

चांगली जीवनशैली जगण्यासाठी कमी ताणतणाव आणि शांत झोप खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे अनेक आरोग्य तज्ज्ञसुद्धा पुरेशी झोप घेण्याची शिफारस करतात. ज्यांना थकवा, पाय दुखणे, निद्रानाश व तणावाची समस्या आहे, त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यांना मालिश करणे फायदेशीर ठरू शकते, असे आढळून आले आहे.

रात्री पुरेशी झोप येत नसली तर, पायांच्या तळव्यांना तेलाने मालिश केल्याने चांगली झोप येते. पायांना मालिश केल्याने शरीरात रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे आपल्या शरीराला आराम मिळतो. पण, आता तुम्ही विचाराल की, पायांना मालिश करण्यासाठी कोणते तेल सगळ्यात उत्तम आहे. तर मग याचबद्दल आपण जाणून घेऊ…

पायांची मालिश करण्यासाठी कोणते तेल सगळ्यात बेस्ट आहे तर याचबद्दल आपण जाणून घेऊया…

तिळाचे तेल (Sesame oil)

तणाव आणि निद्रानाश दूर करण्यासाठी दररोज झोपण्यापूर्वी तिळाच्या तेलाने पायांच्या तळव्यांना मालिश करा. तिळाच्या तेलामध्ये टायरोसिन अमिनो आम्ल असते, जे सेरोटोनिन हार्मोन वाढवते. त्यामुळे तुमचा मूड सुधारतो, गाढ झोप येते आणि तुम्हाला तणावमुक्त झाल्यासारखेही वाटते.

मोहरीचे तेल (Mustard oil)

आयुर्वेदातही मोहरीचे तेल आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते, असे म्हटले आहे. या तेलाने पायांना मालिश केल्याने स्नायूंना आराम मिळतो आणि रक्ताभिसरणाची गती सुधारते. मासिक पाळीच्या वेळी पोटदुखी, पेटके येणे यांसारख्या जाणवणाऱ्या समस्या दूर होतात. जर तुम्हाला निद्रानाशाच्या समस्येचा त्रास होत असेल, तर मोहरीच्या कोमट तेलाने पायांना मालिश केल्याने आराम मिळतो. तसेच चिंता आणि तणाव कमी करण्यासाठीदेखील हे तेल उपयुक्त मानले जाते.

लव्हेंडर तेल (Lavender oil)

लव्हेंडर तेलात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, जंतुनाशक आणि दाहकविरोधी गुणधर्म असतात. पायांच्या मालिशसाठी लव्हेंडर तेलाचा वापर केल्याने औषधाप्रमाणे आराम मिळतो आणि चिंता, ताण थकवा कमी करण्यास व रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. निद्रानाशाची समस्या दूर करण्यासाठी हा उपाय नैसर्गिक उपचारांपैकी एक आहे. त्याचबरोबर जास्त केसगळतीचा त्रास असलेल्या लोकांसाठी हा एक खास उपाय ठरू शकतो.

नारळाचे तेल (Coconut oil)

नारळाच्या तेलाने पायांना मालिश केल्याने मानसिक आरोग्य सुधारते आणि चिंता, नैराश्य, ताण यांसारख्या समस्यांपासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर जर तुम्हाला स्नायू किंवा पायांमध्ये वेदना, पेटके येत असतील, तर हे तेल लावल्याने खूप आराम मिळू शकतो.

बदामाचे तेल (Almond oil)

जर बदामाच्या तेलाने पायांना मालिश केले, तर ताण कमी होतो, नैराश्यावर मात करता येते. त्यामुळे मानसिक शांतीसाठी दररोज बदामाच्या तेलाने पायांच्या तळव्यांना मालिश करा.