Mosquito Homemade Liquid: कोणताही ऋतू असला तरी डासांची संख्या वाढतानाच दिसते आणि त्यामुळे आपण सर्वच हैराण होतो. खेड्यापासून मोठमोठ्या शहरांपर्यंत प्रत्येक ठिकाणी डासांची दहशत पाहायला मिळते. अनेक उपाय करूनही डासांची ही पैदास कमी होत नाही. त्यामुळे अनेकांना मलेरिया, डेंग्यू अशा जीवघेण्या आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळेच आज आम्ही डासांना दूर पळवून लावण्यासाठी काही उपाय तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत.

घरातील डासांना दूर पळविण्यासाठी काय करावं?

घरातील डासांपासून दूर राहण्यासाठी लोक विविध उपाय करीत असतात. अनेक जण डासांना मारण्यासाठी कॉइल जाळतात, स्प्रे किंवा जंतुनाशकाची फवारणी करतात. परंतु, एवढे केल्यानंतर डास काही प्रमाणात कमी झाल्यासारखे वाटले तरी त्यांचा त्रास सुरूच राहतो. जर तुमच्याही घरात दररोज डास येत असतील, तर तुम्ही काही उपाय करून त्यांना दूर पळवून लावू शकता.

  • कडुलिंब, नारळाचे तेल व कापूर

कडुलिंबाच्या पानांद्वारे तुम्ही डासांना सहज दूर पळवू शकता. सर्वप्रथम कडुलिंबाची पाने घ्या आणि ती नीट धुऊन, त्यांची पेस्ट बनवा. त्यात कापूरही टाका. आता ते पाण्याच्या मदतीने थोडे पातळ करा. पातळ केल्यानंतर कापडाच्या मदतीने गाळून घ्या. त्यात खोबरेल तेल मिसळून चांगले मिश्रण तयार करा. हे मिश्रण तुम्ही रिकाम्या स्प्रे बाटलीत भरून वापरू शकता. तसेच हे मिश्रण तुम्ही मॉस्किटो रिपेलंट मशीनच्या रिकाम्या बाटलीतही भरून वापरू शकता. कडुलिंब, कापूर व खोबरेल तेलाच्या नैसर्गिक मिश्रणने तुमच्या घरातील डास कमी होण्यास मदत होईल आणि तुम्हाला कोणत्याही नुकसान वा दुष्परिणामाचा त्रासही होणार नाही.

  • लसूण

लसणामध्ये सल्फर असल्यामुळे त्यात डासांना दूर ठेवणारे गुण आहेत. लसणाचा रस या कीटकांसाठी घातक आहे. डासांना दूर करण्यासाठी लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या पाण्यात उकळवा, ते पाणी थंड होऊ द्या आणि नंतर ते पाणी स्प्रे बाटलीत भरा. मग संपूर्ण घरात या कीटकनाशक पाण्याची फवारणी करा.

हेही वाचा: तांदळाच्या डब्यातील किडे पळवून लावण्यासाठी ‘हे’ सोप्पे उपाय नक्की करा

  • सुगंधी तेल

डास दूर करून स्वतःसह घरातल्यांचे संरक्षण करण्यासाठी लव्हेंडर, कडुलिंब, सिट्रोनेला, निलगिरी व पुदीना यांपैकी एखादे तेल वापरा. एका स्प्रे बाटलीत यातील एका तेलाचे काही थेंब पाण्यात मिसळा आणि ते तुमच्या घरात शिंपडा. तसेच तुमच्या संरक्षणासाठी कडुलिंबाचे तेल, खोबरेल तेल व लव्हेंडर तेलाचे काही थेंब एकत्र करून, अशा संमिश्रित तेलयुक्त पाण्याचा स्प्रे तयार करून, त्याची सर्वत्र फवारणी करा.