केसांमध्ये कोंडा होणं ही अगदी सर्रास होणारी तक्रार आहे. अगदी १० वर्षांच्या मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत कोणाच्याही डोक्यामध्ये कोंडा होऊ शकतो. या कोंड्यापासून सुटका मिळविण्यासाठी सध्या बाजारामध्ये विविध प्रकारचे शॅम्पू, तेल किंवा हेअर कंडिशनर उपलब्ध आहेत. मात्र अनेक वेळा या साऱ्याचा वापर केल्यानंतरही केसातील कोंडा काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही. डोक्यावरची त्वचा सतत नवीन पेशींची निर्मिती करत असते. जुन्या पेशी मृत होऊन गळून पडतात आणि त्यांची जागा नव्या पेशी घेतात. तापमानात वाढ होते तशी या पुर्ननिर्माण प्रक्रियेची गती वाढते. अधिक प्रमाणात आणि सतत पेशींचे गळून पडणे सुरू होते. त्यामुळे केसांमध्ये काही वेळा पांढऱ्या छोटय़ा आकाराचे किंवा कधी खपल्यांसारखे निघालेले त्वचेचे थर दिसतात. केसातले हे त्वचेचे थर म्हणजेच कोंडा. केस कोरडे असतील तर हा कोंडा केस विचंरताना पडतो. तेलकट केसांमध्ये डोके खाजवल्यावर तो सुटा होऊन दिसू लागतो.

केसांमध्ये कोंडा हा कोणत्याही ऋतूमध्ये होऊ शकतो. डोक्यातील कोंडा हा पांढरा फ्लेक्स आहे जो टाळूच्या पृष्ठभागावरून बाहेर पडू लागतो. प्रदूषण, उष्णता आणि तेल, पोषणाची कमी, जास्त गरम पाण्याने डोके धुणे तसेच केस व्यवस्थित न धुणे यामुळे कोंडा होऊ शकतो. तुम्ही पण जर का केसांमध्ये होणाऱ्या कोंड्यामुळे त्रस्त असाल तर आज आपण कोंड्याच्या समस्येपासून सुटका कशी मिळवायची ते पाहणार आहोत. कोंडा दूर करण्यासाठी काही घरगुती पदार्थ देखील वापरले जाऊ शकतात. यापैकी एक पदार्थ म्हणजे मध. मधाचा वापर करून कोंडा कसा दूर करता येतो ते पाहुयात.

हेही वाचा : Raksha Bandhan 2023: लाडक्या बहिणीला स्मार्टवॉचसह भेट द्या ‘ही’ युनिक गिफ्ट्स, एकदा पाहाच

मधाचा वापर हा केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी वापरला जातो. दाहक विरोधी गुणधर्म असल्यामुळे मध आरोग्यासाठी खूप चांगला समजला जातो. त्याचबरोबर त्वचेची निगा आणि केसांची निगा राखण्यासाठीही मधाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी मधापासून हेअर मास्क तयार करता येतो. पहिला उपाय म्हणून मधामध्ये खोबरेल तेल मिसळून ते मिश्रण केसांना लावावे. १५ ते २० मिनिटे डोक्यावर हे मिश्रण ठेवल्यानंतर केस धुवावेत. यामुळे डोके चांगले स्वच होते व केस चमकू लागतात.

तसेच डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी मध आणि दह्याचा हेअर मास्क देखील केसांना लावता येतो. यासाठी एका भांड्यामध्ये एक चमचा दही, एक चमचा मध, एक चमचा ऑलिव्ह तेल आणि एक चमचा खोबरेल तेल एकत्रित करावे. याचे मिश्रण केसांना लावावे. त्यानंतर केसांमध्ये हलक्या हातानी मसाज करावा. हे मिश्रण अर्धा तास डोक्यावर ठेवावे. त्यानंतर डोके स्वच्छ धुवावे. यामुळे डोक्यातील कोंडा कमी होण्यास मदत होईल.

हेही वाचा : या ६ उपायांनी केसातील कोंडा बरा होऊ शकतो, पुरुषांसाठीही आहे उपयुक्त

डोके धुतल्यानंतर कोंडा कसा दूर झाला आहे आणि केसांवर कोंडा नाही हे आपण पाहू शकाल. या उपायांचा परिणाम एकदा वापरून पहिले की लक्षात येईल. जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही हे उपाय २ ते तीन वेळा सतत करून पाहू शकता.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. योग्य उपाय डॉक्टरांशी चर्चा करूनच करावा.)