जगामध्ये राहण्यासाठी सर्वोत्कृष्ट शहर कोणते, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर त्याचे उत्तर आहे मेलबर्न. एका संस्थेने वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे केलेल्या पाहणीमधून मेलबर्न शहराची निवड झाली आहे. याच यादीमध्ये सर्वात खालच्या क्रमांकावर सिरियाची राजधानी दमास्कसचा क्रमांक लागला आहे.
इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने ही पाहणी केली. शहरातील स्थिरता, आरोग्याच्या सुविधा, संस्कृती आणि पर्यावरण, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या आधारे ही निवड करण्यात आली. अंतिम फेरीमध्ये मेलबर्नने व्हिएन्ना, व्हॅनकोव्हर, टोरांटो आणि कॅलगरी यांना मागे टाकून बाजी मारली. ऑस्ट्रेलियातील चार शहरांनी टॉप १० शहरांमध्ये स्थान मिळवले आहे. त्यामध्ये मेलबर्नसोबत ऍडलेड, पर्थ आणि सिडनी यांचा समावेश आहे. फिनलंडची राजधानी हेलसिंकी आणि न्यूझिलंडमधील ऑकलंडमधील शहरानेही टॉप १० शहरांमध्ये स्थान मिळवले आहे.
ऑस्ट्रेलियातील सर्वांत वेगाने प्रगती करणाऱया मेलबर्नची जगातील राहण्यासाठी सर्वोत्कृष्ट शहर म्हणून पुन्हा एकदा निवड झाल्याचा आम्हाला आनंद वाटतो, या शब्दांत जेफ्री कोनाघन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सिरियातील दमास्कस, इजिप्तची राजधानी कैरो, लिबियामधील त्रिपोली ही शहरे या यादीमध्ये सर्वांत खालच्या स्थानावर आहेत.

Story img Loader