Mulayam Singh Yadav Lifestyle: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंग यादव यांचे आज निधन झाले . ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. युरीन संक्रमण, रक्तदाब व श्वसनाच्या तक्रारीमुळे काही दिवसांपूर्वी ते मेदांता इस्पितळात दाखल झाले होते. मुलायम सिंह यांच्या निधनानंतर त्यांच्या जीवनशैली विषयी अनेकांना कुतुहूल वाटत आहे. शेतकरी कुटुंबातील मुलायम सिंह हे वयाच्या मोठ्या टप्प्यापर्यंत आजाराने ग्रस्त नव्हते, त्यांच्या या आरोग्यमागे त्यांची खास जीवनशैली कारण असल्याचे सांगितले जाते. नक्की त्यांची जीवनशैली कशी होती? त्यांच्या आहारात कोणत्या गोष्टी समाविष्ट होत्या? याविषयी आपणही जाणून घेऊयात..
१४- १५ तास काम करायचे मुलायम सिंह
मुलायम सिंह यांचे सहकारी सांगतात की पक्षाच्या कामासाठी ते अगदी १४ ते १५ तास काम करायचे. न थकता काम करण्याच्या सवयीचे सर्वांनाच कौतुक होते. शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे त्यांचा आहार अत्यंत साधा होता परिणामी त्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यात मोठा हातभार लागला होता.
पुरी व लोणचं होतं आवडतं
मुलायम सिंह यांच्या रोजच्या जेवणात डाळ- भात, पोळी- भाजी यासह दूध व तुपाचा महत्त्वाचा समावेश असायचा, एखाद्या पेहेलवानाप्रमाणे त्यांचा ठराविकच खुराक होता. यामध्ये बदल म्हणून त्यांना पुरी व लोणचे खायला विशेष आवडत होते. तरुणपणी काही काळ पेहेलवानी करताना त्यांनी हाच आहार नेटाने पाळला होता. विशेष म्हणजे मुलायम सिंह यांच्या भोजनात गव्हाच्या नव्हे तर बेसनाच्या पोळ्या असायच्या, त्यांना ताकही खूप आवडत असे. मुलायम सिंह यांचे सहकारी सांगतात की त्यांच्या आहाराचे प्रमाण अधिक होते म्हणजे अगदी त्यात सामन्य ५ त ६ जण जेवतील इतका त्यांचा खुराक होता. याशिवाय त्यांच्याकडे नेहमीच थंड पाण्याच्या दोन बॉटल असत, पेहेलवानीच्या सवयीमुळे अशी आहारशैली असावी असे म्हणतात.
म्हणून मुलायम सिंह सकाळी ४ ला उठायचे…
मुलायम सिंह यांना सकाळी ४ वाजता उठायची सवय होती, नियमित प्रभातफेरी व त्यानंतर काहीवेळ व्यायाम असे त्यांचे रुटीन होते. व्यायामात ते मुख्यतः हिंदू पुशप्स, दंड बैठका काढणे असे सर्व प्रकार करायचे. वेळ असल्यास ते किमान १० मिनिट प्राणायाम करत.
यानंतर त्यांना आठवड्यात एकदा विशेष तेलाने मालिश केली जात होती. मुलायम सिंह म्हणायचे मी गावात वाढलो आहे मला झोप येण्यासाठी किंवा जाण्यासाठी चहा- कॉफीची गरज वाटत नाही.