पावसाळ्याच्या महिन्यात घरात कितीही स्वच्छता ठेवली तरी कीटक, सरपटणारे प्राणी, पाली, झुरळ हे घरात येतातच. मुख्यतः तळमजल्यावर राहणाऱ्यांना या न बोलावलेल्या पाहुण्यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. बाथरूम मध्ये, टॉयलेट मध्ये हे प्राणी सर्रास येतात, इतकेच नव्हे तर हळूहळू रांगत घरभर सुद्धा पसरतात. या प्राण्यांच्या मार्फत अनेक आजारांचे विषाणू सुद्धा पसरत असतात, तर पावसाळ्यातील काही प्राणी जसे की खूप पाय असणारी गोम शरीराला चावल्यास मोठा अपाय होऊ शकतो. आज आपण या समस्येवर काही सोपे घरगुती उपाय पाहणार आहोत, जे आपण साधारण रोज रात्री झोपण्याआधी केल्यास हे प्राणी घरात येण्याची शक्यता कमी होते. चला तर पाहुयात.
सर्वप्रथम लक्षात घ्या पावसाळ्यात घर फिनाईलने पुसून काढण्याचा सल्ला दिला जातो, हे फायद्याचेच आहे मात्र लादी पुसल्यावर ती कोरडी सुद्धा करा. ओल्या ठिकाणी गांडूळ, माशा अधिक येतात. घरातील पाणी भरून ठेवण्याची भांडी सुद्धा वेळच्या वेळी घासून स्वच्छ करत जा. जर घरातील विशिष्ट ठिकाणी छोटे मोठे भगदाड पडले असेल तर ते वेळीच बुजवा. अनेकदा पावसाळ्यात घुशी व उंदीर सुद्धा बाथरूम मध्ये माती पोखरून ठेवतात ज्यातून अन्य प्राणी घरात येतात हे सर्व छिद्र बुजवा. इतकं करूनही जर घरात गांडूळ, गोम यांचा वावर असेल तर खालील उपाय करा..
१) जाड मीठ/ खडा मीठ- बाथरूममध्ये व टॉयलेट मध्ये पांढरे जाड मीठ म्हणजेच खड्याचे मीठ पसरवून ठेवा. मीठातील क्षार या किड्यांना मारून टाकते.
२) डांबर गोळ्या- बाथरूम मध्ये व घरातील सर्व कानाकोपर्यात आपण नेप्थलीन बॉल म्हणजे डांबर गोळ्या पसारवून ठेवा
३) पुदिन्याची पाने- घरात सतत झुरळ किंवा गांडूळ येत असल्यास त्यांच्या येण्याच्या ठिकाणी पुदिन्याची पाने कुस्कुरून टाका.
४) कडुलिंबाचा पाला- घरात कडुलिंबाचा पाला अडकवून ठेवल्यास माशांचे प्रमाण कमी होते
५) कापूर- शक्य झाल्यास एक दिवस आड घरात कापूर जाळा. नारळाची धुरी केल्यास त्यात कडुलिंबाचा पाला घालावा.
६) पाण्याची पिशवी- घरात खूप माशा येत असतील तर एका कोपऱ्यात पाण्याची पिशवी भरून वर बांधून ठेवा त्यात एक नाणं टाका.
७) बोरिक पावडर- बाथरूम व टॉयलेट मध्ये बोरिक पावडर व ब्लिचिंग पावडर टाकून घ्या. या पावडरचा गंध खूप उग्र असतो त्यामुळे एक दिवस आड टाकू शकता. किंवा काही वेळ ठेवून व फारशी घासून धुवून काढू शकता.
८) पेट्रोलियम जेली- आपण जेव्हा घरातील बाथरूमचे पाईप किंवा टॉयलेट स्वच्छ करतो तेव्हा हा उपाय करता येईल. या ठिकाणी फरशीवर किंवा टॉयलेटच्या पृष्ठभागावर पेट्रोलियम जेली पसरवून ठेवा जेणेकरून गांडूळ व अन्य सरपटणारे प्राणी तिथे अडकून पडतील.
९) व्हिनेगर- प्राणी घरात येणाऱ्या ठिकाणी रात्री एक चमचा व्हिनेगर ओतावे, जेणेकरून त्या गंधाने प्राणी कमी होतील.
१०) बेकिंग सोडा- आपल्याला ब्लिचिंग पावडरचा उग्र गंध सहन होत नसेल तर पर्यारी आपण बेकिंग सोडा सुद्धा बाथरूमच्या फरशीवर टाकून ठेवू शकता. व्हिनेगर व बेकिंग सोडायचे मिश्रण घातल्यास फारशी स्वच्छ राहण्यास सुद्धा मदत होते.
तुमच्याकडेही असे काही घरगुती उपाय असतील तर आम्हाला नक्की कळवा!