Monsoon Skin Care Tips: पावसाळा सुरू झाला की जशा आहाराच्या पद्धती बदलायच्या असतात तसंच आपलं स्किनकेअर रुटीनदेखील बदलावं लागतं. ऋतू बदलामुळे केसांच्या, त्वचेच्या समस्या वाढतात. पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे त्वचेवर अधिक प्रमाणात तेल तयार होते, तसंच घामदेखील येतो. यामुळे तुमचा चेहरा तेलकट आणि निस्तेज दिसू शकतो; तसंच चेहऱ्याला खाजदेखील येऊ शकते.
चेहऱ्यावरील तेल, डेड स्कीन निघून जावी यासाठी चेहरा धुणं खूप आवश्यक आहे. चेहरा धुताना उगाच अतिप्रमाणात तो घासून स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू नये, कारण यामुळे तुमची स्कीन कोरडी पडू शकते.
घाम आल्यानंतर चेहरा धुणं आवश्यक आहे का? (Monsoon Skin Care Tips)
अमेरिकन ॲकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजी असोसिएशनच्या (American Academy of Dermatology Association) मते, चेहरा धुताना जास्त स्क्रब न करता तो फेसवॉशने हळूवारपणे धुवावा. दिवसातून दोनदा म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी चेहरा धुणे आवश्यक आहे. जेव्हा त्वचा जास्त तेलकट होते आणि त्वचेवर जास्त घाम येतो, तेव्हा लगेच चेहरा धुतला पाहिजे.
दिवसातून किती वेळा फेस वॉश करावा? (Frequency of Face Wash)
चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी आणि चेहरा तजेल दिसण्यासाठी स्किनकेअर रुटीन फॉलो केलं पाहिजे आणि यासाठी चेहरा स्वच्छ धुतला गेला पाहिजे.
डॉ. रिंकी कपूर, सल्लागार त्वचाशास्त्रज्ञ, कॉस्मेटिक डर्माटोलॉजिस्ट आणि डर्माटो-सर्जन, द एस्थेटिक क्लिनिक्स यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने दिवसातून दोनदा चेहरा धुतलाच पाहिजे.
धकाधकीच्या जीवनात आपण अनेकदा चेहऱ्याची काळजी घेण्याचं विसरून जातो आणि मग पिंपल्स, तेलकट त्वचा, ब्लॅक हेड्स अशा समस्यांना आपल्या त्वचेला सामोरं जावं लागतं.
हवेतील आर्द्रता वाढल्याने त्वचेवर तेलाचे प्रमाण वाढते तसंच धूळ, घाम जमा होऊन चेहऱ्यावरील छिद्र (Pores clogged) बंद होऊ शकतात आणि त्यामुळे पिंपल्सदेखील येऊ शकतात. दिवसातून दोनदा चेहरा धुतल्याने या सगळ्या समस्या दूर होऊ शकतात आणि त्वचा निरोगी आणि तजेलदार राहण्यास मदत होऊ शकते.
डॉ. शौर्य ठकरन एमबीबीएस आणि एमडी, रक्षा सौंदर्यशास्त्राचे संस्थापक म्हणतात की, दिवसातून दोनदा किंवा तीनदा चेहरा धुणे चांगले आहे, पण सकाळी एकदाच चेहरा धुवू नये.
चेहरा धुण्याचा उद्देश (Purpose Of Washing Face)
१. सकाळी उठल्यानंतर चेहरा धुतल्यास चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल आणि रात्रीच्या वेळी साचलेली अशुद्धता निघून जाते.
२. दिवसाच्या शेवटी तुमच्या चेहऱ्यावर खूप घाम, तेल आणि प्रदूषक चिकटलेले असतात.
३. दमट पावसाळी हवामानात चेहऱ्यावरील छिद्र (Pores clogged) बंद होणे, पिंपल्स येणे अशा समस्या अधिक प्रमाणात निर्माण होतात.
जर तुम्ही दिवसभरात बराच वेळ घराबाहेर असाल आणि तुम्हाला तुमचा चेहरा डल वाटत असेल तर तुम्ही त्यावेळेस चेहरा धुणे आवश्यक आहे.
जेव्हा तुम्ही चेहरा अतिप्रमाणात धुता तेव्हा नेमकं काय होतं?
चेहऱ्यावर वारंवार पाणी शिंपडणे त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करू शकते. परंतु , चेहरा अतिप्रमाणात धुतल्यास याचा उलट परिणाम होतो. यामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक तेल कमी होऊ शकते आणि कोरडेपणा येऊ शकतो. तसंच चेहऱ्याला खाजही सुटू शकते.
फक्त पाणी की फेस वॉश, कोणता पर्याय चांगला
जर तुम्ही फक्त पाण्याने चेहरा धूत असाल तर कदाचित तो तुमच्यासाठी चांगला पर्याय नसू शकतो. (Monsoon Skin Care Tips) कारण फेश वॉशशिवाय फक्त पाण्याने तेल, त्वचेवरील घाण आणि डेड स्कीन निघूच शकेल असं नाही. जेन्टल क्लिन्जर वापरण्यावर भर द्या आणि जास्त स्क्रब करणे टाळा, असं तज्ज्ञांच म्हणणं आहे.
चमकदार त्वचेचे रहस्य (Secret of Glowing Skin)
डॉ. सुष्मिता, त्वचारोगतज्ज्ञ, त्वचा शल्यचिकित्सक, स्पर्श हॉस्पिटल यांच्या म्हणण्यानुसार, सॅलिसिलीक ॲसिड किंवा टी ट्री ऑईलच्या फेश वॉशने तुमचा चेहरा दिवसातून दोनदा धुणे अत्यावश्यक आहे. चेहरा धुण्याव्यतिरिक्त आठवड्यात एकदा जेंटल स्क्रबने एक्सफोलिएट करण गरजेचं असतं. तसंच चेहरा हायड्रेट राहण्यासाठी नॉन-कॉमेडोजेनिक मॉइश्चरायझर लावणंदेखील तितकच महत्त्वाचं असतं.
त्वचा उजळण्यासाठी आणि पर्यावरणाच्या हानीपासून संरक्षण करण्यासाठी व्हिटॅमिन सीसह अँटिऑक्सिडेंट सीरम समाविष्ट करणे महत्त्वाचे ठरेल. याशिवाय दररोज सनस्क्रिनचा वापर करणेही तितकेच अनिवार्य आहे. सनस्क्रिन तीन तासांनंतर पुन्हा लावावे लागते – उदा- सकाळी ८ ते ११ ते दुपारी २.०० पर्यंत. हेवी मेकअप टाळणं , तुमची त्वचा जास्त तेलकट होणार नाही याकडे लक्ष देणे, तसंच फळे आणि भाज्यांनी समृद्ध आहार पाळणे; यामुळे तुम्हाला पावसाळ्यातील त्वचेच्या सामान्य समस्या टाळण्यास आणि तुमची त्वचा चमकदार ठेवण्यास मदत करेल.