प्रसूतीच्या प्रारंभिक दिवसांच्या अवस्थेची माहिती देऊ शकतील अशा लघू नाळी अर्थात ‘मिनी प्लासेंटा’ निर्माण करण्यात शास्त्रज्ञ यशस्वी झाले आहेत.
मृत अर्भक जन्माला येणे आणि गर्भपतन यांसारख्या जननदोषांचे स्वरूप समजून घेणे त्यांच्याद्वारे शक्य होऊ शकेल. गर्भाशयात गर्भाचे योग्यरीत्या प्रत्यारोपण न झाल्याने अनेक गर्भधारणा यशस्वी होत नाहीत. अशा गर्भाची नाळ त्यांच्या मातेशी जोडली जाऊ शकत नाही. गर्भाच्या प्रारंभिक काळातील विकासाची ही अवस्था समजून घेणे अत्यंत गुंतागुंतीचे आहे. त्यामुळे या अवस्थेत कोणती प्रक्रिया सुरळीत सुरू आहे आणि कोणती चूक घडू शकते, याची अत्यंत कमी माहिती मिळू शकते.
प्राणी आणि मानव यांच्यात अनेक भेद असल्याने प्राण्यांवरून मानवातील नाळीचा विकास व गर्भ जोडला जाण्याची प्रक्रिया याची पुरेशी माहिती मिळू शकत नाही. इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठाच्या मार्गेरिटा टुर्को यांनी सांगितले की, ‘बाळ हे आईच्या गर्भात वाढत असताना त्याला आधार देणारी नाळ ही अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या वेळी नाळ योग्यरीत्या कार्य करीत नाही, त्या वेळी ‘प्रीइक्लामसिया’ (गर्भावस्थेत रक्तदाबासह इंद्रियांची हानी आदी) तसेच गर्भपतनासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. याचे तात्काळ व आजीवन दुष्परिणाम आई आणि बाळावरही होऊ शकतात. परंतु या इतक्या महत्त्वाच्या अवयवाविषयीचे आपले ज्ञान सुयोग्य प्रायोगिक प्रारूपाविना अत्यंत मर्यादित आहे.’
‘केंब्रिज’मधील शास्त्रज्ञांनी नाळेतील ऊतीपासून तयार केलेल्या ‘ऑर्गनॉइड’चा अर्थात अवयवसदृश गाठींचा या संशोधनासाठी वापर केला. गर्भावस्थेत कोणती औषधे सुरक्षित ठरू शकतात, हे निश्चित करण्यासाठीही या संशोधनाचा उपयोग होऊ शकतो.