Gram Flour Face Packs For Glowing Skin : हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणे सामान्य आहे. पण, यादरम्यान चेहऱ्यावरील ओलावा नाहीसा होतो आणि चमकदेखील हळूहळू कमी होऊ लागते. मृत त्वचा साचून राहिल्यामुळे चेहऱ्याचा रंग फिकट दिसू लागतो. त्यासाठी बेसनाचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. अनेकदा तुम्हीसुद्धा घरगुती फेस पॅक (Face Pack) बनवताना बेसन, दही, दुधाचा नक्कीच वापर केला असेल.
बेसनाच्या पिठात दूध किंवा दही मिसळले, तर ते आणखी प्रभावी ठरू शकते. बेसनाचे पीठ दुधात मिसळून लावल्याने चेहऱ्याची चमक परत येते आणि चेहऱ्यावर साचून राहिलेले त्याज्य घटक निघून जातात. तर दुसरीकडे त्यात दही मिसळून लावल्याने त्वचेचे टॅनिंग कमी होते. पण, सगळ्यांच्या चेहऱ्यासाठी हे योग्य आहे का? बेसनाचे पीठ दुधात मिसळून चेहऱ्यावर (Face Pack) कोणी लावावे आणि दही मिसळलेले बेसन कोणी चेहऱ्यावर लावावे हे जाणून घेणे खूप जास्त महत्त्वाचे आहे.
बेसनाच्या पिठात नक्की कोणता पदार्थ मिसळून लावणे योग्य ठरेल (Face Pack)?
१. बेसन आणि दूध
ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनी बेसनाचे पीठ दुधात मिसळून चेहऱ्याला लावावे. त्यामुळे तुमची त्वचा मऊ, चमकदार राहील. २ चमचे बेसनाचे पीठ (grain flour), २ चमचे कच्चे दूध मिसळून, त्याची स्मूद पेस्ट बनवा आणि चेहऱ्याला लावा. हा फेस पॅक सुमारे १५ ते २० मिनिटे लावा आणि नंतर साध्या पाण्याने चेहरा धुऊन घ्या. आठवड्यातून दोन ते तीन वेळा याचा वापर केल्याने खराब झालेली चेहऱ्यावरील साफ होईल आणि त्वचा चेहऱ्यावर चमक येईल.
२. बेसन आणि दही
ज्यांची त्वचा तेलकट आहे, त्यांनी दह्यात बेसन मिसळून वापरल्यास फायदा होईल. त्यासाठी दोन चमचे बेसन दोन चमचे दह्यात मिसळा. पर्यायी लिंबाचा रसही टाकू शकता. आता सर्व गोष्टी मिसळून फेस पॅकप्रमाणे चेहऱ्यावर लावून घ्या. त्यामुळे टॅनिंग, डाग दूर होतील आणि कोमेजलेल्या त्वचेला जीवदान मिळेल.
बेसन आणि दही त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठीही प्रभावी आहेत. तुम्ही आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर बेसन आणि दही वापरणे योग्य ठरेल.