शारीरिक रोगांवरील उपचारांसाठी वापरली जाणारी औषधे (उदाहरणार्थ उच्च रक्तदाबावरील औषध) ही सिझोफ्रेनिया, दुभंगलेले व्यक्तिमत्त्व आदींसारख्या मानसिक आजारांतही उपयुक्त असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबतचा अभ्यास ‘जामा सायकॅस्ट्री’ या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. स्वीडनमधील गंभीर मानसिक व्याधी जडलेल्या एक लाख ४२ हजार ६९१ रुग्णांबाबतची माहिती या संशोधकांनी अभ्यासली आहे. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सी मिथाइल ग्लुटारिल या सहसंप्रेरकाचे (याला स्टॅटिन म्हणूनही ओळखले जाते) सेवन करणाऱ्या रुग्णांचा, तसेच उच्च रक्तदाबावरील एल टाइप कॅल्शियम चॅनेल अ‍ॅन्टागोनिस्ट किंवा मधुमेहावरील बायगुआनाइडस घेणाऱ्या रुग्णांवर या अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यात आले. स्वीडनची कॅरोलिन्स्का इन्स्टिटय़ूट आणि इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या संशोधकांनी स्वत:ला जखमी करून घेतलेल्या रुग्णांची तसेच रुग्णालयीन मानसोपचारांची माहिती तपासून विश्लेषण केले. रुग्णाची ही वर्तणूक ते ही औषधे घेत असतानाची आहे, की त्यांचे सेवन करीत नसतानाची आहे, याची संशोधकांनी माहिती घेतली. ज्या काळात हे रुग्ण ही औषधे घेत होते, त्या काळात त्यांना (ही औषधे घेत नसलेल्या कालावधीच्या) तुलनेत कमी वेळा रुग्णालयीन उपचारांची गरज भासली, असे दिसून आले. या औषधांचे सेवन करणाऱ्या सिझोफ्रेनिया आणि व्यक्तिदुभंगाच्या रुग्णांमध्ये स्वत:ला जखमी करून घेण्याचे प्रमाण कमी झाल्याचे आढळले. नॉन अ‍ॅफेक्टिव्ह सायकोसिसच्या रुग्णांमध्येही असाच परिणाम दिसून आला.

याबाबत युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनचे जोसेफ हायेस म्हणाले की, व्यक्तिदुभंगासारखे गंभीर मानसिक रोग हे उपचारांसाठी आव्हानात्मक आहेत. स्टॅटिनसारख्या मोठय़ा प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या अनेक औषधांचा मानसिक आजारांतही लाभ होत असल्याचे बऱ्याच काळापासून लक्षात आले होते.