दूध जसे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. तितकेच ते चमकदार त्वचेसाठीही महत्वपूर्ण आहे. दुधाशिवाय आपण निरोगी जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. दुधामुळे आपल्याला संपूर्ण पोषक तत्व मिळतात. तसेच दुधामध्ये प्रथिनाव्यतिरिक्त, जीवनसत्त्वे, ए, डी, के, बी१२, बी६, बायोटिन, पोटॅशियम, कॅल्शियम यासह अनेक पोषक घटक असतात. एवढेच नाही तर दुधापासून अनेक पदार्थ तयार करतो. त्या पदार्थांचा वापर आपण रोजच्या आहारात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात करत असतो.
दुधाचा वापर केवळ आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्य वाढवण्यातही त्याचा तितकाच महत्त्वाचा वाटा आहे. अनेक कॉस्मेटिक उत्पादने बनवण्यासाठीही दुधाचा वापर केला जातो. तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेत असताना दुधाचा वापर अशा पद्धतीने करू शकता.
त्वचेसाठी दुधाचे फायदे:
दुधामध्ये व्हिटॅमिन ए, डी, के ही पोषक घटक असतात. त्यामुळे तुम्ही त्वचेच्या स्वच्छतेसाठी कच्चे दूध वापरू शकता. दुधामध्ये लॅक्टिक अॅसिड आढळते, ज्यामुळे काळे डाग, मुरुम दूर होतात. यामुळे चेहऱ्याच्या टॅनिंगपासून आराम मिळतो. दुधामध्ये असलेल्या मलईचा तुम्ही फेस पॅक बनवून तो चेहर्यावर लावल्याने चेहरा हायड्रेट ठेवता येतो. यामुळे चेहऱ्यावरील ओलावा टिकून राहतो आणि चेहरा मुलायम आणि चमकतो. दुधापासून बनवलेले तूप तुम्ही ओठांना लावल्यास ओठांचा कोरडेपणा दूर होतो.
चमकदार चेहऱ्यासाठी कच्चे दूध कसे वापरावे?
चेहरा चमकदार दिसण्यासाठी तुम्ही दुधात हळद मिसळून त्वचेवर लावू शकता. यासाठी तुम्ही दुधात हळद मिसळून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा.
त्याचप्रमाणे चेहरा मुलायम बनवायचा असेल तर दुधात मध मिसळून नियमित सेवन केल्यास काही दिवसातच त्वचा चमकदार दिसेल.
तुम्ही दूध आणि मध यामध्ये जर लिंबाचा रस मिसळून सेवन केल्यास चेहर्यावरील मुरुमांच्या समस्येवर मात करता येते.
दुधात गाजराचा रस मिसळून त्याचे सेवन केल्यास त्वचा घट्ट होण्यास मदत होते. तसेच त्वचेवर मॉइश्चरायझेशन राहते.