नुकतच झालेल्या मास्टरशेफ ऑस्ट्रेलियाच्या फिनालेमध्ये पारंपारिक पद्धतीची डिश सादर झाली. पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातील मूळ खाद्यपदार्थाला नवीन नाव देत किश्वर चौधरी या स्पर्धकांने ही डिश सादर केली. शो मध्ये किश्वरने सादर केलेल्या वेगवेगळ्या डिश आणि त्यांच्या नावामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावरती चर्चेत आहे. तिने फिनालेमध्ये बंगाली सीमेवरील ओळखली जाणारी पारंपारिक डिश ‘आलू भरता’ आणि ‘पंता भात ‘सादर केली. तिने या डिशला नवीन टच देत ‘स्मोक्ड राईस वॉटर’ असे नवीन नावही दिले. भरता आणि भातासोबत तिने बाजूला सारडिन आणि साल्साही सर्व्ह केलं.
कशी तयार केली जाते ही पारंपारिक डिश?
पिढ्यानपिढ्या या रेसिपीच्या आरोग्यास होणाऱ्या फायद्याबद्दल सांगितले जाते. बर्याच घरांमध्ये आंबलेल्या तांदळाची डिश बनविली जाते. थोडेसे पाणी घालून तांदूळ रात्रभर आंबण्यासाठी ठेवले जातात. किमान १२ तासांसाठी ही प्रक्रिया केली जाते. भारताच्या पूर्वेकडील भागातील बर्याच घरांमध्ये ही डिश तुम्हाला नक्कीच दिसेल. ही डिश सकाळी नाश्त्यासाठी खाल्ली जाते. आंबवलेल्या भातावर मोहरीचे तेल, एक चिमूटभर मीठ आणि लिंबाचा रस टाकला जातो. तसेच भातासोबत उकडलेले बटाटे, फिश फ्राय, दही किंवा कसुंडी (मोहरीपासून बनवलेला सॉस) खाऊ शकता.
कोण आहे किश्वर चौधरी?
जगभरात बंगाली पाककृती पोहचवण्याच स्वप्न घेऊन आपली ओळख बनवणाऱ्या किश्वरचा मेलबर्नमध्ये जन्म झाला. तिची आई लैला आणि वडील कामरूल चौधरी हे क्टोरियातील बांगलादेशी समुदायाचे संस्थापक आहेत. तिची मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया सीझन १३ मुळे यशस्वी ओळख निर्माण झाली आहे. तिने मोनाश विद्यापीठातून वाणिज्य पदवी पूर्ण केली तर लंडनमधील कला विद्यापीठातून ग्राफिक डिझाईनमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. तिला तिच्या मुलांसाठी पारंपरिक आणि लुप्त पावत चालेल्या बांगलादेशी फ्लेवर्स आणि रेसिपी वर एक पुस्तक लिहायचे आहे. ती सांगते की, तिला मलेशियन-ऑस्ट्रेलियन कुक, कलाकार आणि लेखक पोह लिंग येओ यांनी प्रेरित केले आहे. ते आधीच्या सिजनमध्ये स्पर्धकही होते.