मुंबईत मान्सून दाखल झालाय. एकीकडे करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी ब्लॅक फंगस, यल्लो फंगसचा धोका वाढत असतानाच पावसाळ्यामुळे आरोग्यासंदर्भातील तक्रारी अधिक वाढण्याची भिती व्यक्त केली जातेय. त्यामुळे आरोग्य सांभाळण्यासाठी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे…
१) हातपाय स्वच्छ धुणे
पावसाळाच्या दिवसात आपण प्रवासात किंवा जेव्हा घऱाबाहेर पडतो तेव्हा आपल्या नकळत काही विषाणू घरात घेऊन येतो. त्यामुळेच बाहेरुन आल्यानंतर अन्न पदार्थ खाण्याआधी किंवा घरभर फिरण्याआधी हात पाय स्वच्छ धुवावे. आजकाल आपल्याकडे हॅण्ड सॅनिटायझर असल्याने त्याचा देखील वेळोवेळी वापर करुन हात स्वच्छ ठेवावेत.
२) पावसाळ्यात रस्त्यावरचे अन्न खाणे टाळावे
करोनाच्या काळात रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवणे खूप महत्वाचे आहे, आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. पावसाळ्यात वातावरण बदलामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होते . अनेकदा बाहेरचे पदार्थ बनवण्यासाठी योग्य ती काळजी घेतली गेली नसली तर असे पदार्थ खाल्ल्याने पोटदुखी, जुलाब किंवा अन्न पचनासंदर्भातील आजार होण्याची शक्यता आहे . त्यामुळे रस्त्यावरचे खाणे टाळावे .
३) डासांपासून सुरक्षित रहा
पावसाळच्या दिवसांत डासांचे प्रमाण वाढते. घरात किंवा घराच्या आसपास पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. कारण साठलेल्या पाण्यात डासांची पैदास जास्त होते. डासांमुळे डेंगू मलेरियासारखे आजार पसरतात. डासांना दूर ठेवण्यासाठी क्रीमचा वापर करा.
४) योग्य आहार आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवा
पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी असते तेव्हा सकस, शुद्ध, पोषक आहाराला प्राधान्य द्यावे. घरचे अन्न खावे. भाज्या, फळे रोगप्रतिकार शक्ती वाढवायला मदत करतात. चांगलं अन्न खाल्ल्याने खोकला, सर्दी, ताप, अशा पावसाळी आजरांपासून सहज संरक्षण मिळते.
५) त्वचेची काळजी घ्या
पावसाळ्यात त्वचा आजार टाळण्यासाठी जेवणात भाज्यांचा समावेश करा. खास करुन मेथी, कारल्यासारख्या भाज्या या काळात फायद्याच्या ठरतात. कडूलिंबांचे सेवन केल्यानेही फायदा होतो. या भाज्यांमधील रसायने शरीरातील व चेहर्यावरील टवटवीतपणा टिकून राहण्यासाठी मदत होते.
६) आंबट गोष्टी खाणे टाळावे
पावसाळ्यात आंबट गोष्टी खाणे टाळावे. आंबट गोष्टींमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढून शरीराला सूज येण्याची शक्यता असते.
७) पचनासाठी जड असणारे पदार्थ खाणे टाळा
पावसाळ्यात आपल्या शरीराची पचनशक्ती थोडी अशक्त झालेली असते. त्यामुळे आजारी पडण्याची श्यक्यता असते. म्हणून तळलेले पदार्थ, मांसाहर, पचायला जड असणारे पदार्थ टाळा.
८) मधल्या वेळामध्ये ग्रीन टी वगैरे प्या
पावसाळाच्या दिवसात आपल्याला दिवसभरात मधल्या वेळेत जेव्हा भूक लागेल तेव्हा गरम सूप, हर्बल चहा, ग्रीन टी, अशी अनेक पेय घेणे नेहमी फायद्याचं ठरतं. पावसाळ्यात खास करून शीत पेयांचे सेवन टाळावे. कारण शीत पेय शरीरातील क्षारांवर परिणाम करतात ज्यामुळे आपल्या शरीरातील पचंनक्रियेवर ताण पडतो.
या लहान लहान सवयींची काळजी घेतल्यास हा पावसाळा तुम्हाला नक्कीच आरोग्यदायी जाईल यात शंका नाही.