भारतीय वैद्यकीय शास्त्रात योगासने, ध्यानधारणा याला खूपच महत्त्व आहे. मानसिक आरोग्यासाठी नियमित योगासने, ध्यानधारणा करणे आवश्यक आहे. आता अमेरिकी शास्त्रज्ञांनीही योगासनांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. जर नियमित योगासने केल्यास स्मृती टिकवून ठेवता येते, त्याशिवाय अल्झाइमर म्हणजेच स्मृतिभ्रंश या विकारावर मात करता येते, असे अमेरिकी शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
लॉस एंजलिस येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील मानसोपचारतज्ज्ञांच्या एका गटाने ‘योगासने आणि मानसिक आरोग्य’ यावर संशोधन केले. नियमित योगासने आणि ध्यानधारणा केल्याने मानसिक आणि भावनात्मक समस्यांचे निराकरण होते. या समस्यांमुळेच स्मृतिभं्रशासारखे विकार जडतात. वयोपरत्वे स्मृती कमी होत जाते. वृद्ध व्यक्तीला आपल्या तरुणपणाच्या बऱ्याचशा गोष्टी आठवत नसतात. पण काही तरुणांनाही मानसिक विकारामुळे स्मृती कमी झाल्याचे जाणवते. पण जर नियमित योगसने केल्यास स्मृतीला बळकटी मिळते, असे या शास्त्रज्ञांनी सांगितले.
केवळ स्मृतीच नव्हे, तर सर्वच मानसिक विकारांसाठी योगासने उपयुक्त आहेत. मानसिक तणाव, चिंता यांचे निराकरणही योगासनांमुळे होते, असे या शास्त्रज्ञांच्या गटाचे प्रमुख प्रा. हेलेन लवरेटस्की यांनी सांगितले. शास्त्रज्ञांच्या या गटाने ५५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या २५ जणांवर प्रयोग केले. या २५ लोकांकडून नियमित योगासने आणि ध्यानधारणा करून घेण्यात आली. योगासनांनंतर त्यांच्या मानसिक आरोग्याचा आढावा घेण्यात आला. योगासने आणि ध्यानधारणेनंतर या लोकांच्या मेंदूतील स्मृतीविषयक भागात सुधारणा झाल्याचे आढळले, असे लवरेटस्की यांनी सांगितले. हे संशोधन ‘जनरल ऑफ अल्झाइमर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा