Mobile Charging Short Circuit, 4 Siblings Died: उत्तर प्रदेश जिल्ह्यातील पल्लवपुरम भागात घराला लागलेल्या आगीत चार भावंडांचा होरपळून मृत्यू झाला असल्याचे समजतेय. या दुर्घटनेत त्यांचे पालक सुद्धा जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली. पल्लवपुरमच्या जनता कॉलनीत शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. मोबाईल चार्ज होत असताना शॉर्ट सर्किट झाल्याने आग पेटली, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.
प्राप्त माहितीनुसार, या आगीत होरपळून १० वर्षांची सारिका, आठ वर्षांची निहारिका, सहा वर्षांचा संस्कार उर्फ गोलू आणि चार वर्षांचा काळू अशा चार भावंडांना आपला जीव गमवावा लागला आहे. आई-वडील जॉनी (४१ ) आणि बबिता (३७) हे सुद्धा भाजल्याने गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर या चारही भावंडांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जॉनीची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी बबिताची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जॉनी यांनी पोलिसांना सांगितल्याप्रमाणे, मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना शॉर्टसर्किट होऊन बेडशीटने पेट घेतला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा सुद्धा वेळ त्यांना मिळाला नाही. दरम्यान, सदर प्रकरणी पोलिसांचा तपास सध्या सुरु आहे.
या प्रकरणानंतर मोबाईल चार्जिंग करताना सुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे हे आपल्याही लक्षात आले असेल. फार घाबरून न जाता मोबाईलचा चार्जर निवडताना आपण खालील गोष्टींची काळजी घेऊ शकता.
१) ‘युनिव्हर्सल चार्जर’ वापरणे टाळावे. कारण या चार्जर्सची रचना ही अत्यंत साधी असून त्यात संरक्षणात्मक कॉइल नसते. जर मोबाईल फोनच्या बॅटरीचा व्होल्टेज खूप जास्त असेल तर चार्जरवर ताण येऊन तो तापू शकतो परिणामी शॉर्ट सर्किट होण्याचा धोका असतो. तुमच्या मोबाईलच्या व्होल्टेजनुसारच चार्जर निवडा. यासाठी मोबाईलच्या ब्रँडनुसार चार्जर वापरणे फायद्याचे ठरेल. तसेच हे चार्जर सुद्धा नीट तपासून पाहा, तुटलेली किंवा सैल झालेली तयार सुद्धा मोठा धोका निर्माण करू शकते.
२) सॉकेटमध्ये किती व्हॉल्टेजचा करंट आहे हे तपासणे सुद्धा आवश्यक आहे. जर मुळात सॉकेटमधील वीज प्रवाह तीव्र असेल तर चार्जरवर व मोबाईलवर ताण येणे साहजिक आहे. प्रशिक्षित इलेक्ट्रिशियन कडून नीट तपासणी करून घरातील योग्य सॉकेटमध्येच मोबाईल चार्जर लावावा.
३) अन्न, पाणी, गॅस पासून चार्जर व मोबाईल दोन्ही दूर ठेवा.
४) मोबाईल फोन चार्ज होत असताना त्यातून उष्णता बाहेर पडत असते. अशावेळी मोबाईलवर उशी किंवा अन्य काही वस्तू ठेवून झाकल्याने उष्णतेला बाहेर पाडण्यासाठी जागा मिळत नाही परिणामी स्फोट होऊ शकतो. त्यामुळे मोबाईल मोकळ्या जागेत ठेवा.
५) झोपताना मोबाईल फोन चार्जिंगला लावून अजिबात ठेवू नका.