डास हे खूप अंतरावरून माणसाचा माग हा आपल्या श्वासातून बाहेर पडणाऱ्या कार्बन डायॉक्साईड वायूवरून काढतात व नंतर त्वचेत कुठल्या ठिकाणी चावायचे तो भाग वासावरून शोधतात असे भारतीय वंशाच्या  वैज्ञानिकासह काही संशोधकांनी केलेल्या संशोधनात दिसून आले आहे.
मादी डास हे मलेरिया व डेंग्यूसारखे रोग पसरवतात. त्यामुळे ताप येतो. आपण जो कार्बन डायॉक्साईड श्वासातून बाहेर टाकतो त्याच्या मदतीने डास त्या व्यक्तीपासून ते किती अंतरावर आहेत याचा अंदाज घेतात. एकदा ते मानवी शरीराजवळ आल्यानंतर उघडय़ा अंगाच्या दिशेने म्हणजे पाय, हात यांच्या दिशेने त्वचेच्या वासावरून येतात.  
रिव्हरसाइड येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात हे संशोधन झाले असून डास हे स्पर्शकाच्या मदतीने कार्बन डायॉक्साईड ओळखतात व नंतर शरीराच्या दिशेने येताना त्यांना मोजे, बिछान्यावरील कापड, परिधान केलेले कपडे यावरून त्यांना कार्बन डायॉक्साईडशिवायही व्यक्ती कोठे आहे याचा अंदाज येतो. या संशोधनातील प्रमुख संशोधक आनंद शंकर राय यांच्या मते डासातील कार्बन डायॉक्साईड ओळखणारा न्यूरॉन संग्राहक म्हणजेच सीपीए अनेक प्रकारच्या त्वचेचा वास ओळखतो व तो कार्बन डायॉक्साईडपेक्षाही वासाच्या रेणूंना जास्त संवेदनशील असतो आतापर्यंत डासाचे वाससंबंधी न्यूरॉन त्वचेचा वास कसा ओळखतात हे कोडे होते.
सीएन या संवेदकामुळे मानवाचा वास त्यांना लागतो व ते आकर्षिले जातात. त्यामुळे डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या एडीस एजिप्ती डासातील सीपीएची क्रिया बंद पाडून आपण या डासांना रासायनिक मार्गाने भरकटवू शकतो व त्यामुळे ते आपल्याला चावू शकत नाहीत. माणसाच्या पायाच्या वासाचा डासाच्या वर्तनावर काय परिणाम होतो याचीही चाचणी करण्यात आली. यात लाखो संयुगांची रासायनिक मार्गाने तपासणी करण्यात आली. त्यात १३८ संयुगात विशिष्ट गुणधर्म आढळून आले. काही संयुगांनी सीपीए न्यूरॉनला कार्यान्वित केले, त्यात चव, गंध व सौंदर्यप्रसाधक घटक होते.  
मिंट, रास्पबेरी, चॉकलेट  याचा मात्र सीपीए विरोधात वापर करता येतो. इथिल प्युरूवेट हे फळाच्या वासाचे संयुग तर सायक्लोपेंटॅनोन या मिंटच्या वासाच्या सीपीए न्यूरॉन संवेदकावर वैज्ञानिकांनी लक्ष केंद्रित केले असून ते डासांचे मानवी हाताकडे आकर्षित होणे रोखू शकतात. त्यात सीपीए न्यूरॉन संवेदकाचे काम रोखले जाते. सायक्लोपेंटॅनोनचा वापर डासांना आकर्षित करून पकडण्यासाठी केला जाऊ शकतो असे सेल या नियतकालिकात म्हटले आहे.

Story img Loader