पावसाळ्यानंतर वाताचे व कफाचे त्रास अनेकांना होतात. अशा वेळी उष्ण गुणात्मक, शरीरात व त्वचेच्या ठिकाणी स्निग्धता निर्माण करणारे, तसेच कफनाशक व वातनाशक पदार्थ पोटात गेलेले चांगले असतात. त्यामुळे हे गुणधर्म देणारे पदार्थ या दिवसांत लाडू वा चिक्कीसारख्या पदार्थामध्ये वापरता येतात. थंडीत आवर्जून केल्या जाणाऱ्या काही लोकप्रिय लाडूंमध्ये मेथीच्या लाडूचा समावेश आहे. जाणून घेऊयात मेथीच्या लाडूचे फायदे…
कणीक, साखर, तूप, सुकामेवा या नेहमीच्याच पदार्थाना प्रामुख्याने मेथीची जोड देऊन हे लाडू केले जातात. मेथी कडू रसाची असल्याने जंतुघ्न म्हणून उपयोगी पडते. त्यात ‘डायसोजेनिन’ नावाचे महत्त्वाचे तत्त्व असते. त्यामुळे सूजनाशक आणि जंतूनाशक असे दोन्ही गुणधर्म त्यातून मिळतात. सांध्यांची सूज, स्नायूंच्या वेदना, घशात जंतुसंसर्गामुळे येणारी सूज यावर मेथी उपयुक्त ठरते. थंडीने छातीत कफ जमा होणे, सर्दी होणे, हात-पाय-कंबर आखडणे अशा तक्रारींवर मेथी उपयुक्त ठरते.
थंडीत केसात होणारा कोंडा दूर करण्यासाठीही मेथीचा उपयोग करता येतो. मेथीत ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्व, लोह व कॅल्शियम आहे. त्यामुळे मेथी थंडीत उत्तम टॉनिकचे काम करते. रक्त वाढवणे, रक्तशुद्धी करणे, हाडांना बळकटी देणे, त्वचा व डोळ्यांची काळजी घेणे हे फायदे मेथीच्या सेवनाने मिळतात. तेव्हा हिवाळ्यात मेथीच्या लाडूंचा खाण्यात जरूर समावेश करावा. नेहमीच्या स्वयंपाकातही अल्प प्रमाणात मेथीचा वापर करता येतो.