लंडनच्या आरोग्यतज्ज्ञांचा दावा
‘साखरेचे खाणार त्याला देव देणार’ अशी जरी म्हण असली तरी साखरेचे अति प्रमाण आरोग्यासाठी घातकच. लहान मुले तर नेहमीच गोड खाण्याचा हट्ट करतात. त्यांचा हा हट्ट पालकांकडून पुरविला जात असला तरी त्यामुळे त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण त्यामुळे वाढते. ४ ते १० वष्रे या वयोगटातील प्रत्येक मूल दरवर्षी २२ किलोग्रॅम साखरेचे सेवन करते, असा दावा लंडनमधील काही आरोग्यतज्ज्ञांनी केला आहे.
पाच वर्षांच्या मुलाचे सर्वसाधारण वजन २० ते २२ किलोग्रॅम असते. मात्र ४ ते १० वयोगटातील मुले याच वजनाइतकी साखर दरवर्षी सेवन करतात, असे या आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले. ब्रिटनमध्ये या आरोग्यतज्ज्ञांनी आरोग्य अभियान राबविले होते, त्यादरम्यान ही माहिती हाती आली.
पालकांनी त्यांच्या मुलांच्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मुले अधिक प्रमाणात साखरेचे सेवन करत असल्याने त्यांच्यामध्ये लठ्ठपणा आणि दात किडणे आदी आरोग्याच्या समस्या उभ्या ठाकतात. मुलांना जेवढी साखर आवश्यक आहे, त्यापेक्षा तिप्पट साखर त्यांच्या शरीरात जात असल्याने हे धोकादायक आहे, असे या आरोग्यतज्ज्ञांनी हे अभियान राबविताना सांगितले.
मुले शीतपेये, बिस्किटे, केक, बनपाव, मिठाई, चॉकलेट्स, फळे, पेस्ट्री, आइसक्रीम यांचे अधिक प्रमाणात सेवन करत असतात. यातून मोठय़ा प्रमाणात शर्करा त्यांच्या शरीरात जात असते. साखरेचे अतिरिक्त प्रमाण टाळावे आणि पालकांनी मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे या हेतूने जनजागृतीसाठी अभियान राबविण्यात आल्याचे या आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले.
मुले मोठय़ा प्रमाणात साखरेचे सेवन करतात. त्यामुळे वजन वाढणे, लठ्ठपणा आणि दात किडणे आदी समस्या उद्भवू शकतात. मुलांच्या मानसिक आरोग्यावरही याचा परिणाम होतो. दात किडणे किंवा लठ्ठपणामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि शाळा बुडविण्याकडे त्यांचा कल असतो.
डॉ. अॅलिसन टेडस्टोड, आहारतज्ज्ञ