सासू-सुनेचे नाते इतर नात्यांपेक्षा वेगळे असते. या नात्यात कधी प्रेम, काळजी, जिव्हाळा; तर कधी छोट्या-मोठ्या गोष्टींवरून मतभेद किंवा वादही दिसून येतात. प्रत्येक सुनेला असे वाटते की, तिला एक चांगली सासू मिळावी. जर सासू-सुनेच्या नात्यात गोडवा असेल, तर त्यांच्यामध्ये मैत्रीही आपोआप होते.
जर तुमची सासू खूप चांगली असेल आणि तुम्ही तिच्याबरोबर प्रत्येक गोष्ट शेअर करीत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. असे म्हणतात, की सासू कितीही चांगली असो तरी तिला चुकूनही काही गोष्टी सांगू नये. त्या गोष्टी कोणत्या? हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
पूर्वीच्या सासू-सुनेच्या नात्यात आणि आताच्या सासू-सुनेचे नात्यात खूप बदल दिसून येतो. हल्ली सासू-सुनेच्या नात्यात खूप गोडवा, प्रेम व मैत्री दिसून येते.
सासू सुनेबरोबर मुलीप्रमाणे आणि सून सासूबरोबर आईप्रमाणे वागतानाचे चित्र विरळ आहे. पण, अशा या चांगल्या नात्यात दुरावा येऊ नये किंवा सासूच्या मनात तुमच्याविषयी गैरसमज निर्माण होऊ नयेत म्हणून सासूला काही गोष्टी चुकूनही सांगू नये, असे म्हणतात.
जोडीदाराबरोबरचे भांडण
जर सासू तुमची खूप चांगली मैत्रीण असेल तरीही नवऱ्याबरोबरचे भांडण सासूला कधीही सांगू नये, असे म्हटले जाते. कारण- सासूबरोबरच ती एक आईसुद्धा आहे हे लक्षात घ्यायला हवे. एक आई मुलाविषयी काहीही चुकीचे ऐकून घेऊ शकत नाही; उलट अशा वेळी तुमच्याविषयी गैरसमज वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जोडीदाराबरोबरचे छोटे-मोठे वाद तिला सांगू नयेत.
माहेरचे वाद-विवाद
लग्नानंतर स्त्रीचे आयुष्य बदलते. एका नवीन घरात नव्या आयुष्याची ती सुरुवात करते. अशा वेळी माहेरच्या कोणत्याही गोष्टी सासरच्या लोकांना सांगू नयेत. जसे की, माहेरच्या लोकांचे भांडण, वाद-विवाद सासूला कधीही सांगू नयेत, असे म्हटले जाते. त्यामुळे माहेरच्या लोकांसंदर्भात तुमच्या सासूच्या मनात गैरसमज निर्माण होऊ शकतात.
जुने प्रेमसंबंध
सासू तुमची कितीही जवळची मैत्रीण असली तरी तिला तुमच्या जुन्या प्रेमसंबंधाविषयी कधीही सांगू नका. कोणत्याही सासूला तिच्या सुनेच्या जुन्या प्रेमसंबंधाविषयी ऐकायला आवडणार नाही. त्यामुळे अशा गोष्टी त्यांच्याबरोबर कधीही शेअर करू नये, असे म्हणतात.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)