लखनौच्या संशोधकांचे मत
पुदिन्याची पाने कर्करोग बरा करण्यासाठी गुणकारी आहेत, असे लखनौच्या सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिसिनल अँड अॅरोमेटिक प्लँट्स या संस्थेच्या वैज्ञानिकांनी संशोधनाअंती म्हटले आहे.
पुदिन्याच्या पानावर करण्यात आलेल्या संशोधनानुसार त्यात औषधी गुण असल्याचे दिसून आले. या वनस्पतीत एल मेंथॉल नावाचा रासायनिक घटक असतो. तो कर्करोगविरोधी गुण दाखवणारा आहे. ओमिक्स अ जर्नल ऑफ इंटिग्रेटिव्ह बायॉलॉजी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. एल मेंथॉल हे नैसर्गिक रसायन आतडय़ाच्या कर्करोगात चांगल्या पेशींना धक्का न लावता कर्करोगग्रस्त पेशींना मारते. मेंथा संयुगे कर्करोग पेशींचे विभाजन थांबवतात व त्यांची वाढही रोखतात, त्यामुळे कर्करोग इतर अवयवात पसरत नाही. एल मेंथॉल या नैसर्गिक रसायनामुळे कर्करोगावर किफायतशीर पद्धतीने मात करता येते. सध्या कर्करोगावर युरोपातील यू ट्रीच्या बुंध्याचा अर्क वापरला जात असतो. त्यातील संयुगही कर्करोगाला मारक असते, पण आता त्याऐवजी पुदिन्याच्या अर्काचा वापर केला जाणार आहे. मेंथा म्हणजे पुदिना ही वनस्पती जगभरात सापडते व युरोपातील यू ट्रीपेक्षा ती सहज उपलब्ध आहे. यू ट्री हा युरोप, आफ्रिका व आशियाच्या काही भागांत आहे. मेंथॉल हे या वनस्पतीला इजा न करता वेगळे करता येते. शिवाय युरोपीय यू ट्री हा त्याचा अर्क काढण्यासाठी तोडावा लागतो, तरच कर्करोगरोधक संयुग वेगळे काढता येते. हा शोध शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, कारण भारतात पुदिन्याचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)