समूहात भाग घेऊन गायल्याने लोक आनंदी तर होतातच त्याचबरोबर यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यात सुधारणा होते. समूहात गायन चिंता आणि नैराश्याने ग्रासलेल्या लोकांच्या मानसिक आरोग्यासाठी चांगले असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे.

जे लोक समूह गायनाच्या उपक्रमांमध्ये सहभागी होतात त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहते किंवा त्यात सुधारणा होत असल्याचे ब्रिटनमधील ईस्ट अ‍ॅग्लिया विद्यापीठातील संशोधकांना आढळले. गायन आणि समाजामध्ये मिसळल्याने लोकांना प्रोत्साहन मिळत असून त्यांच्यात आपलेपणाची भावना निर्माण होते. ही भावना मानसिक आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.

या अभ्यासासाठी संशोधकांनी दर आठवडय़ाला गायनाची कार्यशाळा भरविणाऱ्या ‘सिंग युअर हार्ट आऊट’ या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांचे विश्लेषण केले. हा उपक्रम मानसिक रुग्ण त्याचप्रमाणे सामान्य नागरिकांसाठी आयोजित केला जातो. संशोधकांनी या गायन समूहाचा सहा महिने अभ्यास केला. त्याचप्रमाणे समूहांमध्ये सहभागी सभासद आणि आयोजकांच्या मुलाखती घेतल्या. एका समूहाचा भाग म्हणून गायन केल्याने मानसिक रुग्णांच्या सुधारणेत मदत होत असल्याचे ईस्ट अ‍ॅग्लिया विद्यापीठाचे टॉम शेक्सपिअर यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे लोकांना अत्यंत फायदा झाला असून या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांनी समूहात गायन करणे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरले असल्याची भावना व्यक्त केली. हा अभ्यास ब्रिटिश वैद्यकीय नियतकालिक ‘मेडिकल ह्य़ुमॅनिटीज’मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Story img Loader