Matka Water Cooling Hacks : उन्हाच्या झळा आता जाणवू लागल्या आहेत. भारतातील अनेक राज्यांतील तापमानाचा पारा वाढू लागला आहे. दुपारी इतके कडक ऊन पडते की लोक बाहेर पडण्यापूर्वी विचार करतायत. अशा परिस्थितीत उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी लोक फ्रीजमधील थंड पाण्याचा आधार घेतायत. पण, फ्रीजमधील पाण्यामुळे आजारांची भीती असते, त्यामुळे बरेच जण फ्रीजमधील पाण्याऐवजी माठातील पाणी पितात.

पण, कधीकधी माठातील पाणी फ्रीजमधील पाण्याइतके थंड लागत नाही, अशावेळी पाणी थंड होण्यासाठी अनेक उपाय करून पाहिले जातात, पण काहीच उपयोग होत नाही. अशावेळी माठातील पाणी फ्रीजसारखं थंड होण्यासाठी खालील व्हिडीओतील एका सोप्या ट्रिकचा वापर तुम्ही करू शकता. या ट्रिकच्या मदतीने माठात दिवसभर थंडगार पाणी राहील.

माठातील पाणी थंड ठेवण्यासाठी टिप्स

माठ आधी साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यानंतर एका भांड्यात एक चमचा व्हिनेगर, मीठ आणि बेकिंग सोडा घेऊन त्याचे द्रावण तयार करा. आता हे तयार द्रावण माठाच्या आतील बाजूस नीट लावून घासून घ्या. असे एक ते दोन वेळा करा, ज्यामुळे माठातील भरलेली छिद्र मोकळी होतील.

माठातील छिद्र मोकळी होताच त्यातून हवा व्यवस्थित पास होते आणि पाणी योग्यप्रकारे थंड राहते, त्यामुळे माठातील पाणी थंड ठेवण्यासाठी तुम्हाला वेगळे कष्ट करावे लागत नाहीत. दरम्यान, ही ट्रिक कशाप्रकारे करायची याचा एक व्हिडीओ खाली पोस्ट करण्यात आला आहे, जो तुम्ही फॉलो करू शकता. इन्स्टाग्रामवर @Vedansir_ नावाच्या युजरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

माठातील पाणी थंड राहण्यासाठी तुम्ही दुसरी एक ट्रिकदेखील वापरू शकता. यासाठी एक पूर्ण दिवस माठात पाणी भरून ठेवा, त्यानंतर त्यातील पाणी काढून पुन्हा त्यात ताजं पाणी भरून ठेवा, त्यामुळे माठातील पाणी गार राहण्यास मदत होईल. शिवाय तुम्ही माठाभोवती एक पांढरा रुमाल किंवा मोठं कापड ओलं करूनदेखील गुंडाळून ठेवू शकता.